ठाणे : ठाण्यातील गावदेवी मैदानाचा आकार कमी होऊन त्याचा मृत्यू झाल्याची खंत डॉ. महेश बेडेकर यांनी व्यक्त केली आहे. आचार्य अत्रे, बाळासाहेब ठाकरे, अटलबिहारी वाजपेयी यांच्यासारख्या दिग्गजांच्या सभा या मैदानात झाल्या. या सभेच्या आठवणींना उजाळा देत या मैदानाचा दिवसाढवळ्या मृत्यू झाल्याचे डॉ.बेडेकर यांनी म्हटले आहे.
ठाण्यात आता सेंट्रल मैदान, पोलीस ग्राऊंड अशी हाताच्या बोटावर मोजता येतील एवढीच मैदाने शिल्लक राहिली आहेत. पूर्वी या मैदानात देशातील सर्वोत्तम सर्कशी होत असत. अशा मैदानात पाण्याची टाकी आणि सार्वजनिक शौचालये बांधण्यात आली. शहरीकरणामुळे वाहनांची संख्या वाढली. या सर्वांची गरज किती आहे हे सांगत या मैदानाचे लचके तोडण्यात आले आणि या मैदानाचा आकार आकुंचित होत गेला. गावदेवी मैदानाखाली वाहनतळ उभारताना हे मैदान पूर्ववत केले जाईल असे आश्वासन पालिकेने दिले होते. मात्र आता वाहनतळ पूर्ण होत असतानाच त्याचा आकार कमी झाल्याचा आरोप भारतीय जनता पक्षाने केला होता. आता या ना त्या कारणाने भविष्यकाळात हा आकार आणखी कमी होत या मैदानाचा दुर्दैवी मृत्यू होईल. अशी खंत डॉ.महेश बेडेकर यांनी व्यक्त केली आहे.