यंदाची दिवाळी मालाड मालवणींच्या भगिनींसोबत

    25-Oct-2022   
Total Views |

दिवाळी  
 
 
 
 
‘यंदाची दिवाळी मालाड-मालवणीच्या भगिनींसोबत’ असा कार्यक्रम मालाडच्या भीमकन्या महिला मंडळाच्या शुभांगी जाधव आणि स्वयम महिला मंडळाने मंगळवार, दि. 25 ऑक्टोबर रोजी मालवणीच्या प्रज्ञा बुद्धविहारामध्ये आयोजित केला होता. या कार्यक्रमासाठी पर्यटन आणि महिला बाल विकासमंत्री आ. मंगलप्रभात लोढा यांनी संपूर्ण सहकार्य केले. कार्यक्रमामधली संवेदना इथे मांडण्याचा केलेला हा प्रयत्न...
 
 
 
मालवणीमधल्या प्रज्ञा बुद्धविहारामध्ये जमलेल्या शेकडो महिला त्यांच्या चिल्ल्यापिल्यांना घेऊन आलेल्या. एका बालकाने त्याच्या आईला विचारले, ”मम्मी, आपण इथं का आलू?” यावर त्याची आई म्हणाली, ” मंगलमामानी मला साडी आणि तुला मिठाई पाठवली. दिवाळी हाय ना?” हे सांगताना तिच्या चेहर्‍यावर खूप आनंद होता. धनत्रयोदशीला सोने खरेदी करताना एखादीच्या चेहर्‍यावर जितका अलौकिक आनंद समाधान नसेल तितका आनंद तिच्याच नव्हे, तर सगळ्याच आयाबायांच्या चेहर्‍यावर होता. रूढार्थाने ती साडी,ती मिठाई याची किंमत होण्यासारखीच नाही. ही साडी आणि मिठाई मंगल मामा म्हणजे पर्यटन, महिला बालविकासमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी या मालवणीमधल्या शेकडो महिलांसाठी भाऊबीज भेट म्हणून पाठवली होती. स्थानिक भीमकन्या महिला मंडळाने आणि स्वयम महिला मंडळाने ही भाऊबीज भेट वितरणाचा कार्यक्रम आयोजित केला आणि त्याद्वारे या महिलांना ही भाऊबीज भेट देण्यात आली.
 
 
 
अर्थात, मालवणीमधील या परिसरात अठराविश्व दारिद्य्रच. पण त्यातल्या त्यात महिला अतिशय टापटिप व्यवस्थित आल्या होत्या. मालवणीमध्ये गायकवाड नगर आणि आजूबाजूच्या परिसरातील या आयाबाया. प्रचंड गरिबी. त्यातच इथे मालवणीमध्ये आठवणीने दिवाळी साजरी केली जावी असे वातावरणच नाही. अशा परिस्थितीमध्ये स्थानिक भीमकन्या महिला मंडळ आणि विक्रोळीचे स्वयम महिला मंडळाने इथे दिवाळी साजरी करण्याचे ठरवले. दिवाळी निमित्त एकल महिला(विधवा, काही कारणास्तव अविवाहित, घटस्फोटित नव्हे, मात्र नवर्‍याने सोडून दिलेल्या महिला) अशा महिलांचे एकत्रिकरण केले. या महिला त्यांच्या कुटुंबाच्या आधारस्तंभ आहेत. ऊन, वारा, पाऊस काय अगदी जगबुडी झाली तरीसुद्धा या बायकांच्या कष्टाचा क्षण सरत नाही. कारण, पदरी मूलबाळ आहेत, वृद्ध सासूसासरे किंवा आईबाप आहेत त्यांच्या मुखी दोन घास जायची जबाबदारी या महिलांची. कष्टाच्या रहाटगाडग्यात या सगळ्या महिलांना वर्षांचे 365 दिवस सारखेच आहेत. कल्पना करा, अशा वेळी कुणी त्यांना आठवणीने दिवाळी शुभेच्छा आणि भेटवस्तू पाठवली तर त्यांना किती आनंद झाला असेल? हा आनंद मी ‘याची देही याची डोळा’ पाहिला.
 
