आज सह्याद्रीबद्दल काही खरंच विलक्षण आपण जाणून घेणार आहोत. महाराष्ट्रातील सुमारे 700 किमींचा किनारपट्टीचा प्रदेश, हा कोकण म्हणून ओळखला जातो. एका बाजूला लांबपर्यंत पसरलेल्या वाळूचे समुद्रकिनारे तर दुसर्या बाजूला वनस्पती आणि जीवजंतूंनी समृद्ध अशी सह्याद्री नावाने सर्वश्रुत असलेली पश्चिम घाट पर्वत शृंखला.
या पर्वतातून आणि दर्याखोर्यातून कोसळणारे धबधबे आणि सोबतची थंडहवेची पर्यटनस्थळे खरोखरच स्वर्गप्राय अनुभव देऊन जातात. जणू महाराष्ट्राला मिळालेले हे निसर्गाचे वरदानच आहे. या परिसराला शिवकालीन किल्ले जसे राजगड, रायगड, प्रतापगड इत्यादींनी आणि प्राचीन मंदिरांमुळे अनन्यसाधारण पुरातत्त्वीय महत्त्व प्राप्त झाले आहे. परंतु, अजूनही या सह्याद्रीच्या कडेकपारीमध्ये त्यावरील स्वर्गीय पठार प्रदेशात अनेक अनपेक्षित रहस्ये दडलेली आहेत.
अनेक प्राचीनकालीन गुपिते अजूनही आपल्याला ठाऊक नाहीत. यातीलच एक अतिशय रहस्यमय गुपित म्हणजेच ‘कातळशिल्प’ चला, ‘कातळशिल्प’ म्हणजे नक्की काय जाणन घेऊया. ‘कातळशिल्प’ हा शब्द दोन शब्दांपासून बनला आहे. ‘पेटो’ म्हणजे ‘रॉक’ अर्थात दगड आणि ‘ग्लिफ’ म्हणजे कोरीव काम. म्हणून ‘कातळशिल्प’ ही मुख्यतः प्रागैतिहासिक म्हणजेच ‘प्री हिस्टोरिक’ काळातील खडकांवर कोरलेली चित्रे आहेत. ही चित्रे जगात काही ठरावीक ठिकाणीच आढळतात. कोकणात, अग्निजन्य पठाराच्या पृष्ठभागावर कोरल्या गेलेल्या या रहस्यमय आकृत्या आहेत. अगदी नजीकच्या काळापर्यंत हे रहस्य सामान्य जगासमोर आलेले नव्हते. आज आपल्याला कळते आहे की, कोकण प्रदेश हा तर या अशा चित्रांचे माहेरघर आहे. सुधीर रिसबूड आणि मनोज मराठे यांच्या नेतृत्वाखालील एका शोधक गटाने या चित्रांचे दर्शन सामान्य जनतेला सर्वात प्रथम करून दिले.
महाराष्ट्राच्या पुरातत्त्व विभागाने या गटाच्या मदतीने 52 गावांमध्ये 90 वेगवेगळ्या ठिकाणी, हजारो चित्रांची नोंद केली आहे. हा 170 चौरस किलोमीटरवर पसरलेला प्रदेश असून, प्रामुख्याने हा प्रदेश रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात येतो. प्राचीन इतिहासाचा हा आश्चर्यकारक खजिना अंदाजे दहा हजार ते 12 हजार वर्षे जुना असू शकतो असे भारतीय पुरातत्त्व विभागाने सांगितले आहे. विभागाच्या म्हणण्यानुसार, ‘लॅटराईट’ खडकांवर केलेले हे कोरीवकाम, देशाच्या विविध भागात आढळणार्या इतर पुरातत्त्वीय नमुन्यांपेक्षा खूप वेगळे आहे. या चित्रांमधील चित्रण मुख्यतः तीन श्रेणींमध्ये विभागले जाऊ शकते. प्राणिसदृश्य, प्राणी व मानव संमिश्रित किंवा एकत्र आणि चौरस, आयत, वर्तुळे इत्यादी अमूर्त आकृत्या. ही चित्रे कोरणारी संस्कृती, शेतीप्रधान नसावी, असे अभ्यासकांचे मत आहे. हा निष्कर्ष या निरीक्षणावरून निघतो की, सह्याद्रीवरील या कलाकृतींमध्ये शेतीविषयक चित्रण दिसत नाही.
