अविश्रांत वाटचालीचा मागोवा!

    11-Mar-2023
Total Views |
book review Alokikacha vatsaru


प्रभुणे यांना २०२१ साली ‘पद्मश्री’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तेव्हा तो या निरलस कृतिशीलतेचाच गौरव होता. प्रभुणे यांनी आयुष्यभर केलेल्या वाटचालीचा धांडोळा अरुण करमरकर यांनी ’अलौकिकाचा वाटसरू’ या पुस्तकात घेतला आहे.


अन्याय, अत्याचार, अनाचाराचे बळी ठरलेल्या पारधी समाजातील बांधवांचे पुनर्वसन करून त्यांना मुख्य प्रवाहात आणणार्‍या सामाजिक समरसतेच्या चळवळीचा ‘यमगरवाडी प्रकल्प’ हा एक मैलाचा टप्पा होता. या प्रकल्पाच्या संकल्पनेपासून तो प्रकल्प स्थिरावण्यापर्यंत प्रत्येक टप्प्यावर गिरीश प्रभुणे यांचा सिंहाचा वाटा होता. रूढ अर्थाने दलित समाजाच्या कक्षेत न येणारे, पण दुर्दशेच्या बाबतीत त्याहूनही बिकट अवस्थेत असणारे; मुख्य म्हणजे गुन्हेगार असाच शिक्का ब्रिटिश काळापासून माथी असणार्‍या पारध्यांमध्ये जाऊन कार्य करणे हे सोपे नव्हते. तथापि तळमळ आणि चिंतन यांमुळे तरुण वयापासूनच प्रभुणे यांचा कल हा सामाजिक प्रश्नांवर उपाययोजण्याकडे होता आणि त्यातूनच ते सामाजिक समरसता मंच आणि भटके विमुक्त परिषदेशी जोडले गेले. त्यातूनच ‘यमगरवाडी प्रकल्प’ उभा राहिलाच; पण या प्रकल्पाने अन्य अनेक प्रकल्पांना प्रेरणा आणि दिशा दिली. समाजपरिवर्तनाच्या या प्रयोगाला यश येताना दिसू लागले. मात्र, तेथपर्यंत झालेला प्रवास हा अत्यंत खडतर, संयमाची परीक्षा पाहणारा, प्रसंगी व्यवस्थेशी संघर्ष करायला लावणारा असाच होता. तथापि कृतिशील सामाजिक बांधिलकी जपलेल्या प्रभुणे यांनी निर्धाराने या प्रयोगाचे नेतृत्व केले. प्रभुणे यांना २०२१ साली ‘पद्मश्री’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तेव्हा तो या निरलस कृतिशीलतेचाच गौरव होता. प्रभुणे यांनी आयुष्यभर केलेल्या वाटचालीचा धांडोळा अरुण करमरकर यांनी ’अलौकिकाचा वाटसरू’ या पुस्तकात घेतला आहे.
 
बारामतीत प्रभुणे यांचा झालेला जन्म, वडील वीज कंपनीत कर्मचारी असल्याने त्यांच्या झालेल्या बदल्या आणि साहजिकच गिरीश प्रभुणे यांचे वेगवेगळ्या गावांत झालेले वात्सव्य, त्या त्या ठिकाणचे अनुभव आणि त्यांचे प्रभुणे यांच्यावर झालेले संस्कार यांचा वेध लेखकाने घेतला आहे. चिपळूण येथे वयाच्या सातव्या वर्षी प्रभुणे यांचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंध आला. त्याच वयात त्यांना जातवास्तवाचा देखील परिचय होऊ लागला. कैकाडी समाजातील मित्राबरोबर प्रभुणे कैकाडीच्या वस्तीवर रमत असत आणि त्या तांड्यांबरोबर भटकतदेखील असत. शाळेत शिक्षक काही कथित अस्पृश्यांना ’हीन’ वागणूक कशी देत असत याचाही परिचय प्रभुणे यांना झाला. या समाजघटकांकडे अशा नकारात्मक दृष्टीने पाहण्याची समाजाची जी धारणा झाली होती, ती किती चुकीची आहे याचाही प्रत्यय प्रभुणे यांना येत होता. १९६२च्या चीनने केलेल्या आक्रमणाच्या वेळी युद्ध थांबावे म्हणून एका कैकाडी मुलाची चप्पल मंत्रवून स्मशानात गाडण्याचा करण्यात आलेला विधी किंवा गोवा मुक्तीच्या लढ्यासाठी निघालेल्या लष्करी पथकाचा मुक्काम असणार्‍या तळावर प्रभुणे आणि त्यांचे कैकाडी सवंगडी गेले असताना एका कैकाडी मुलाने त्यातील एका सैनिकाला फुलांचा गुच्छ दिल्यांनतर त्या सैनिकाने त्या मुलाला मारलेली मिठी हे सगळे प्रभुणे यांच्या मनावर नोंदले जात होते.


