अंदमानच्या बंदीगृहात राजबंद्यांना अत्यंत कष्टकारक, तापदायक आणि अन्यायकारक जीवन कसं जगावं लागत होतं, ते दर्शविण्यासाठी सावरकरांनी ’काळे पाणी’ ही कादंबरी लिहिली. ऑगस्ट १९३६च्या ‘मनोहर’ मासिकातून ती प्रथम क्रमशः प्रसिद्ध झाली. त्यानंतर १९३७ पासून या कादंबरीच्या अनेक आवृत्त्या निघाल्या. ’काळे पाणी’ या कादंबरीचे कथानक केवळ काल्पनिक नाही, ते एका बंदीवानाच्या न्यायालयातील अभियोगावर आधारलेले आहे.
काळे पाणी! ज्याच्या केवळ उच्चारानेच अंगावर काटा यावा असे हे शब्द! या दोन शब्दांनी स्वातंत्र्यपूर्व काळात कित्येकांच्या हृदयाचा थरकाप उडवला, अनेकांच्या जीवनेच्छा संपवून टाकल्या आणि असंख्यांना मरणप्राय यातना दिल्या. हे सारं स्वातंत्र्यवीर सावरकरांच्याही वाट्याला आलं. काय होता त्यांचा अपराध? आपल्या मातृभूमीवर प्रेम करण्याच्या अक्षम्य अपराधाची शिक्षा म्हणून सावरकरांना तब्बल दहा वर्षं काळ्या पाण्यावर नरकयातना भोगाव्या लागल्या. तिथून बाहेर पडल्यानंतर त्यांनी ’माझी जन्मठेप’ हा आपल्या आत्मचरित्राचा भाग लिहिला.
या आत्मचरित्रात मुख्यतः अंदमानात अथवा काळ्या पाण्यावर सश्रम कारावासाची भयानक शिक्षा भोगणार्या राजबंद्यांचं विदारक जीवन सावरकरांनी मांडलं. त्यामध्ये आपण भोगलेल्या यातना, आपला व्यक्तिगत संघर्ष मांडण्यापेक्षा इंग्रज सरकारद्वारे राजबंद्यांना किती क्रूर, अमानुष वागणूक दिली जाते, हे लोकांसमोर येऊन त्यांनी जागृत व्हावं, इंग्रज सरकारविरुद्ध त्यांच्या मनात संताप निर्माण व्हावा आणि स्वातंत्र्यचळवळीत सक्रिय होण्याची प्रेरणा त्यांना मिळावी, हा सावरकरांचा हेतू होता. तो हेतू साध्य होत असल्याचं दिसल्यामुळे इंग्रज सरकार बिथरलं आणि ’माझी जन्मठेप’ पुस्तकावर दि. १७ एप्रिल, १९३४ रोजी बंदी घालण्यात आली.
ही बंदी उठवावी म्हणून त्यावेळी प्रयत्न करत असतानाच, ती उठली नाही तरी आपला हेतू तर साध्य झालाच पाहिजे, तेव्हा त्यासाठी आता दुसरा मार्ग शोधून काढावा, या विचाराने अंदमानच्या बंदीगृहात राजबंद्यांना अत्यंत कष्टकारक, तापदायक आणि अन्यायकारक जीवन कसं जगावं लागत होतं, ते दर्शविण्यासाठी सावरकरांनी ’काळे पाणी’ ही कादंबरी लिहिली. ऑगस्ट १९३६च्या ‘मनोहर’ मासिकातून ती प्रथम क्रमशः प्रसिद्ध झाली. त्यानंतर १९३७ पासून या कादंबरीच्या अनेक आवृत्त्या निघाल्या. ’काळे पाणी’ या कादंबरीचे कथानक केवळ काल्पनिक नाही, ते एका बंदीवानाच्या न्यायालयातील अभियोगावर आधारलेले आहे. वीर सावरकरांच्या टाचणांत तसा उल्लेख आहे. कादंबरीतील पात्रांची नावे (रफिउद्दीन, योगानंद, मालती आदी) काल्पनिक असली तरी ती त्या अभियोगांतील मूळच्या नावांशी मिळतीजुळतीच आहेत, असा उल्लेख या कादंबरीच्या सातव्या आवृत्तीच्या प्रस्तावनेत बाळ सावरकरांनी केला आहे.
