गुरू-शिष्य परंपरेचा ‘विवेकी’ गोफ गुंफणारे पुस्तक

    10-Feb-2024
Total Views |
book review

'मानसशास्त्र’ हा विषय आज आपल्याला नवा नाही. परंतु, त्याबाबत म्हणावी तेवढी जागृती आपल्याकडे झालेली नाही, हेही तेवढेच खरे. हे पुस्तक म्हणजे एक चरित्र आहे आणि एक आत्मचरित्र. चरित्र एका गुरूचं आणि शिष्येचं आत्मकथन. मानसशास्त्रातील एक पद्धती ’आरईबीटी’ जिचे जनक म्हणजे अल्बर्ट एलिस. या उपचार पद्धतीचा भारतभर प्रसार करणारे कि. मो. फडके आणि पुस्तकाची लेखिका अंजली जोशी यांच्या गुरू-शिष्य नात्याचा वेध घेणारे, हे चरित्रात्मक पुस्तक...

पुस्तकाबद्दल लिहिण्यापूर्वी मला कि. मो. फडकेंविषयी थोडी माहिती द्यावीशी वाटते. किशोर फडके ’रॅशनल इमोटिव्ह बिहेव्हियर थेरपी’ म्हणजेच ‘मानवी वर्तणुकीचे तर्कशुद्ध विश्लेषण करण्याच्या पद्धती’वर विश्वास ठेवणारे पहिले भारतीय होत. याविषयीच्या समजुती आणि शंकांचे निरसन त्यांनी थेट न्यूयॉर्क येथील डॉ. अल्बर्ट एलिस यांच्याशी पत्रव्यवहार करून मिळवले. काही प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी सुरू झालेला हा पत्रांचा प्रवास ३६ वर्षे अव्याहतपणे सुरू होता. या काळात त्यांनी मूळ तर्कशुद्ध भावनात्मक वर्तणूक थेरपीसोबत तिचे भारतीयीकरणही केले. त्यांचे शिक्षण ’एमए’पर्यंतच झाले होते; परंतु त्यांनी अनेक विद्यार्थी घडवले. अनेक शोधनिबंध प्रकाशित केले. किती तरी प्रशिक्षण वर्ग घेतले. ’फडके सेंटर’ची स्थापना केली. या पद्धतीचा अभ्यास करताना, त्यांनी काही बदल खुद्द या सिद्धांताच्या जनकाला अल्बर्ट यांना सूचवले आणि त्यांनी ते मोकळ्या मानाने स्वीकारलेही. इतकेच नव्हे, अलबर्ट एलिस यांनी आपल्या आत्मवृत्तात फडकेंचा उल्लेखही केला आहे.

एलिस म्हणतात की, “माझ्यावर आणि माझ्या कामावर सर्वात असामान्य प्रभाव पडला, तो म्हणजे मुंबई, भारतातील मानसशास्त्रज्ञ किशोर एम. फडके. त्याच्या तपशीलवार प्रश्नांशिवाय मी (ठएइढ)चे काही बारीकसारीक मुद्दे कधीच शोधून काढले नसते आणि त्याबद्दल मी त्यांचे आभार मानू इच्छितो. १९६८ पासून ते माझे सर्वात चांगले मित्र आणि समर्थक आहेत.“एलिस यांच्यासोबत झालेला फडकेंचा पत्रव्यवहार चार खंडांत उपलब्ध आहे. शेवटची काही वर्षे ते ‘पार्किन्सन’ आजाराने त्रस्त होते. दि. ३१ जानेवारी २०२२ रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या इच्छेनुसार त्यांचे शरीर मुंबईतील सोमय्या रुग्णालयात दान करण्यात आले. ’ठएइढ’ मधील त्यांच्या विशिष्ट योगदानामुळे, भारतीय मानसशास्त्रज्ञांनी त्यांच्या थेरपीला एक अद्वितीय शीर्षक दिले-’एलिस-फडके थेरपी.’ त्यांनी नऊ मराठी पुस्तके, अनेक लोकप्रिय लेख आणि शोधनिबंध आणि पाच इंग्रजी पुस्तकांचे सहलेखन केले आहे.