 
 
 
या महिलांशी संवाद साधला. तर त्यांचे म्हणणे, ”इथे मालाड मालवणी आजूबाजूच्या इमारतीमध्ये आम्ही ज्यांच्याकडे घरकामाला जातो त्यांच्याकडे आम्हाला ईदच्या दिवशी सुट्टी दिली जाते. त्यांच्याकडे दिवाळी नसते. आम्हाला दिवाळीला सुट्टी नसते. त्यामुळे क्वचितच दिवाळीच्या सणालाही माहेरी जायला भेटते. आम्ही सगळ्या घरकाम करतो.
 
 
 
 
मंगलप्रभात लोढा दादाने दिवाळीला आठवणींनी आम्हाला भाऊबीज म्हणून साडी आणि मिठाई पाठवली. खरच खूप आनंद झाला.” हे सांगताना शेकडो आयाबाया खूप आनंदात होत्या.
 
 
 
 
कार्यक्रमाला प्रज्ञा बुद्ध विहाराच्या प्रमुख शंकुतला व्हावळ उपस्थित होत्या. शंकुतला या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांसाठी अगदी जीवही ओवाळून टाकायला तयार. भाऊबीज कार्यक्रमाला सुरुवात होण्याआधी विहारातील तथागत गौतम बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जयघोष करण्यात आला. प्रार्थना करण्यात आली. यावेळी या कार्यक्रमाच्या आयोजक शुभांगी जाधव यांनी उपस्थितांना शुभेच्छा दिल्या. आपल्याकडे ‘अत्तदीप भव’म्हणतात. आपण हिमतीने आयुष्यातील अंधार दूर करून अन्याय अत्याचाराविरोधात एकजूट राहून न्यायाचा दीपोत्सव साजरा करू असे त्यांनी सगळ्यांना आवाहन केले. सारिका आणि ज्योती या दोघी जणी सामाजिक कार्यकत्यार्र् आहेत. शुभांगी जाधव यांच्या मार्गदशनाने या दोघींनी मालवणीमध्ये दोन अभ्यासिका सुरू केल्या. मालवणीमधील मागासवर्गीय, इतर मागासवर्गीय समाजातील 80 बालक या आभ्यासिकेत येतात. विशेष म्हणजे सारिका, ज्योती किंवा शुभांगी विनाशुल्क या मुलांना शिकवतात. या मागची प्रेरणा काय? विचारल्यावर शुभांगीचे म्हणणे की, ”मालवणीमध्ये भोंगा प्रकरण सुरू होते त्यावेळी मला वाटायचे मी, रोहिणी आणि माझ्यासोबतच्या ज्या चार-पाच जणी आहोत आम्ही एकटेच आहोत का? पण भाजपचे मंगलप्रभात लोढा सर आमच्या मदतीला धावले. 2020 सालापासून ते आम्हा मालवणीकरांच्या सुखदुःखात सहभागी आहेत. आज ते मंत्री झाले पण तरीसुद्धा गरीब बहिणींना विसरले नाहीत.” हे म्हणताना शुभांगीच्या डोळ्यात अश्रू तरळले.
 
 
 
 
दिवाळी
 
 
 
 
 
असो, शुभांगी मनोगत व्यक्त करताना मलाही वाटले की, आज आ. मंगलप्रभात लोढा मंत्री आहेत त्यांनी आठवणीने मालाड मालवणीमधल्या आपल्या बहिणींना भाऊबीजेची सप्रेम भेट पाठवली. स्वयम महिला मंडळाची अध्यक्ष म्हणा किंवा सामाजिक कार्यकर्ता म्हणूनही म्हणा पण माझ्यावरसुद्धा त्यांनी विश्वास दाखवला याबद्दल मलाही आनंदच आहे. पण सगळ्यात जास्त आनंद याचा आहे की, खरोखर शोषित वंचित असलेल्या मालवणीमधल्या या बहिणींच्या चेहर्‍यावर समाधान आणू शकलो. अर्थात या कार्यक्रमाने महिलांच्या आयुष्यातले प्रश्न संपणार नाहीत. मात्र, शुभांगीने म्हटल्याप्रमाणे एकत्रित राहून त्या येणार्‍या प्रत्येक समस्येवर मार्ग तर काढू शकतात. अत्याचाराच्या प्रत्येक अधांरावर मात तर करूच शकतात. मालवणी मालाडच्या बहिणींचाही हा निश्चयच आहे. त्यामुळे आ. मंगलप्रभात लोढा यांच्या संपूर्ण सहकार्याने मालवणीमधल्या भगिनींसोबत साजरी केलेली दिवाळी खरेच अविस्मरणीय आहे.
 
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

योगिता साळवी

एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत  येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्‍नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.