‘जें जें आपणासि ठावें। ते ते इतरांसी सांगावें। शहाणें करूनि सोडावें। सकळ जन॥’ ही उक्ती सावरकर अंदमानातही जगून दाखवतील, याची कुणी कल्पनाही केलेली नव्हती. पण, सावरकरांनी समर्थ वचन सिद्ध करून दाखवलं. राष्ट्रकार्य केवळ शस्त्र हाती घेतल्यानंच होतं, असं नाही. एक एक माणूस घडवणं हीसुद्धा राष्ट्रभक्तीच आहे, हे त्यांनी त्यांच्या अंदमानच्या वास्तव्यात दाखवून दिलं.
मानसिकदृष्ट्या गांजलेल्या, जगण्याची आशा सोडून दिलेल्या, प्रेरणाहीन, निराश, हताश, पिचून गेलेल्या आणि थकून गेलेल्या माणसांच्या सहवासात फार मोठा काळ सावरकरांनी व्यतीत केला. मानवी मनाच्या जवळपास सगळ्या नकारात्मक अवस्था त्यांनी पाहिल्या, जवळून अनुभवल्या. माणसाची प्रेरणाच संपवून टाकली की, बाकी काही उरतच नाही, हे सत्य ते ‘याचि देही, याचि डोळा’ पाहत होते.
याच वातावरणात त्यांच्यातला प्रेरणादायक, जगण्याची आशा उत्पन्न करणारा, जगण्यातलं चैतन्य पुन्हा मिळवून देणारा समुपदेशक जागा झाला असावा, असं मला वाटतं. अंदमानातल्या सावरकरांच्या आयुष्यात त्यांनी मानसिकदृष्ट्या खचलेल्या, ढासळलेल्या अनेक माणसांना धीर देऊन, मानसिक आधार देऊन, सतत संवाद साधून उभं केलं. अंदमानातल्या वास्तव्यात त्यांच्यातला साहित्यिक, कवी, समाजसुधारक, शिक्षक जसा जागा होत गेला, तसाच त्यांच्यातला समुपदेशकसुद्धा जागा होत गेला. लौकिकार्थानं मानसशास्त्रातलं शिक्षण घेतलेलं नसेलही, पण माणसाच्या भावभावनांचा आणि वर्तनाचा सावरकरांचा अभ्यास आणि त्यांचं निरीक्षण वादातीत होतं.
‘भावनिक बुद्धिमत्ता’ ही संकल्पना साधारणपणे १9६४च्या सुमारास पहिल्यांदाच मांडली गेली आणि आपल्याला तिचा परिचय झाला तो १९९५ साली प्रकाशित झालेल्या ‘इमोशनल इंटेलिजन्स’ या डॅनिअल गोलमन यांच्या पुस्तकातून. पण, १९११ ते १९२४ या काळात सावरकर याच संकल्पनेचं प्रत्यक्ष उपयोजन करत आपल्या सहकार्यांचं मनोधैर्य वाढवत राहिले, माणसांना मानसिकदृष्ट्या खंबीर बनवत राहिले, असं अगदी लख्खपणे दिसतं. ‘कालापुढती चार पावले’ हा त्यांच्या बुद्धिमत्तेचा पैलू केवळ लेखन, क्रांतिकार्य, वैचारिक प्रबोधन, सामाजिक कार्य एवढ्यापुरताच मर्यादित राहिलेला नसून, तो त्याहीपुढे आणखी उजळत गेल्याचं आढळतं.
‘समुपदेशक सावरकर’ हा त्यांचा व्यक्तिमत्त्व गुणविशेष कुणाला पटो अथवा न पटो; पण त्याचं दर्शन मात्र या १४ वर्षांच्या कालखंडात सतत घडत राहतं. ‘त वरून ताकभात ओळखणं’ हा गुण त्यांच्यात अगदी उपजतच असल्यामुळे त्यांना अंदमानातल्या त्यांच्या सहकार्यांच्या वेदना समजत होत्या, जाणवत होत्या. त्यांचं नैराश्य, गमावलेला आत्मविश्वास या गोष्टी ते पाहत होते.
इंदुभूषण राय नावाचा एक कैदी सावरकरांचा सहकैदी होता. ‘माणिकतोळा कटा’त त्याला दहा वर्षांची शिक्षा झाली होती. कोलूची शिक्षा त्यालाही मिळालेली होती. पण, आजारपणातही त्याला बारीनं घाण्याला जुंपलं. अनन्वित शिव्याशाप आणि शारीरिक अत्याचार यांनी इंदुभूषण पार वैतागून गेला. तात्या मात्र त्याला पुष्कळ धीर देत असत. “ही असली मानहानी सहन करण्यापेक्षा मेलेलं बरं,” असं इंदुभूषण म्हणे. “अरे; पण तुला तर दहाच वर्षांची शिक्षा आहे. माझ्याकडे पाहा. मला तर दोन-दोन जन्मठेपांची ५० वर्षांची शिक्षा.” तात्या त्याला खंबीर बनवण्याचा प्रयत्न करत. पण, इंदुभूषण विटला होता. “अरे, जरा हा त्रास सहन कर.