 लेखक लिहितो: ’माणसाच्या भावना, एकमेकांविषयीची आस्था, त्यांची उत्कटता यांना जातीजमातीची वा कसलीच कुंपणे, बंधने नसतात ही समजूत प्रभुणे यांच्या मनात खोलवर रुजली.’ तांबवे गावात विस्तारक म्हणून प्रभुणे यांनी केलेले संघकार्य, तेथे शाखेत धवज उभारल्यानंतर ते घेत असलेली बुद्ध वंदना, आंबेडकर जयंती साजरी करण्याचा उपक्रम, प्रभुणे यांच्या या प्रयोगशीलतेचे प्रांत प्रचारक असणारे वसंतराव केळकर यांनी केलेले कौतुक, त्याच सुमारास अवांतर वाचन-लेखनाला झालेली सुरुवात, त्यातूनच कोयना धरणाच्या धरणग्रस्तांच्या आयुष्यावर बेतलेली ’लाटांखाली संथ पाणी’ या कादंबरीचे लेखन, संघ शिक्षा वर्गातूनच थेट प्रचारक म्हणून जाण्याचा प्रभुणे यांनी घेतलेला निर्णय; भोर, मुळशी येथे त्यांची झालेली नियुक्ती, निरीक्षण आणि जिज्ञासा या वृत्तीतून एकीकडे ग्रामीण जीवनाचे आकलन करून घेत असतानाच प्रभुणे यांच्या कलंदरपणाचा झालेला आविष्कार, कोळवण येथे बुजलेल्या गुहेचे प्रवेशद्वार मोकळे करून आतील लेण्यांचा लावलेला ‘शोध’ इत्यादी भाग लेखकाने मांडला आहे.


वडील निवृत्त झाल्यानंतर प्रभुणे यांना प्रचारक म्हणून थांबावे लागले आणि नोकरी स्वीकारावी लागली; मात्र म्हणून त्यांची सामाजिक कार्याबद्दलची ओढ कमी झालेली नव्हती. चिंचवड येथील क्रांतिकारक चापेकर वाड्याला दारूभट्टी आणि जुगार खेळणार्‍यांच्या पडलेल्या वेढ्यातून वाड्याची मुक्तता करण्यासाठी प्रभुणे यांनी घेतलेला पुढाकार, ‘चापेकर स्मारक समिती’च्या माध्यमातून व्यायामशाळेपासून व्याख्यानमालेपर्यंत राबविलेले उपक्रम यांचाही उल्लेख लेखकाने केला आहे. प्रभुणे यांच्या वाटचालीतील आवर्जून उल्लेख करायला हवा, असा भाग म्हणजे त्यांनी ’असिधारा’ नावाचे सुरू केलेले नियतकालिक. ते नियतकालिक चालविताना प्रभुणे यांनी सर्जनशीलतेची चुणूक दाखविलीच, जी पुढे श्री. गं. माजगावकर यांच्या ’माणूस’मध्ये अधिक प्रस्फुटित झाली. शरद वाघ, सु. ह. जोशी, ग. वि. केतकर, दुर्गा भागवत असे कितीतरी प्रतिथयश लेखक त्यातून लेखन करीत. याच दरम्यान जयप्रकाश नारायण यांची प्रभुणे यांनी घेतलेली भेट, तरुण वयातदेखील प्रभुणे यांनी परिधान केलेला भारतीय वेष पाहून प्रभावित झालेले जेपी आणि ’आणखी एक करा, खादीचे कपडे वापरा’ अशी केलेली सूचना आणि प्रभुणे यांनी त्या सूचनेची दखल घेऊन कपड्यांत केलेले बदल, अशा हृद्य आठवणींनी पुस्तकाची खुमारी वाढली आहे.