त्याचबरोबर त्यांनी आणखी एक महत्त्वपूर्ण नोंद केली आहे. सुप्रसिद्ध गायक आणि चित्रपट निर्माते सुधीर फडके यांनी या कादंबरीवर चित्रपट काढण्याचं ठरवलं होतं. पण, नियंत्रक मंडळाने त्यातील रफिउद्दीन हे मुसलमानी नाव पालटण्याचा आग्रह धरला, तशी अट सुचवली. त्याप्रमाणे नाव पालटण्याची अनुज्ञा वीर सावरकरांकडे मागण्यात आली असता त्यांनी निक्षून सांगितलं की, “असे नाव पालटण्यास म्हणजे मुसलमानी नाव काढून हिंदू नाव घालण्यास माझी संमती नाही. काही मुसलमान सुष्ट असतात, साधूवृत्तीचेही असतात, असे दाखविणे चित्रपटाच्या दृष्टीने अत्यावश्यक असेल तर तुम्ही तसे नवे पात्र हवे तर घाला. पण, मुसलमानी नाव पालटण्यास माझी अनुमती नाही!” आज मूठभर मतांसाठी अल्पसंख्याकांचं फाजील लांगूलचालन करणार्या नेत्यांसाठी सावरकरांची ही भूमिका म्हणजे एक सणसणीत चपराक आहे.
सावरकरांच्या इतर साहित्याप्रमाणेच या कादंबरीतील भाषाही सुरुवातीला समजायला थोडी क्लिष्ट वाटते. पण, एकदा गोडी निर्माण झाली, त्यातलं सौंदर्य उमजलं की तीच भाषा, लेखनशैली आपल्याला खिळवून ठेवते. ’काळे पाणी’ ही मालती आणि किशन या दोन जीवांची प्रेम कहाणी. खरंतर सावरकरांसारख्या कठोर, कणखर वीराने प्रेमावर वगैरे लिहिलं असावं, यावर त्यांचं कर्तृत्व जाणणार्या, परंतु त्यांच्या साहित्यापासून अलिप्त असलेल्या व्यक्तीचा प्रथम विश्वासच बसत नाही. पण, युरोपात जाऊन इंग्रज सरकार उलथवून लावण्याच्या योजना आखणारे, मार्सेलिसला ती ऐतिहासिक उडी मारणारे, अंदमानच्या तुरुंगात हाल-अपेष्टा सोसत असताना ’अनादि मी, अनंत मी’ अशी सिंहगर्जना करणारे वीर, पराक्रमी, साहसी, मृत्युंजयी सावरकर जसे खरे तसेच आपल्या अलवार लेखणीतून दोन जीवांची उत्कट प्रेमकहाणी फुलवणारे तरल, संवेदनशील सावरकरही खरेच!
ज्या उत्कटतेने आणि जिवंतपणाने सावरकरांनी ’काळे पाणी’ कादंबरीतील मालती, किशन, रफिउद्दीन, योगानंद ही पात्रे उभी केली आहेत, त्याला खरोखर तोड नाही. यासंदर्भात त्याकाळी सावरकरांना एका वाचकाने पाठवलेली प्रतिक्रिया फार बोलकी आहे. वाचासुंदर नावाच्या एका वाचकाने सावरकरांना पाठवलेल्या पत्रात लिहिलं आहे, “आपले लेखन एरवी कितीही सुंदर असले तरी थोडे रुक्षच असते ही माझी कल्पना. आपली कादंबरीही तशीच असेल असे वाटले; पण पहिले वाक्य वाचले तो दुसरे वाचावे असे वाटले आणि दुसरे वाचतो तो सबंध परिच्छेद वाचावा असे वाटले. मग अधिकार्यांकडे दुर्लक्ष करून कित्येक पाने तत्काळ वाचून काढली. आपल्या मालतीने योगानंदाला जितका चटका लावला नसेल तितका मला लावला आहे. आपल्या रफिउद्दिनने माझा ग्रह पार पालटून टाकला. आजपर्यंत मी इतक्या कादंबर्या नि लघुकथा वाचल्या आहेत, पण मालतीने माझे हृदय विदारून टाकले.” एवढी एक प्रतिक्रिया वाचली तरी संपूर्ण कादंबरी वाचण्याचा मोह आपल्याला व्हावा!
’काळे पाणी’ या कादंबरीची नायिका म्हणजे अवघ्या १४-१५ वर्षांची एक अल्लड, कोवळी, सुंदर, मनस्वी ’मालती.’ पहिल्याच प्रसंगात सैन्यातला आपला मोठा मुलगा हरवलेला असल्याने आपल्या एकुलत्या एक मुलीवर, मालतीवर जीव ओवाळून टाकणारी आई आणि आपल्या आईच्या हृदयात दुःखद आठवणी दाटून येऊ नयेत, तिच्या डोळ्यात पाणी येऊ नये यासाठी धडपडणारी मालती, त्यांच्यातला तो विलक्षण स्नेहबंध आपल्या मनाचा ठाव घेतो. पुढे रफिउद्दीन नावाच्या नृशंस राक्षसाद्वारे मालतीची होणारी फसवणूक, यादरम्यान किशन-मालतीची झालेली ओझरती ओळख आणि नंतर अकल्पित भयावह संकटांना तोंड देत असताना त्यांचं एकमेकांवर जडलेलं प्रेम, आपल्या मनात त्यांच्याविषयी आत्मीयता निर्माण करतं.
परिस्थितीमुळे दोघांची काळ्यापाण्यावर झालेली रवानगी, परस्परांपासून होणारी ताटातूट, अंदमानातील भयाण आणि भेसुर जीवन, रोजच होणार्या मरणयातना आणि तरीही कायम असणारी एकमेकांविषयीची ओढ आपल्या डोळ्यात नकळत पाणी आणल्याशिवाय राहत नाही. किशन आणि मालतीची काळ्या पाण्यावरून सुटका होते का? ते परत एकमेकांना भेटतात का? रफिउद्दीनबरोबर त्यांची पुन्हा गाठ पडते का? मालतीच्या हरवलेल्या भावाचं काय होतं? त्यांच्या प्रेमकहाणीचा सुखांत होतो की ती एक शोकांतिका ठरते? या सर्व प्रश्नांची उत्तरं मिळवत असताना आपण अधिकाधिक अंतर्मुख होत जातो. सुरुवातीपासून शेवटपर्यंत वाचकाला खिळवून ठेवण्यात ही कादंबरी यशस्वी होते. अगदी आत्ताच्या एखाद्या आधुनिक ’सस्पेन्स थ्रिलर’बरोबर तुलना करता यावी आणि त्यातही बहुतेक तीच वरचढ ठरावी, इतकी ही गूढरम्य कादंबरी सावरकरांनी सरस रंगवली आहे.
आजही अस्तित्वात असणारे अनेक ’स्टिरिओटाइप्स’सुद्धा सावरकरांनी या कादंबरीमधून मोडून काढले आहेत. कादंबरीची नायिका मालती ही अत्यंत कणखर, सक्षम आणि स्वसामर्थ्यावर विश्वास असणारी स्त्री आहे. एका दुसर्या पात्राद्वारे तिचं ’मनमोकळी पण विनयशील, करारी पण प्रेमळ’ असं वर्णन केलं आहे. तिचं मनोबल अढळ आहे. एका क्रूर गुन्हेगाराद्वारे तिचं अपहरण होऊन तिच्यावर वारंवार बलात्कार करण्यात आला आहे. आज समाजाला भेडसावणार्या अनेक प्रश्नांपैकी एक भीषण प्रश्न म्हणजे बलात्कार. या स्वतंत्र देशात अजूनही स्त्रियांवरच्या अत्याचाराच्या घटनांना आळा बसलेला नाही आणि समाज या प्रश्नाबाबत केवळ बघ्याच्या भूमिकेत आहे. आपण या अत्याचारांना बळी पडलेल्या स्त्रियांना न्याय मिळावा, यासाठी मोर्चे काढतो, मेणबत्त्या लावतो. पण, त्या स्त्रियांच्या मानसिक आधारासाठी काही केलं जातं का? त्यांनी आयुष्यात पुन्हा सक्षमपणे उभं राहावं यासाठी प्रयत्न केले जातात का? अर्थात, अजिबात प्रयत्न होत नाहीत असं नाही, पण त्यांना मर्यादा आहेत. अजूनही आपला समाज एखाद्या बलात्कारितेला सन्मानाने स्वीकारत नाही, ही वस्तुस्थिती आहे.
अशा दुर्दैवी प्रसंगांना बळी पडलेल्या स्त्रियांना तर आयुष्यभर स्वतःची घृणा वाटते. पण, सावरकरांनी जवळजवळ १०० वर्षांपूर्वी साकारलेली ’मालती’ अशी नाही. आपली काहीही चूक नसताना आपल्याला या असह्य अत्याचाराला बळी पडावं लागलं, याचं मोठं शल्य तिच्या मनाला बोचतं, पण ती कुठेही स्वतःला ’पतित’ किंवा ’भ्रष्ट’ समजत नाही. आपल्या देहाचं पावित्र्य भंगलं तेव्हा आता जगण्यातच अर्थ नाही, असं म्हणून आत्मघात करण्याचा प्रयत्न ती करत नाही. उलटपक्षी, संधी मिळताच तिच्यावर अत्याचार करणार्या गुलाम हसनचा किशनच्या मदतीने ती खून करते. आपल्या सख्या सोबत पळून जाताना ’आपण आता त्याच्या प्रेमाला पात्र नाही’ असा विचार ती करत नाही. आपल्यावर गुदरलेल्या अकल्पित प्रसंगासाठी दैवाला, परिस्थितीला, स्वतःला दोष देत कुढत बसण्यापेक्षा आपल्यावर अत्याचार करणार्या नराधमाचा प्रतिशोध घेऊन स्वतःची सुटका करून घेणारी मालती म्हणजे आजच्याही स्त्रियांसाठी फार मोठा आदर्श आहे!
मालतीवर बलात्कार झालेला असतानाही तिचा, तिच्या प्रेमाचा स्वीकार करताना किशन जराही कचरत नाही. किंबहुना, तिला त्यातून कसं बाहेर काढावं, कसं सावरावं याचाच सतत विचार करतो. काही वेळा तर आपण असे कुरूप आणि ती इतकी सुंदर, तेव्हा तिला माझ्याविषयी ओढ वाटेल का, असा प्रश्न त्याला पडतो. पण, त्या वेळी त्याचं मन त्याला ग्वाही देतं रूपापेक्षा शीलाचं आकर्षण अधिक गोड लागावं इतकी ती स्वतःच सुशील नि सुरुची आहेच आहे! मालतीसुद्धा किशनला प्रेमळपणे आश्वस्त करते, किशन, तुम्हा पुरुषांना रूप-रंगाची जाणीव अधिक. कारण, तुमची प्रीती तुमच्या डोळ्यांत असते, पण आम्हा ललनांची प्रीती आमच्या हृदयाच्या नयनांतून पाहते आणि म्हणूनच तिला रुप नि रंग हे दिसतात, पण शील, स्वभाव आणि सद्गुण हे विमोहवितात. प्रेम म्हणजे केवळ एकमेकांच्या गुणांवर, सौंदर्यावर आरक्त होणं नाही, तर सार्या गुणदोषांसकट एकमेकांना स्वीकारणं; किंबहुना उणीवांना काकणभर अधिक आपलंसं करणं आणि कुठलीही परिस्थिती आली तरी न डगमगता एकमेकांची खंबीर साथ देणं असतं, हे किशन आणि मालतीची निस्सीम प्रेमाची कहाणी आपल्याला शिकवते.