तू लवकर सुटशील. या परिस्थितीचा अतिविचार करू नकोस. तू अजून तरुण आहेस, माझ्यापेक्षा लवकर सुटशील. जरा धीरानं घे. स्वतःच्या मनाला समजाव. आता कष्ट आहेत खरे; पण तरीही सहन कर. आपल्या देशाला तुझी गरज आहे, अजून पुढं खूप काम करायचंय.” सावरकर त्याला सांगत. बारीच्या नजरेतून सुटून जे काही मोजकेच क्षण मिळत, त्यात ते इंदुभूषणला समजावत. पण, काही दिवसांनी त्यांना बातमी समजली की, कोठडीतल्या खिडकीच्या गजाला स्वतःच्याच कपड्यांचा गळफास तयार करून इंदुभूषणनं आत्महत्या केली! त्याच्या मरणाचंही राजकारण करण्याचा प्रयत्न झाला. इंदुभूषणने कष्टांना, यातनांना कंटाळून नव्हे, तर वेडाच्या भरात आत्महत्या केली, अशी वदंता पसरवण्याचा बारीने प्रयत्न केला.
पण, सावरकरांनी मात्र या घटनेचा फार पाठपुरावा केला. चौकशीदरम्यान इंदुभूषणची मानसिक स्थिती त्यांनी समोर आणली आणि अन्य साक्षीदारांचेही समुपदेशन करून, त्यांना धीर देऊन, मानसिक बळ देऊन खरी साक्ष देण्यास तयार केले. इंदुभूषणशी सावरकर स्वतः बोललेले होते आणि त्यानेच त्यांना, “अशा नरकासारख्या परिस्थितीत हाल सहन करत मी दहा वर्षे जगू शकत नाही,” असं स्पष्ट सांगितलं होतं. सावरकरांची त्याच्या मानसिकतेविषयीची आणि त्यानं हा निर्णय कोणत्या भावनिक परिस्थितीत घेतला याविषयीची मांडणी इतकी पक्की आणि आताच्या भाषेत ‘फुलप्रूफ’ होती की, बारीलासुद्धा त्यांची जबरदस्त भीती बसली होती.
सावरकरांच्या या भूमिकेचा फार मोठा परिणाम झाला आणि अन्य बंद्यांवर सकारात्मक प्रभाव पडला. इंदुभूषण प्रकरणात बारीच्या मुस्कटदाबीला किंवा दमदाटीला कुणीही बळी पडले नाही आणि चार-पाच राजबंदी इंदुभूषणच्या आत्महत्येचं सत्य स्पष्टपणे सांगत राहिले. सावरकरांनी एक-एक माणूस खंबीर बनवायला सुरुवात केली आहे आणि आता हे राजबंदी आणखीही वास्तव गोष्टी स्पष्टपणे समोर आणण्याइतपत कमालीचे निर्भीड झाले आहेत, याची जाणीव बारीला झाली. सावरकरांना इतरांपासून कितीही दूर ठेवण्याचा प्रयत्न केला तरी अवघ्या काही सेकंदांमध्येसुद्धा कमालीचा प्रभावी संवाद साधण्याच्या तंत्रावर त्यांची हुकूमत आहे, हे या प्रसंगात बारीच्या लक्षात आलं.
उल्हासकर दत्त हाही सावरकरांचा अंदमानातला सहकारी. अंदमान हा नरक कसा आहे, याविषयी त्याने लिहून ठेवलं आहे. “आपल्या देशात तेलाच्या घाण्याला बैलाला जुंपतात. बैल दिवसभर घाणा फिरवत राहिला तरीही तो जास्तीत जास्त १६ पौंड तेल काढू शकेल. पण, इथं अंदमानात मात्र तेलाच्या घाण्याला बैलाऐवजी माणसं जुंपली जातात आणि त्यांच्याकडून दिवसभरात ८० पौंड तेल पिसून घेण्यात येतं. फक्त जेवणाचा वेळ सोडला तर बाकी अखंड घाणा फिरवत राहावं लागतं. जराही रेंगाळून चालत नाही. जर कुणी थांबला, तर बाजूच्या ऑफिसरच्या हातातल्या दांडक्याचा रट्टा आपल्या पाठीवर बसलाच. तरीही एखादा अतिश्रमानं किंवा ग्लानी येऊन ढेपाळलाच तर त्याला घाण्याच्या दांड्याला बांधायचं आणि इतरांना घाणा फिरवायला लावायचं.
