ठाणे : एकीकडे कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना शिवसेना नगरसेवकाने ठाण्यात केलेल्या दारू वाटपावरून प्रचंड टीकेची झोड सोशल मिडीयावर उठली होती. याचवरून नेटकऱ्यांनी विविध मीम्स बनवून शिवसेनेच्या मद्य वाटपाला टार्गेट केले आहे. मनसेने तर 'शिवसेनेचे दारू वाटप आणि मनसेचे आमरस पुरी वाटप' अशा टॅगलाइनचे बॅनर सर्वत्र व्हायरल केल्याने शिवसैनिकांची पुरती गोची झाली आहे.
शिवसेनेचे वागळे इस्टेट विभागातील नगरसेवकाने आमदार रवींद्र फाटक यांच्या कार्यालयात काही दिवसांपूर्वी दारू वाटप केले होते. कार्यकर्त्यांना मद्य देतानाचे फोटो सोशल मिडीयावर व्हायरल झाल्याने हा प्रकार उघडकीस आला होता. याप्रकरणी एका समाजसेवकांनी ठाणे पोलिस आणि उत्पादन शुल्क विभागाकडे तक्रारही केली होती. हे वृत्त प्रसिद्ध होताच शिवसेनेच्या कृतीबाबत सर्वच राजकीय पक्षांनी तोंडसुख घेतले.
सध्याच्या सोशल मिडीयाच्या जमान्यात प्रत्येक विषयाचे मीम व्हायरल केले जातात. त्यानुसार मनसेने शिवसेनेच्या दारू वाटप कार्यक्रमाचे फोटो वापरून त्या शेजारीच नुकत्याच मनसे नेते अमित ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त संघटनेच्या वतीने करण्यात आलेल्या आमरस पुरि वाटपाच्या कार्यक्रमाचे लावले. 'फरक विचारांचा, वारसा संस्कारांचा' ही टॅगलाइन वापरून शिवसेनेला चिमटे काढण्याची संधीही मनसेने सोडली नाही.
आम्ही खंबा दिला केंद्रानं चकना द्यावा!
सतत केंद्राकडे बोट दाखवणार्या शिवसेनेला चिमटे काढण्याची एकही संधी मनसेच्या नेटकऱ्यांनी सोडली नसून आम्ही खंबा दिला, केंद्राने चकणा द्यावा, असे शालजोडीतले मिम सध्या नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहेत.