‘टाईम मॅनेजमेंट’ची किमया साधणार्‍या सीमा

    11-Dec-2022   
Total Views |
Seema Jadhav

वेळेची निश्चिता नसलेल्या वैद्यकीय क्षेत्रात काम करूनही अचूक ‘टाईम मॅनेजमेंट’ करून ‘करिअर’सोबतच आवड जोपासणार्‍या कडोंमपाच्या आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉ. सीमा जाधव यांच्याविषयी जाणून घेऊया.


सीमा यांचे संपूर्ण बालपण हे ऐतिहासिक नगरी असलेल्या कल्याणमध्ये गेले. त्यांचे शालेय शिक्षण कल्याणमधील ‘चेतना इंग्लिश स्कूल’मध्ये झाले. त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण बिर्ला महाविद्यालयातून घेतले. त्यांची लहान असताना शिक्षक पेशात ‘करिअर’ करावे, अशी इच्छा होती. शिक्षकी पेशात करिअर करता आले नाही, तर ‘मॉडेलिंग’ या क्षेत्रात तरी काही ना काही करून दाखवावे, असे त्यांना वाटत होते. इतरांप्रमाणे ‘मॉडेलिंग’ क्षेत्रातील ‘ग्लॅमर’ने सीमा यांनादेखील भुरळ घातली होती. त्यामुळे मोठी झाल्यावर कोणत्या क्षेत्रात करिअर करणार, याविषयी विचारल्यास त्या नेहमी शिक्षक किंवा ’मॉडेल’ असे सांगत असत. मात्र, जशा त्या मोठ्या होत गेल्या तेव्हा त्यांची अभ्यासातील रूची वाढत गेली. दहावी, बारावी आणि प्रवेश परीक्षेत उत्तम गुणही त्यांना मिळाले होते. त्यामुळे त्यांचे वडील रमेश जाधव यांनी त्यांना डॉक्टरी पेशाकडे वळण्याचा सल्ला दिला.

 सीमा यांनीदेखील वडिलांच्या मतांचा आदर करीत मेडिकलला प्रवेश घेण्याचे निश्चित केले. त्यांना नगर येथील सिद्धकला आयुर्वेदिक महाविद्यालयात प्रवेश मिळाला. त्यांनी तिकडे ‘बीएएमएस’चे शिक्षण पूर्ण केले. वैद्यकीय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्या पुन्हा कल्याण येथे आल्या. डॉ. एम. जी. चिंचणसुरे यांच्याकडे त्यांनी ‘प्रॅक्टिस’ करण्यास सुरूवात केली. ‘प्रॅक्टिस’ सुरू असतानाच त्यांना कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या वैद्यकीय विभागातील नोकरीची संधी चालून आली. त्यांनी ‘वॉकिंग इंटरव्ह्यू’ दिला. त्यांची या नोकरीसाठी वर्णीदेखील लागली आणि त्या कडोंमपाच्या आरोग्य विभागात रूजू झाल्या. त्यांच्या करिअरमधील मार्गदर्शक हे त्यांचे वडील रमेश हेच आहेत, असेही सीमा सांगतात. सीमा यांना एक लहान भाऊ आहे. त्यांची आर्थिक परिस्थिती बेताची असली, तरी आई-वडिलांनी दोघांनाही इंग्रजी माध्यमातूनच शिक्षण दिले. आई-वडिलांनी आम्हाला कधीही कोणत्याही गोष्टीची कमतरता भासू दिली नसल्याचे सीमा सांगतात.

सीमा यांच्या आई रेखा या सुरूवातीला केवळ कौटुंबिक जबाबदारी सांभाळत होत्या. परंतु, त्यांना कडोंमपाची निवडणूक लढण्याची संधी मिळाली अन् त्या नगरसेवक पदावर रुजू झाल्या. त्यामुळे रेखा यांनी कल्याण-डोंबिवली महापालिकेचे नगरसेवक पद भूषविले आहे. त्यांचे वडील रमेश हेदेखील कडोंमपाचे माजी महापौर आहेत. घरात राजकीय वारसा असतानादेखील सीमा यांनी सामाजिक कार्य असलेला असा वैद्यकीय पेशा निवडला. मात्र, वैद्यकीय पेशासोबतच त्या आजही आपली आवड जपत आहेत. वैद्यकीय क्षेत्रात कोणतेही वेळेचे बंधन नसते असे म्हटले जाते. असे असले तरी त्यांनी ‘टाईम मॅनेजमेंट’ करून आवड आणि करिअर या दोन्हीचा मेळ घातलेला आहे. त्यामुळेच त्यांच्या चेहर्‍यावर नेहमीच हसू खुललेले दिसते.

