मुंबई : भाजपाचे राष्ट्रीय सचिव सुनिल देवधर यांच्या 'माय होम इंडिया' संस्थेतर्फे दरवर्षी इशान्य भारतासाठी कार्यरत असलेल्या कर्तृत्ववान व्यक्तीस 'वन इंडिया अवॉर्ड' (ONE - Our North East) हा पुरस्कार प्रदान केला जातो. यंदा या पुरस्काराचे बारावे वर्ष आहे. गुरुवार, दि. १५ डिसेंबर रोजी संध्याकाळी ४ वा. स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक, दादर (प) येथे हा पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला आहे. यावर्षी हा पुरस्कार अरुणाचल प्रदेशातील वनवासींच्या पारंपारिक श्रद्धा आणि संस्कृतीचे जतन आणि संवर्धन करण्याच्या कार्यासाठी तेची गुबिन यांना देण्यात येणार आहे. दरम्यान अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खांडू, ज्येष्ठ गायिका पद्मश्री अनुराधा पौडवाल आणि माय होम इंडियाचे संस्थापक सुनिल देवधर यांची विशेष उपस्थिती असणार आहे.
तेची गुबिन हे पेशाने वास्तुविशारद (आर्किटेक्ट) असून अरुणाचल प्रदेश सरकारमध्ये गृहनिर्माण संचालक म्हणून कार्यरत आहेत. न्यिशी समाजाच्या आणि सर्वसाधारणपणे जनजाती समुदायांच्या स्वदेशी श्रद्धेचे जतन, संरक्षण आणि संवर्धन करण्यात त्यांचा सक्रिय सहभाग आहे. ते अरूणाचल विकास परिषदेचे अध्यक्षही आहेत. २६ जानेवारी २०१० रोजी त्यांनी चीनच्या सीमेलगत असलेल्या भारतातील ९१ दुर्गम गावांना भेट देऊन त्या गावांमध्ये तिरंगा फडकवला होता. अरुणाचल प्रदेशातील धर्मांतर रोखण्यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न अद्भूत आणि कष्टप्रद आहेत.