अर्थात ’काळे पाणी’ ही काही फक्त एक प्रेमकथा नाही. तिला इतरही अनेक कंगोरे आहेत. किशन-मालतीसह इतरही अनेक पात्रांनी कथानकात रंग भरले आहेत. त्यातीलच एक प्रमुख पात्र म्हणजे किशनला अंदमानात भेटलेले ’अप्पा!’ काळ्यापाण्यावर आल्यापासून ज्या मायेला आपण पारखे झालो, तिची उणीव भरून काढणारे हे अप्पा १८५७च्या स्वातंत्र्यलढ्यात तात्या टोपेंच्या सैन्यातून लढले होते, हे कळताच किशनला ’तो आजवरचा एक साधा म्हातारा गृहस्थ एक कसलेला झुंजार, एक वंदनीय वीर, एक पौराणिक योद्धा’ भासू लागतो. हे पात्रही काल्पनिक नाही. तसे वयाच्या ८०-८५च्या घरात असलेले दोन-तीन योद्धे सावरकर अंदमानात होते, त्या काळातही तेथे राहात होते. त्यांनी सावरकरांशी गुप्त संबंध साधला होता. अप्पा आणि किशनच्या संवादांमधून, सावरकर स्वतः ज्या गोष्टींसाठी झटले, अशा अनेक महत्त्वपूर्ण बाबी त्यांनी अधोरेखित केल्या आहेत. हिंदू समाजात समता प्रस्थापित करण्यासाठी सावरकरांनी बंदीच्या सप्तशृंखला तोडण्याचं आवाहन केलं.
स्वतः पुढाकार घेऊन रत्नागिरीत त्याचे प्रयोग घडवून आणले आणि सामाजिक समरसतेचा आदर्श प्रस्थापित केला. त्याकाळी आपली शिक्षा भोगून झाल्यानंतर अंदमानातच स्थायिक होण्याची परवानगी बंदिवानांना होती. त्यामुळे त्याठिकाणी त्यांची एक वसाहतच तयार झाली होती. त्या वसाहतीविषयी बोलताना किशन म्हणतो, “अंदमानात गेली पन्नासएक वर्षं सर्व हिंदू जाती नि सर्व प्रांतिक वर्ग सरमिसळपणे एकत्र वाढत आले. पुष्कळ प्रमाणात अस्पृश्यतेची बेडी तुटली; रोटीबंदीची निदान स्पृश्यवर्गात तर आठवणसुद्धा बुजली. बंगाली, पंजाबी, मद्रासी, मराठी, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र कोण कोण हे विचारसुद्धा बुजून निदान स्पृश्य हिंदू तेवढा तरी एकत्र जेवतो नि बहुधा अस्पृश्यही! आणि मिश्र विवाह सरसकट चालू असल्याने बेटीबंदी तुटून जातीचं नावही राहिलं नाही! जातीपाती तोडून संमिश्र विवाह केल्यास संतती निकृष्टच होणार ही भीती खोटी आहे, हे अंदमानच्या हिंदू जानपदाने सप्रयोग सिद्ध करून दिलं आहे. जे समाजाचं प्रबोधन करतं ते खरं उत्तम साहित्य, ही साहित्याची व्याख्या सावरकर सार्थ ठरवतात!”