‘माणूस’ साप्ताहिकाशी म्हणजेच माजगावकर यांच्याशी प्रभुणे यांचा आलेला संबंध, ‘माणूस’मधून प्रभुणे यांनी केलेले लेखन, घेतलेल्या मुलाखती, वार्तांकनासाठी केलेले प्रवास, त्यातून मनुष्यप्राण्याच्या जीवनाच्या पैलूंचे घडलेले दर्शन, सर्जनशीलतेला आलेला बहर याचा धांडोळा लेखकाने घेतला आहे. ‘ग्रामायन’ संस्थेशीदेखील प्रभुणे निगडित होते, तेही माजगावकर यांच्यामुळेच. शिरूर तालुक्यातील निमगाव म्हाळुंगी गावात केलेल्या प्रयोगांनी अनेकांचे लक्ष वेधून घेतले. मात्र, त्या प्रयोगाच्या संकल्पनेच्या टप्प्यावरच प्रभुणे यांनी केलेला ’चौकटीबाहेरचा’ विचार कसा दिशादर्शक ठरला, हे वाचण्यासारखे!१९८३ साली ‘समरसता मंचा’ची झालेली स्थापना, त्याचे आणि पुढे भटके विमुक्त परिषदेचे संघटनमंत्री म्हणून प्रभुणे यांनी स्वीकारलेले दायित्व, भटके-विमुक्तांच्या प्रश्नांना प्रभुणे यांनी हात घालताना त्यामागची त्यांची भूमिका, हे कार्य करताना आलेल्या समस्या, अगदी पोलीस यंत्रणांची देखील या समाज घटकांकडे पाहण्याची पूर्वग्रहदूषित वृत्ती, पारधी समाजात स्वीकारार्हता वाढविणाच्या वाटचालीतील आव्हाने, मेळावे, बैठका, परिषदा यांच्या माध्यमातून पारधी समाजाचे प्रबोधन करण्याचा केलेला प्रामाणिक प्रयत्न, त्या समाजातून तयार केलेले कार्यकर्ते, पारधी समाजातील महिलांचा पोलिसांच्या अत्याचारांच्या विरोधातील निर्धार अशा अनेक टप्प्यांचा सम्यक वेध लेखकाने घेतला आहे.

प्रसंगी पोलिसांनीदेखील पारधी समाजातील महिलांना प्रभुणे यांच्याविरोधात चिथावणी देण्याचा प्रयत्न केल्याचा जो दाखला लेखकाने दिला आहे तो धक्कादायक असाच! मात्र, त्यावेळी महिलांनी प्रभुणे यांच्याविरोधात खोटी साक्ष देण्यास दिलेला नकार प्रभुणे यांनी त्या समाजघटकांच्या जिंकलेल्या विश्वासाचाच पुरावा. ’संघर्ष करायचा तर तो समन्वयाकडे, समेटाकडे नेणारा’ हा माजगावकर यांनी दिलेला मंत्र प्रभुणे यांनी कायम जपला आणि अंगीकारला. भटके-विमुक्त यांच्यासाठी वसतिगृह, शाळा. येथपासून गृहउद्योग, बेकरीसारखे व्यवसाय येथपर्यंत सारी आखणी करून या समाजजघटकांना स्थैर्य देण्याचा प्रयोग, त्यातूनच पुढे ‘पुनरुत्थान गुरूकुलसारखे उभे राहिलेले प्रयोग ही प्रभुणे आणि त्यांचे सहकारी यांच्या अथक परिश्रमांची फलश्रुती. या सामाजिक चळवळीचा शासकीय निर्णयांवर झालेला अनुकूल परिणाम; वस्त्या, पाले यांना गावांचा तत्कालीन उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे यांनी जाहीर केलेला दर्जा; भटके-विमुक्त समाज अभ्यास आणि संशोधन समिती (इदाते समिती) चे दिशादर्शक काम, या सगळ्याचाही आढावा लेखकाने घेतला आहे. गिरीश प्रभुणे नावाच्या ‘झंझावाती व्रतस्थतेचा प्रवास’ पुस्तकात लेखकाने उलगडून दाखविला आहे. पुस्तकाला अविनाश धर्माधिकारी यांची प्रस्तावना लाभली आहे.

 
पुस्तकाचे नाव : अलौकिकाचा वाटसरू

लेखक : अरुण करमरकर

प्रकाशक : परम मित्र पब्लिकेशन्स, ठाणे

पृष्ठसंख्या : १६४

मूल्य : रुपये २७५

९८२२८२८८१९

-राहूल गोखले

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.