नवी दिल्ली : पाकिस्तानातील सिंध प्रांतात तब्बल ६० हिंदूंचे बळजबरी मुस्लीम धर्मांतरण करण्यात आले आहे. त्यामुळे अल्पसंख्याकांचे रक्षण करण्यास इमरान खान सरकार जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. पाकिस्तानात एकूण २२ कोटी लोकसंख्येपैकी हिंदूंची लोकसंख्या सुमारे ४५ लाख आहे.
जास्तीत जास्त हिंदू हे पाकमधील सिंध प्रांतात राहतात, तेथे सध्या त्यांचे बळजबरी धर्मांतर करण्याच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. नुकतेच तेथे नगरपालिका अध्यक्षांच्या उपस्थितीत ६० हिंदूंचे बळजबरी धर्मांतर करण्यात आले आहे. धर्मांतरण करणाऱ्या मौलवीने बिगरमुस्लिमांना मुस्लीम करणे हेच मुस्लिमांचे कर्तव्य असल्याचे वक्तव्य यावेळी केले.
सिंध प्रांत सध्या हिंदूंवरील अत्याचाराचे प्रमुख केंद्र बनले आहे. यापूर्वी मार्च महिन्यात कंधकोट येथे एका १३ वर्षीय हिंदू मुलीचे अपहरण करून तिचे जबरदस्ती धर्मांतर करण्यात आले होते. मात्र, एरवी भारतात अल्पसंख्याकांवर अत्याचार होण्याचा कांगावा करणाऱ्या आंतरराष्ट्रीय संघटना आणि भारतातील विरोधी पक्ष याकडे मात्र सोयीस्कर दुर्लक्ष करताना दिसतात.