त्याकाळी उर्दू ही राष्ट्रभाषा म्हणून लादण्याचा प्रयत्न काही वर्गांद्वारे केला जात असताना, सावरकरांनी संस्कृतनिष्ठ हिंदीचा राष्ट्रभाषा म्हणून पुरस्कार केला. किशनच्या माध्यमातून ते यावर परखडपणे भाष्य करतात, सरकारी लिखाण नि शाळाशिक्षण उर्दूतच चालवायचा सरकारी धोरणाचा हट्ट निंद्य आहे. आपला देश बलवान आणि शस्त्रास्त्रसंपन्न असावा, हा सावरकरांचा ध्यास होता. त्यासाठी त्यांनी वेळोवेळी जे इशारे दिले आणि जे अंदाज वर्तविले ते अचूक ठरले. त्यांच्या इशार्यांकडे दुर्लक्ष होताच देशाचं नुकसान झालं, याला इतिहासाची साक्ष आहे. अंदमान-निकोबार बेटं सामरिक शक्तीची केंद्र असायला हवी, असं त्यांनी सांगितलं होतं. न्यूझीलंड आणि म्यानमारकडून काही बेटांवर घुसखोरी झाल्यानंतर केंद्र सरकारच्या ते लक्षात आलं आणि नंतर तिथे सैन्याचे तळ उभारण्यात आले.
जी गोष्ट सरकारच्या लक्षात येण्यासाठी इतकी वर्षं लागली, ती सावरकरांनी तेव्हाच जाणली होती, हे किशनच्या पुढील वक्तव्यावरून स्पष्ट होतं, “मी अंदमानात उतरताच या बेटाचं ते सामुद्रिक महत्त्व माझ्या ध्यानी आलं होतं. तटबंद, शस्त्रास्त्रसंभारानेच सुसज्ज, एखाद्या पोलादी कवचासारखा दूर्भेद्य अशा जर या अंदमान बेटांचाच एक प्रचंड असा जलदुर्ग करून सोडला, तर हिंदुस्थानच्या पूर्वसमुद्रात शत्रूच्या नाविक दलाच्या वाटेत तो एक जीवघेणा सुरुंगच होऊन बसेल. ही सशस्त्र नि तटबंदी बेटं म्हणजे आमच्या पूर्वसमुद्रात वेशीवर चढविलेली एक ‘महाकाली’ तोफ आहे. पुढेमागे हे अंदमान म्हणजे हिंदुस्थानच्या पूर्वसमुद्रावर पहारा करणारा एक लढाऊ असा वैमानिक तळही झाल्यावाचून राहणार नाही.”
या देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपल्या जीवनाची राखरांगोळी करणार्या स्वातंत्र्ययोद्ध्यांची आपल्या देशात वर्षानुवर्षं झालेली उपेक्षा अत्यंत दुर्दैवी आहे. तशीच उपेक्षा त्याही काळात १८५७च्या बंडात सहभागी झालेल्या ज्या योद्ध्याच्या वाट्याला आली त्या अप्पांना किशन अतीव कृतज्ञतेने आणि अभिमानाने आश्वासित कर “अप्पा, बघा या अंदमानची वसाहत हिंदूराष्ट्राला किती महत्त्वाची आहे ते आपण सांगत होतात, नाही का? अंदमानची सारी राष्ट्रीय संपदा महत्त्वाची आहे. तथापि, या प्रकारची संपदा इतर वसाहतीतही आपल्या हिंदूराष्ट्राला लाभू शकेल. पण, जी संपदा इतर कोणत्याही वसाहतीत लाभणार नाही, अशी एक संपदा या अंदमानातच काय ती साठवली गेली आहे. या भूमीतील ती आमची अनर्घ्य ठेव म्हणजे तुम्हा सत्तावन सालच्या सहस्त्रावधी राष्ट्रवीरांची या भूमीत विखुरलेली राख हीच होय! आज हिंदू जाती अचेतन पडली आहे खरी; पण ती मूर्च्छा आहे - मृत्यू नव्हे! इतिहास तरी शपथेवर सांगत आहे की, अशा कित्येक मूर्च्छातून पुन्हा जागून उठावी अशी उज्जीवक शक्ती या हिंदू जातीत निवासात आहे, हे नक्की!