हा आधीच थकला-भागला माणूस त्या दांडक्याबरोबर फरफटत जाई आणि त्याचं संपूर्ण अंग ठेचकाळून रक्तबंबाळ होई, डोकं धडाधड आपटून तोंड फुटे. रोज थकून कोठडीत जाऊन पडायचं, दुसर्या दिवशी सकाळी उठून पुन्हा तेच. अशीच किती वर्षे गेली. एके दिवशी कारागृहातून बाहेरच्या कामावर पाठवण्याचा हुकूम आला. पण, ते काम यापेक्षाही भयंकर होतं. ओल्या विटा वाहण्याचं आणि उंच टेकडीवरच्या साहेबांच्या बंगल्यावर कावडीमध्ये पाणी नेऊन पोहोचवण्याचं काम. अनेक दिवस तेही काम करून करून मी थकलो आणि एके दिवशी कामास नकार दिला. उल्हासकर वर खटला भरण्यात आला. बारीने तीन महिने अधिक सक्त कष्टांची शिक्षा दिली.”
“तुम्ही माझे तुकडे तुकडे केलेत तरीही मी काम करणार नाही,” असं म्हणून त्याही कामास त्याने नकार दिला. बारीची खप्पामर्जी झाली आणि उल्हासकरला आठ दिवस हातकडीत टांगण्यात आलं. त्याला ताप चढू लागला. ताप १०७ पर्यंत चढला, तरीही बारीने त्याला हातकडीतून सोडलं नाही. उल्हासकर तापानं फणफणून भयानक ओरडू लागला, किंकाळ्या फोडू लागला, त्याला भ्रम होऊ लागले. त्याला भयंकर आकड्या येऊ लागल्या आणि उत्तेजना इतकी वाढली की, तो दहा-दहा जणांनाही आवरेना
. उन्मादाच्या असह्य यातना भोगताना तो कर्कश किंकाळ्या फोडी, मधूनच उन्मत्तपणे हसे. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं, तर तो खरोखरच मनोरुग्ण झाला आहे की ढोंग करत आहे, याची सत्यता तपासण्यासाठी वैद्यकीय अधिकार्यानं त्याला विजेचे झटके दिले. त्या क्रूर छळानं उल्हासकर बेशुद्धावस्थेत गेला आणि पुढचे तीन दिवस तसाच बेशुद्धावस्थेत राहिला. पुढे आठ-दहा दिवसांनी त्याला पुन्हा भावनांचे कढ अनावर होऊ लागले आणि त्यातच त्याने गळफास घेण्याचा प्रयत्न केला. पण, पहारेकर्यांनी त्याला खाली उतरवलं.
पुढे एका तुरुंग पर्यवेक्षकानं त्याला पुष्कळ समजावून सांगून नैराश्यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला आणि कष्टांपासून सुटका व्हावी म्हणून मनोरुग्णालयात दाखल होण्याचा सल्ला दिला. त्यानं तो स्वीकारला. पुढची जवळपास १२-१३ वर्षं अंदमान आणि मद्रास (आताचे चेन्नई) इथल्या मनोरुग्णालयात कितीतरी मनोरुग्णांच्या सान्निध्यात राहून शेवटी उल्हासकर दत्तची सुटका झाली. उल्हासकर वेडाचं ढोंग करत होता, अशी बारीची पुढे कितीतरी दिवस समजूत होती.
बारीच्या आत्यंतिक कष्ट लादण्याच्या आणि बंद्यांचे मानसिक खच्चीकरण करण्याच्या दुष्टबुद्धीमुळेच उल्हासकरची अशी अवस्था झाली आहे, या मतावर तात्या ठाम होते. नेमक्या कोणत्या गोष्टींचा माणसांवर प्रचंड मानसिक ताण येतो आणि त्यांचा धीर कसा सुटतो, याविषयी त्यांनी खूप अभ्यास केल्याचं जाणवत राहतं.
प्रत्येक घटनेविषयी चौकस विचार कसा करावा, त्यामागचं तर्कशास्त्र काय, आपलं म्हणणं कसं मांडावं, आपण वेगवेगळ्या कोठड्यांमध्ये जरी राहत असलो तरीही आपली वैचारिक बैठक आणि मानसिकता यांच्यामध्ये एकवाक्यता कशी आणावी, याकरिता सावरकरांनी खूप प्रयत्न केले.