काही शास्त्रज्ञांचे असेदेखील मत आहे की, हे चित्रण इ.स.पू 10 हजार ते 12 हजार या कालखंडात झाले असावे, हा विचार खूप पुराणमतवादी असून, मूळ तारीख अजून हजारो वर्षे आधीचीदेखील असू शकते. मला असे वाटते की, आफ्रिकेतून बाहेर (आफ्रिकेतून सुरुवातीच्या मनुष्यसदृश्य मानवाचे जगभर होणारे स्थलांतर) आणि आशियातून बाहेर (आशिया आणि भारतीय उपखंडातून मनुष्यसदृश्य मानवाचे जगभर होणारे दुसरे स्थलांतर) या दोन्ही गृहीतकांचा विचार करता आणि ‘हॅप्लोग्रुप एफ’ (भारतीय उपखंडातील मूळ स्थायिक) च्या प्रवासाबद्दल आपल्याला ठाऊक असलेल्या माहितीच्या आधारावर, मी दुसर्या सिद्धांताचे समर्थन करतो, जो सुचवतो की, हे ‘कातळशिल्प’ आधीच्या अंदाजापेक्षा खूप जुने असू शकतात.
मानवी संस्कृतीच्या विकासाचा विचार करता, या सर्व ‘कातळशिल्प’ना अत्यंत महत्त्व आहे. इ.स.पू. तीन हजार नंतर आणि इ.स.पू. 15 हजारच्या पूर्वीच्या मानवाच्या अनेक खुणा विज्ञानाकडे आहेत. पण इ.स.पू. तीन हजार ते 15 हजार या प्रागैतिहासिक कालावधीत नेमकेघडले काय? या प्रश्नाचे उत्तर कोकणात सापडलेल्या कलाकृतींसारख्या पुराव्यांवरून कळते. उदाहरणार्थ, कोकणातल्या एका ‘कातळशिल्प’मध्ये गेंड्याच्या चित्र आहे. गेंडा ही प्रजाती कोकण परिसरात प्राचीन काळात असल्याचे दाखले नाहीत आणि असले तरी ही कोकणात नामशेष झालेली प्रजाती होती. पण मग या कलाकृतींमध्ये गेंडा कसा? याचा अर्थ, कलाकृती जेव्हा काढली गेली, तेव्हा या ठिकाणी गेंडे जीवंत होते किंवा वेगवेगळ्या ठिकाणाहून लोक इथे सह्याद्रीच्या पठारावर येत असत.
अजून एक विलक्षण बाब म्हणजे, धातूच्या साधनांच्या साहाय्याने हे कोरीवकाम करणे शक्य होते. परंतु, अशा साधनांचा कोणताही मागमूस येथे सापडत नाही. इतकेसगळे असताना, एक असादेखील विचार मांडला गेला आहे की, प्राचीन काळात, आपल्याला ठाऊक नसलेली सभ्यता होती का? जी डायनासोर सारखीच लुप्त झाली असावी का? रत्नागिरीच्या ‘कातळशिल्प’ची तारीख इ.स.पू.10 हजार आहे, असे काही दाखले सांगतात. या काळात मानवता नुकतीच ‘यंगर ड्रायस’ युगाच्या भयंकर विध्वंसातून उदयास आली होती. यावरून असादेखील अंदाज बांधता येऊ शकतो की, ही चिन्हे हिमयुगाच्या काळात विकसित झालेल्या सभ्यतेच्या गूढ ज्ञानाचे प्रतिबिंब आहेत. अशी मानव संस्कृती जी मुख्यत: ‘यंगर ड्रायस’ आपत्तीदरम्यान नष्ट झाली. या हरवलेल्या सभ्यतेचे वाचलेले लोक जगभरात अनेक ठिकाणी स्थायिक झाले असतील, असादेखील अंदाज या पुराव्यांवरून मांडला गेला आहे.