अप्पा, हेही दिवस जाणारच नाहीत म्हणून कशावरून? नवे नवे विक्रमादित्य अवतरणार नाहीतच म्हणून कशावरून? किंबहुना ही तुमची राखच त्यांच्या संभवांचं खत आहे- हमी आहे. हिंदुस्थानला अंदमान म्हणताच प्रथम होईल ती ही आठवण!” हे उद्गार आज सावरकरांच्या बाबतीत खरे ठरलेले आपण बघतो. अंदमान म्हणताच आपल्याला आठवतात ते सावरकर! अंदमानात पाऊल ठेवताच, त्या भयाण काळकोठडीत आपल्या आयुष्यातील ऐन उमेदीची वर्षं खितपत पडून आपल्याला स्वातंत्र्याचा सूर्योदय दाखवणार्या सावरकर आणि इतर स्वातंत्र्यवीरांप्रति कृतज्ञतेने आपला ऊर भरून आल्याशिवाय राहत नाही. त्यांच्या स्मृती अचेतन हिंदूंना जागृत करून त्यांच्यामधून नवे विक्रमादित्य घडवण्याची प्रेरणा देतात. आज सावरकर असते, तर आपण वर्तवलेलं भविष्य अशा प्रकारे खरं ठरलेलं बघून तेही समाधान पावले असते!
या सगळ्या उल्लेखांवरून हे लक्षात येईल की, राष्ट्रप्रेमाची-समाजोन्नतीची जी मूल्यं सावरकरांना तत्कालीन भारतीय समाजात रुजवायची होती आणि स्वातंत्र्याची विजिगीषा त्यांच्या मनात निर्माण करायची होती, त्यासाठी त्यांनी प्रेमकथेचा आधार केवळ घेतला आणि त्याला पूर्णतः न्याय दिला. अंतिमत: त्यातून त्यांना मांडायचा होता तो राष्ट्रवादच! अन्यथा ’अथक प्रयत्नांती अंदमानच्या जंगलात लाभलेलं सुखासुखी जीवन आता स्वीकारून हिंदुस्थानात परत जाण्याची जोखीम घेऊ नये’ हे आपल्या प्राणप्रिय सखीचं आर्जव नाकारत किशनने असं का म्हटलं असतं की, ‘इथे पशुपक्ष्यांच्या जोडप्यांसारखं जरी जगलो, तरी पशुपक्ष्यांसारखंच जगू, मनुष्यासारखं नाही. स्वदेशाची, स्वराष्ट्राची, मानुषकाची काही सेवा, काही देवकार्य जर हातून घडत नसेल, तर मनुष्याच्या जीवनात माणुसकी ती काय उरली?’ स्वदेशाची, स्वराष्ट्राची, मानुषकाची सेवा हेच सावरकरांचं अंतिम जीवनध्येय होतं. त्यांनी केलेला सारा खटाटोप केवळ याचसाठी होता. जे मातृभूमीच्या कामी पडणार नाही, ते सगळं त्यांच्या दृष्टीने व्यर्थ होतं. ’गुणसुमने मी वेचियली या भावे, की तिने सुगंधा घ्यावे।
जरि उद्धरणी व्यय न तिच्या हो साचा, हा व्यर्थ भार विद्येचा।’ हीच सावरकरांची भूमिका त्यांच्या साहित्यातूनही व्यक्त होते. ही कादंबरी आणि त्यातून वेळोवेळी प्रतीत होणारी ती लिहिण्यामागची सावरकरांची भूमिका. दोन्ही आपल्याला विलक्षण अंतर्मुख करतात! ’काळे पाणी’ या कादंबरीमधून सावरकरांची साहित्यिक प्रतिभा, अद्भुत कल्पनाशक्ती, तरल सौंदर्यदृष्टी, उत्कट संवेदनशीलता या सार्या पैलूंचं दर्शन होत असलं, तरी शेवटी वरचढ ठरते ती मात्र नेहमीप्रमाणे त्यांची समर्पित राष्ट्रभक्तीच! ज्या राष्ट्रभक्तीच्या पायावर सावरकरांचं साहित्य आकाराला येतं, ती राष्ट्रभक्ती त्यांच्या साहित्यामधून अगदी सहज, आपल्याही नकळत हृदयांतरित होते आणि त्या राष्ट्रप्रेमाच्या भावनेने आपणही व्यापून जातो!
- भक्ती देशमुख