‘वैयक्तिक आणि सामूहिक चर्चा’ हे माध्यम त्यांनी फार प्रभावीपणे वापरलं. जनभावना तयार करण्याकरिता हे समुपदेशन आवश्यक तर होतंच. पण, त्याहीपेक्षा आपण या अत्याचारांच्या डोक्यावर पाय देऊन उभे राहू शकतो, हा आत्मविश्वास देण्यासाठीही ते महत्त्वाचं ठरलं. आताच्या व्यवस्थापन शास्त्रात शिकवली जाणारी संघबांधणी (टीम बिल्डिंग), ठामपणा (assertiveness), आत्मविश्वासाची उभारणी (सेल्फ कॉन्फिडन्स), मानसिक संघर्षाचं व्यवस्थापन (conflict management), प्रभावी संवाद (effective communication) ही कौशल्यं सावरकरांनी अंदमानात सहकार्यांमध्ये रुजवायला सुरुवात केली.
नंदगोपाळ हेही सावरकरांचे सहकैदी. बारीला जागोजागी त्याच्याच शब्दात पकडण्याचा उद्योग त्यांनी अगदी सुखेनैव चालवला होता. वरकरणी सज्जन, पापभिरू असल्याचं सोंग एखाद्या निष्णात अभिनेत्यासारखं उठवून त्याचा (बारीचा) चारचौघात पाणउतारा करण्याची एकही संधी ते सोडत नसत. सकाळी उठून जमेल तितकं काम करावं, हौदावर जाऊन यथेच्छ आंघोळ करावी आणि निवांतपणे जेवायला बसावं. “एक घास किमान दहादा तरी चावून खाल्ला पाहिजे; अन्यथा खाल्लेल्या अन्नाचं पचन नीट होत नाही” असं स्पष्ट सांगून, हा मनुष्य सावकाश तासन्तास जेवत असे. बारीनं किंवा पर्यवेक्षकांनी कितीही थयथयाट केला तरी त्याकडे ते किंचितही लक्ष देत नसत. जेवणानंतर बंद्यांना घाण्याला जुंपलं जात असे. पण, नंदगोपाळ घाण्याजवळ घोंगडी अंथरून निवांतपणे दुपारची झोप काढत. हवालदार, जमादार आरडाओरडा करत.
पण, जेवणानंतर दुपारी वामकुक्षी घेतलीच पाहिजे, असं वैद्यकशास्त्र सांगतं, असं सांगून पुन्हा पांघरूण ओढून झोपून जात. अन्य बंदीवान या सगळ्या दृश्यावर पोट धरधरून हसत. बारीनं दमदाटी करण्याचा प्रयत्न केला. पण, नंदगोपाळनं त्याकडे साफ दुर्लक्ष केलं आणि “मी माणूस आहे, बैल नाही. असली गुरांसारखी कामं मी करत नाही, जा..” असं धडधडीत सांगून विषय संपवून टाकला....! नंदगोपाळ ‘आपण त्या गावचेच नाही’ अशा आविर्भावात राहत असे. नंदगोपाळ मानसिक रुग्ण आहे, अशी आवई उठवण्याचा बारीनं फार प्रयत्न केला. पण, “मला तर ते अतिशय सुशिक्षित, सभ्य आणि उत्तम कुळातील दिसतात” असं सांगून तात्यांनी बारीच्या आरोपामधली हवाच काढून टाकली. बारी संतापानं चडफडत राहण्याव्यतिरिक्त दुसरं काहीही करू शकला नाही.
नानी गोपाळ, उपेंद्रनाथ बॅनर्जी, सचींद्रनाथ संन्याल, सचींद्रनाथ बक्षी, प्राध्यापक परमानंद, भानसिंग, जोतीशचंद्र पाल... किती नावं घ्यावीत! ही माणसं अपमानास्पद वागणुकीनं आणि छळवादानं खचून गेलेली होती. पण, तात्यांनी त्यांना सावरलं, आधार दिला, पुन्हा उभं केलं. आपल्या राष्ट्रभक्तीच्या भावनेपोटी ही माणसं अंदमानात दुर्दैवाचे दशावतार भोगत होती. आपल्या मातृभूमीवरच्या प्रेमाची, श्रद्धेची फार मोठी किंमत या सगळ्यांना मोजावी लागली.
राष्ट्रीयहितासाठी ज्यांना आठ दिवससुद्धा घरी बसवत नाही, सामाजिक सुरक्षेसाठी साधे सोपे नियम पाळता येत नाहीत, त्यांना या विभूतींच्या कार्याचं कसलं कौतुक? यांना आपण काळाच्या ओघात, सत्ताकारणाच्या लोभात आणि मतपेट्यांच्या मोहात विस्मृतीच्या पडद्याआड ढकलून दिलं, म्हणूनच कविवर्य कुसुमाग्रजांच्या लेखणीतून ‘स्वातंत्र्यदेवीच्या विनवणीला’ अवतारावं लागलं. असे वीर ज्या भूमीत जन्माला येतात, त्या भूमीत स्वातंत्र्यदेवीची विनवणी शब्दबद्ध करावी लागते, हे आपलं करंटेपण..!
मयुरेश डंके