सीमा या सध्या कल्याणमध्ये राहत असून गेल्या 12 वर्षांपासून कडोंमपाच्या चिकणघर येथील आरोग्य केंद्रात कार्यरत आहेत. त्यांच्या या केंद्रावर महिला व बाल सुरक्षा यासाठी विविध उपक्रम घेतले जातात. या सेंटरच्या माध्यमातून ते आई आणि त्यांची ‘हेल्थ’ या विषयावर मार्गदर्शन करीत असतात. या सेंटरच्या माध्यमातून स्त्री गर्भवती राहिल्यापासून तिची प्रसूती होईपर्यंत सर्व प्रकारचे मार्गदर्शन तिला केले जाते. याशिवाय बाळ पाच वर्षांचे होईपर्यंत त्यांना विविध प्रकारची माहिती पुरविली जाते. बाळाला कोणती औषधे दिली जावीत, त्यांचा आहार कसा असावा, त्यांनी कधी लसीकरण करावे, याविषयी मार्गदर्शन केले जाते. महापालिकेच्या आरोग्य केंद्रात शक्यतो झोपडपट्टी विभागातून येणार्‍या महिलांची संख्या जास्त आहे. त्यामुळे या महिलांमध्ये व त्यांच्या नातेवाईकांमध्ये फारशी माहिती नसते. बाळाला अनेकदा गैरसमजुतीमुळे लसीकरण देणेदेखील टाळले जाते. या मानसिकतेमुळे लसीकरणाबाबतचे गैरसमज दूर करणे.

झोपडपट्टी विभागात जाऊन बाळाचे आई-वडील आणि आजी आजोबा यांची समजूतदेखील या आरोग्य विभागाला काढावी लागते. नागरिकांचे आरोग्य चांगले राहावे, याकरिता वेळोवेळी परिसरात कॅम्प लावले जातात. झोपडपट्टीतील काही भागात तर मुलगी नको अशीदेखील काहींची धारणा आहे. काहींना किमान पहिला तरी मुलगा व्हावा, असे वाटत असते. या व्यक्तींना समुपदेशन करण्याचे कामदेखील सीमा करतात. सध्या गोवरची साथ पसरली आहे. त्यामुळे त्यांनी परिसरात दोन-तीन कॅम्पचे आयोजन केले होते. आजूबाजूच्या परिसरात जाऊन लहान मुलांची चौकशी करून त्यांचे लसीकरण झाले आहे का, यांचादेखील आढावा घेतला जात आहे. ज्या मुलांचे लसीकरण झाले नाही त्यांचे लसीकरण करून घेण्याचा सल्ला त्यांच्या पालकांना दिला जात आहे.

सीमा या आपली ‘मॉडेलिंग’ क्षेत्रातील आवड ही जपत आहे. तत्यासाठी लागणारा ‘डाएट’ आणि व्यायामही त्या नियमित करतात. शक्यतो तेलकट आणि गोड पदार्थ खाणे त्या टाळतात. बाहेरील खाद्यपदार्थ खाणेही टाळतात. घरी बनविलेले आणि पालेभाज्या आणि भाज्या असलेले जेवण खाणे त्या नेहमीच पसंत करतात. काही दिवसांपूर्वी त्यांना ‘मिसेस महाराष्ट्र मेडिक्वीन’ या स्पर्धेसाठी संधी चालून आली होती. या संधीचे सोने करीत त्यांनी आपल्या बुद्धीची चुणूक दाखवून दिली. त्यामुळेच त्यांना ‘बेस्ट टॅलेण्ट प्राईज’ या पारितोषिकाने गौरविण्यात आले. याव्यतिरिक्त त्यांना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे. ‘कोविड’ काळातील त्यांच्या कामांचा ‘इंडियन मेडिकल असोसिएशन’ व कडोंमपा आयुक्तांनी सन्मान केला आहे.
सीमा यांना ‘मॉडेलिंग’च्या क्षेत्रात आणखी पुढे जायचं आहे. तसेच संपूर्ण कल्याण-डोंबिवलीसाठी त्यांना वैद्यकीय सेवा देता आली, तर ती देण्याचाही त्यांचा मानस आहे, असे सीमा यांनी सांगितले.सीमांसारख्या हरहुन्नरी व्यक्तिमत्त्वाला त्यांच्या पुढील वाटचालीसाठी दै. ‘मुंबई तरूण भारत’कडून हार्दिक शुभेच्छा.





आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.