बंद दरवाज्याआड चर्चा ; निलेश राणे यांनी केला गौप्यस्फोट
मालवण : शिवसेना नेते आणि राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची रत्नागिरीत नुकतीच गुप्त भेट घेतली. माजी खासदार निलेश राणे यांनी हा गौप्यस्फोट केला आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या कोकण दौऱ्यात दोन्ही नेत्यांमध्ये २० मिनिटे चर्चा झाली. तोक्ते चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी देवेंद्र फडणवीस तीन दिवसांच्या कोकण दौऱ्यावर गेले होते.
माजी खासदार निलेश राणे यांनी सोमवारी मालवण तालुक्यातील देवबाग गावात ग्रामस्थांच्या पडझडीची पाहणी करून तात्काळ मदत सुपूर्द केली. यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना त्यानी उदय सामंत यांनी रत्नागिरीमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या घेतलेल्या भेटीचा गौप्यस्फोट केला आहे.
उदय सामंत हे देवेंद्र फडणवीस रत्नागिरी दौऱ्याच्या आधीच शासकीय विश्रामगृहात पोहोचले होते. इतरांच्या भेटीगाठी झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस आणि उदय सामंत यांच्यात बंद दाराआड चर्चा झाल्याचं कळतं. २१ मे रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा कोकण दौरा होता. परंतु त्याच्या एक दिवस आधी म्हणजेच २० मे देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी उदय सामंत रत्नागिरीत पोहोचले होते. दोघांमध्ये नेमकी चर्चा काय झाली हे अद्याप समजू शकलेले नाही.
निलेश राणे यांचा गौप्यस्फोट
माजी खासदार निलेश राणे यांनीच सामंत-फडणवीस भेट झाल्याचा गौप्यस्फोट केला. "तोक्ते चक्रीवादळाची गंभीर परिस्थिती सिंधुदुर्गात असतानाही पालकमंत्री उदय सामंत हे देवेंद्र फडणवीस यांना भेटण्यासाठी खास रत्नागिरीत गेले होते. या दोघांमध्ये बंद दरवाजाआड चर्चा झाली," असा निलेश राणे यांनी सांगितलं. ते म्हणालेत, तौक्ते चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने पूर्वतयारी म्हणून कोणतीही खबरदारी घेतलेली नाही.मुळात शासन- प्रशासनावर मंत्र्यांचा कोणताही अंकुश नाही. सिंधुदुर्गात वादळाची परिस्थिती असतानाही येथील पालकमंत्री उदय सामंत रत्नागिरी मध्ये येतात, त्याठिकाणी बंद खोलीत देवेंद्रजी यांच्याशी चर्चा करतात. सिंधुदुर्गातील जनता वादळाने होरपळली असताना आपली राजकीय समीकरणे अशी जुळतील, हे पाहण्यासाठी आमच्या जिल्ह्याचा पालकमंत्री येथील जनतेला वाऱ्यावर सोडून रत्नागिरीकडे धाव घेतो. मुळात उदय सामंत हा कधीही नेता होऊ शकत नाही तो फक्त स्वतःची कामे करणारा सोशल वर्कर असल्याची टीकाही राणे यांनी केली.