त्यांची पूर्वीची सभ्यता मोडकळीस आल्याचे पाहिल्यानंतर, वाचलेल्यांनी मोठी स्मारके बांधण्याचे टाळले असावे. त्याऐवजी, त्यांनी कठोर, खडकाळ प्रदेशावर चिन्हे कोरली असू शकतात. रत्नागिरी ‘कातळशिल्प’चे एक रहस्य, ज्यावर ‘बीबीसी’च्या अहवालाने लक्ष वेधले, ते म्हणजे, गेंडा आणि पाणघोड्याचे चित्रण. ‘हिप्पोपोटॅमस’चे चित्रण अधिक अनाकलनीय आहे. ‘हेक्साप्रोटोडॉन’, पाणघोड्यासारख्या प्राणी, बहुदा, त्याच कुटंबातला प्राणी सुमारे 5.9 दशलक्ष ते नऊ हजार वर्षांपूर्वीपर्यंत भारतात होता, असे काही दाखले सांगतात. ‘हेक्साप्रोटोडॉन’चा शेवटचा ज्ञात नमुना सुमारे 16,467-15,660 वर्षांपूर्वीचा, मध्य प्रदेशातील नर्मदा खोर्यात राहत होता, असे पुरावे सांगतात. 2003 मध्ये सापडलेल्या एका खंडित दाताच्या ‘एमएस डेटिंग’च्या आधारे हे ठरवण्यात आले होते. याचा अर्थ असा होतो की, कोकण किनारपट्टीवर पाणघोड्यांचे ‘कातळशिल्प’ कोरणार्या लोकांनी किमान नऊ ते 16 हजार वर्षांपूर्वी असे केले असावे का?
काही दाखल्यांप्रमाणे,किमान एक ‘कातळशिल्प’ तरी आहेच, जो कांगारूसारखा दिसतो. कांगारू हा प्राणी ऑस्ट्रेलियात स्थानिक असल्याचे मानले जाते आणि ते आताच्या काळात इतरत्र कुठेही आढळत नाहीत, यात वाद नाही. याचा अर्थ असा होतो का? की ज्या लोकांनी हे ‘कातळशिल्प’ बनवले, त्यांचा ऑस्ट्रेलियाशी सागरी संपर्क होता? किंवा कदाचित, पाणघोड्या प्रमाणेच, कांगारूदेखील भूतकाळात भारतात आढळायचे? आणि ‘होलोसीन’ युगाच्या सुरुवातीस ते नामशेष झाले? या व अशा अनेक प्रश्नांनी या ‘कातळशिल्प’ विषयाचे महत्त्व सिद्ध केले आहे. महाराष्ट्राला, भारताला तसेच अशियाखंडाला लाभलेला हा खजिना आहे आणि म्हणूनच या प्रागैतिहासिक पुराव्यांची काळजी घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. शिवाय या संरचनांबाबत जागरुकता निर्माण करणे आवश्यक आहे जेणेकरुन या कलाकृतींच्या क्या मागच्या इतिहासाचा आणि विज्ञानाचा उलगडा करण्यावर संशोधनाचे प्रमाण सुधारेल.
अनेक ठिकाणच्या स्थानिक लोकांना या ‘कातळशिल्प’च्या अस्तित्वाची जाणीव असल्याचे दिसून आले. ते ह्या ‘कातळशिल्प’चा आदर करतात आणि ते त्यांच्या दैवी पूर्वजांच्या कार्याशी जोडतात. भारताच्या ह्या ठेव्याची नोंद घेत, ‘युनेस्को’ (युनायटेड नेशन्स एज्युकेशनल, सायंटिफिक अॅण्ड कल्चरल ऑर्गनायझेशन) च्या जागतिक वारसास्थळांच्या तात्पुरत्या यादीमध्ये समाविष्ट केलेल्या तीन भारतीय आकर्षणांपैकी कोकण प्रदेशातील ‘कातळशिल्प’चा समावेश आहे. इतर दोन भारतीय स्थळे म्हणजे, मेघालयातील जिंगकींग जिं, म्हणजेच लिव्हिंग रूट ब्रिज आणि आंध्र प्रदेशातील लेपाक्षी येथील श्री वीरभद्र मंदिर. अशा या सह्याद्रीच्या कलाकृतींबद्दल तुम्हाला ठाऊक होते का? आता जेव्हा जाल, जरूर भेट द्या.
- डॉ. मयुरेश जोशी