अंजली जोशींचे मनोगतच त्यांनी मुळात ज्ञानलालसेतून उत्पन्न झालेल्या अतितीव्र ओढीपासून मांडले आहे. पुस्तकाच्या पान क्र. एकपासून शेवटच्या पानापर्यंत त्यांनी त्यांच्या गुरूचा स्वभाव, त्यांचा स्वतःचा स्वभाव आणि त्यातून दोन्ही व्यक्तीच्या विचारांची, मतांची चिकित्सा केली आहे. हा एक नवीन आणि वेगळा पण दर्जेदार साहित्यप्रकार आहे, असे मला वाटते. गुरू-शिष्य नाते हा या पुस्तकाचा विषय असला, तरीही ‘मानसशास्त्र’ हा त्याचा गाभा आहे. विशेष म्हणजे, ‘मानसशास्त्र’ हा विषय अभ्यासाला नसलेल्यांनाही पुस्तक वाचताना कोणताही अडथळा येत नाही. पुस्तकाची अर्पणपत्रिका आपण बर्‍याचदा गृहीत धरतो. परंतु, तिचा उल्लेख का महत्त्वाचा आहे, हे ते आपल्या शिष्येला सांगतात. म्हणून हे पुस्तक अंजलीताईंनी आपल्या आई-बाबांना प्रेमपूर्वक अर्पण केले आहे. नवनव्या कल्पनांना व्यासपीठ देण्याचं काम ’मॅजेस्टिक’ आजवर सातत्याने करत आले आहे. हे पुस्तकसुद्धा ’मॅजेस्टिक’ प्रकाशनाचे आहे. पुस्तक वाचल्यानंतर त्याविषयी भाष्य कारण सोपं; पण ते वाचण्याची प्रेरणा लेखक किंवा शीर्षकातून मिळते आणि दोन्हीही परिचयाचे नसतील, तर बहुदा मुखपृष्ठावरून! म्हणूनच मुखपृष्ठाची भूमिका वाचक पुस्तक यातील एक दुवा तर असतेच; पण रूढार्थाने ती महत्त्वाचीही असते. पुंडलिक वझे यांनी या पुस्तकाचे मुखपृष्ठ तयार केले आहे. प्रथमदर्शनी नेमकं काय लक्षात येऊ नये; पण जसजसे पुस्तक पुढे सरकते तसतसे या चित्राची उकल होते. हे चित्र एकदा पाहून सोडून देण्यासारखे नाही.

पुस्तकातील काही ओळी अधोरेखित कराव्या आणि काही वेळासाठी पुस्तक मिटून चिंतन करावे, तेव्हा तुमच्या मनातल्या प्रश्नांची उत्तरं याच मुखपृष्ठाच्या आधारे मिळतात. उंचच उंच गहिर्‍या पडीक भिंती, त्यातून क्वचित जाणवणारी निळसर गूढ झलक, पाणथळ, लाटालाटांनी तयार झालेली जमीन आणि या असुरक्षित वातावरणातून बाहेर पाडण्यासाठी पायर्‍यांचे दोन जिने. त्यातल्या एका जिन्यासमोर उघडणारे प्रकाशदार. त्या दारापर्यंत पोहोचण्यासाठी जसं उतावीळ व्हावं, आपण तशी लेखिका आपल्या गुरू भेटीसाठी उतावीळ आहे. पुस्तकाचे नाव आणि लेखिकेचे नाव दोन्ही वेगळे पण परस्परपूरक आहेत.पुस्तकात या गुरू-शिष्यांचा २० वर्षांचा प्रवास आहे. काय होतं, अंजली जोशी नावाची नुकतेच ’एमए’ झालेली आणि एका महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून रुजू झालेली मुलगी आपल्या ‘पीएचडी’च्या मार्गदर्शकांच्या सांगण्यावरून, एका प्रशिक्षण कार्यक्रमात सहभाग नोंदवते. केवळ व्यावसायिकांसाठी असलेल्या या प्रशिक्षण वर्गात किमो यांचे वाक्चातुर्य, रसाळ आणि ओघवती वाणी आणि त्यातून सतत उचंबळून येणारा ज्ञानसागर पाहून अंजली मोहित होते.

एक-एक शब्द टिपकागदासारखा टिपून घ्यावा, अशी आस आणि मग एक लहानसं आलेलं वादळ. गुरूशिवायचे काही महिने आणि एका पात्रापासून पुन्हा सुरू झालेला प्रवास. या प्रवासात मात्र तिचे गुरू तिला भरभरून देतात. प्रत्येकाच्या काही मर्यादा असतात. तेव्हा गुरूचा प्रभाव आपल्यावर इतकाही पडू नये की, त्याच्या मर्यादासुद्धा आपल्या व्हाव्यात. हे अंजलीने बरोबर ओळखलंय. गुरूची सतत चिकित्सा ती करतेय, त्यातून स्वतःला आजमावून पाहतेय, या मंथनातून तयार झालेलं विचारधन मोकळेपणी आपल्या सर्वांसाठी खुलं करते, ही फार कौतुकाची गोष्ट आहे. हा तिचा केवळ स्वतःचा आत्मशोध आहे. तिच्या लेखणीतून, गुरूऋणातून उतराई होण्याचा तिचा प्रयत्न स्पष्ट दिसतो. पण, काही ऋणांचं ओझं वाटून घेऊ नये, ते तसेच मिरवावे.कुण्या एका शिष्येचा तिच्या गुरूशी असलेला ज्ञानसंवाद आणि त्यांचे वैयक्तिक नाते याच्याशी आपले काय देणेघेणे, असा विचार करून पुस्तक चुकवू नये. केवळ गुरू-शिष्यच नाही, तर नातेसंबंध आणि त्यातली आपली भूमिका, आपलं कर्तव्य यातला परस्पर संबंध यांचा परखड शोध घ्यायला लावणारं पुस्तक.

पुस्तकाचे नाव : गुरु विवेकी भला
लेखक : अंजली जोशी
प्रकाशक : मॅजेस्टिक प्रकाशन
प्रकाशन दिनांक : नोव्हेंबर २०२३
पृष्ठसंख्या : २९०
मूल्य : ३५०/- रु.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.