लखनऊ : ‘आयएएस’ पातळीवरील बड्या प्रशासकीय अधिकार्यांच्या उपस्थितीतच एका धर्मगुरूने धर्मपरिवर्तनाबाबत मार्गदर्शन केल्याची धक्कादायक बाब उत्तर प्रदेशात उघडकीस आली आहे. समाजमाध्यमांवर याबाबतची चित्रफीत ‘व्हायरल’ झाल्यानंतर हिंदुत्ववादी संघटनांकडून याबाबत आक्षेप घेण्यास सुरुवात झाली आहे.
याप्रकरणी पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे. ज्येष्ठ प्रशासकीय अधिकारी मोहम्मद इफ्तखारूद्दीन यांच्या सरकारी निवासस्थानातील ही चित्रफीत आहे. यामध्ये धर्मपरिवर्तन आणि त्याच्याशी संबंधित बाबी सांगितल्या जात असल्याचे स्पष्टपणे पाहायला मिळत आहे. यात एक धर्मगुरू धर्मपरिवर्तनाबाबत मार्गदर्शन करतानाचे सांगत आहेत.
ही चित्रफीत समाजमाध्यमावर व्हायरल झाल्यानंतर ‘मठ मंदिर सहकारी समिती’चे उपाध्यक्ष भूपश अवस्थी यांनी मोहम्मद इफ्तखारूद्दीन यांच्यावर हिंदुत्वविरोधी कारवाया करण्याचा आरोप केला आहे. यासंदर्भात कानपूरचे पोलीस आयुक्त असीम अरुण गावे यांनी अतिरिक्त उपायुक्त सोमेंद्र मीणा यांना या प्रकरणाच्या सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत.