मुंबई - काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यानंतर आता ट्विटरने काँग्रेस पक्षाचे अधिकृत ट्विटर हँडलही लॉक केले आहे. याचा खुलासा काँग्रेसनेच केला आहे. वास्तविक, ट्विटरने त्याच्या नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल ही कारवाई केली आहे. तसेच रणदीप सुरजेवाला यांच्यासह पाच वरिष्ठ काॅंग्रेस नेत्यांची खातीही ट्विटरने लॉक केल्याचा दावा पक्षाने केला आहे.
रणदीप सुरजेवाला, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे (AICC) सरचिटणीस आणि माजी केंद्रीय मंत्री अजय माकन, लोकसभेतील पक्षाचे व्हीप माणिकम टागोर, आसामचे प्रभारी आणि माजी केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह आणि महिला काँग्रेस अध्यक्षा सुष्मिता देव. याशिवाय पक्षाचे प्रवक्ते गौरव वल्लभ यांचे ट्विटर अकाऊंट लॉक करण्यात आले आहे. काँग्रेसने या प्रकरणाची माहिती फेसबुकद्वारे दिली आहे. काँग्रेसने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, तुरुंगात टाकल्यावर त्यांचे नेते घाबरले नाही, तर आता ट्विटर अकाउंट बंद होण्याची भिती काय असेल.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी दिल्लीत बलात्कार करुन हत्या करण्यात आलेल्या कुटुंबाची भेट घेतली होती. त्याचे छायाचित्र ट्विटरवर शेअर केले होते. यावर राष्ट्रीय बाल संरक्षण आयोगाने (एनसीपीसीआर) या प्रकरणाची दखल घेतली आणि ट्विटरला राहुल गांधी यांच्यावर कारवाई करण्यास सांगितले. यानंतर ट्विटरने राहुल गांधी यांचे खाते लॉक केले. यासंदर्भात काँग्रेसचे सोशल मीडिया प्रमुख रोहन गुप्ता यांनी ट्विटरवर सरकारच्या दबावाखाली काम केल्याचा आरोप केला आहे. ते म्हणाले की त्यांनी यापूर्वीच भारतभरातील त्यांचे नेते आणि कार्यकर्त्यांचे ५ हजार अकाऊंट ब्लॉक केले आहेत.