ठाणे : अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे कोकण किनारपट्टीला तौक्ते चक्रीवादळाचा तडाखा बसण्याची शक्यता वर्तविण्यात आल्याने ठाणे जिल्हा प्रशासनाने विविध उपाययोजना करण्याच्या सूचना सबंधित विभागांना दिल्या होत्या. दरम्यान, हे चक्रीवादळ गुजरातच्या दिशेने सरकत असल्याने ढगाळ वातावरणात संततधार कोसळणाऱ्या पावसासह घोंघावणाऱ्या वादळी वाऱ्यामुळे ठाण्यातील विविध भागात झाडे उन्मळून घरांचे व वाहनांचे नुकसान झाले. ठिकठीकाणी पाणी तुंबण्यासह वीज प्रवाह खंडीत झाल्याने शहराच्या पाणी पुरवठ्यावर परिणाम झाला. सुदैवाने, यात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी वादळी पाऊस आणि वृक्षांच्या पडझडीमुळे मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली.
तोक्ते चक्रीवादळाचा तडाखा पश्चिम किनारपट्टीला बसल्याने मुंबईसह ठाणे आणि पालघर जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला. हे चक्रीवादळ गुजरातच्या दिशेने सरकत नाही तोपर्यंत या जिल्ह्यांना त्याचा तडाखा बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सोमवारी सकाळपासूनच मुंबई, ठाणे, नवीमुंबई, कल्याण डोंबिवली, उल्हासनगर, मीरा-भाईंदर या परिसरात मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे ठिकठिकाणी झाडे पडणे, पत्रे उडून जाणे, विजेचे खांब कोसळणे अशा घटना घडल्या. नवी मुंबईत दुचाकीवर झाड कोसळल्याने एका व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर, उल्हासनगरमध्ये एका रिक्षेवर झाड कोसळल्याने दोन प्रवासी गंभीररीत्या जखमी झाले आहेत. मीरा-भाईंदर क्षेत्रातील उत्तनच्या समुद किनाऱ्यापासून १० नॉटिकल मैलांवर एक जहाज भरकटले होते. या जहाजावर ६ खलाशी अडकले आहेत. सध्या हे जहाज तटरक्षक दलाच्या संपर्कात असून वादळाचा जोर ओसरल्यावर ते उत्तनच्या किनाऱ्यावर आणण्याचा प्रयत्न सुरु होता.
वादळ वाऱ्यांचा ठाण्याला तडाखा
तौक्ते चक्रीवादळाच्या वाऱ्यांचा तडाखा काही प्रमाणात ठाण्याला बसला. सोसाट्याच्या वादळी वाऱ्यामुळे मोठ्या प्रमाणावर वृक्ष आणि अन्य पडझड झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले. कोरोनाचा लॉकडाऊन त्यातच चक्रीवादळ धडकल्याने रविवारी सायंकाळ पासुन सुरु झालेल्या पावसामुळे ठीकठिकाणी पाणी तुंबण्याचे प्रकार घडले. तर, शहाड -टेमघर जलकेंद्रात वीजप्रवाह खंडीत झाल्याने पाणीपुरवठाही खंडीत झाला. शहरातदेखील वीज नसल्याने इंटरनेट सेवाही कोलमडुन पडली होती. मात्र कोविड रुग्णालयांमध्ये कोणतीही असुविधा उद्भवली नसल्याचा दावा प्रशासनाने केला. वादळाच्या भीतीमुळे नागरिकांनी घरीच बसणे पसंद केले होते. दिवसभरात ठाण्यातील रस्त्यावर तुरळक वाहने दिसून आली. अनेकांनी गुंडाळून ठेवलेले छत्र्या, रेनकोट बाहेर काढले.सकाळपासूनच पावसाने जोर धरल्याने सोमवारी १०२ मि.मीटर पावसाची नोंद झाली. मान्सुनपूर्व पावसाने ठाण्यातील विशेषतः मुंब्रा येथील नालेसफाईची चांगलीच पोलखोल केली. मुंब्य्रात नाला चक्क रस्त्यावर वाहत होता.
वीज पुरवठा खंडित
चक्रीवादळमुळे ठाण्यातील काही परिसरात सकाळपासून विजेचा लपंडाव पाहायला मिळाला. नौपाडा,कोपरी, वागळे इस्टेट, घोडबंदर रोड तसेच कळवा भागातही वीज खंडित झाली होती.
उकाड्यापासून दिलासा
चक्रीवादळामुळे मे महिन्यात सुरू झालेल्या पावसामुळे वातावरणातील उष्मा गायब झाल्यामुळे नागरिकांना थोडासा दिलासा मिळाला. रविवारपासून कोसळणाऱ्या पावसाच्या सरीनी थंडावा निर्माण केला. तर काही ठिकाणी सोसाट्याच्या वाऱ्यामुळे रस्त्यावर सैरावैरा कचरा पडलेला पाहायला मिळाला.
स्थायी समिती बैठकीत वादळी पडसाद
तौक्ते चक्रीवादळामुळे ठाण्याच्या काही भागांत झाडे उन्मळून पडली असून झाडांच्या फांद्या देखील कोसळल्या.वृक्षांच्या पडझडीचे प्रकार ठाणे महानगर पालिकेचे वृक्षप्राधिकरणामुळेच झाल्याचा आरोप विरोधी पक्षनेते शानु पठाण यांनी केला.यात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी भविष्यात एखाद्याचा जीव गेला तर त्यास जबाबदार कोण ? असा सवाल करुन जर वृक्ष प्राधिकरण खात्याचे काम जर अग्नीशमन दलाकडून केले जात असेल तर हे खाते हवेच कशाला,अशा शब्दात विरोधी नेत्यांनी संताप व्यक्त केला.विशेष म्हणजे,सोमवारी स्थायी समितीच्या बैठकीत पठाण हे रस्त्यावर उभे राहुनच सहभागी झाले.त्यांनी स्थायी सभापतींना रस्त्यावर उन्मळून पडलेली झाडे ऑनलाईन दाखवून कारवाईची मागणी केली.
महापालिका आयुक्तांचे आवाहन
चक्रीवादळामुळे सोमवारी पहाटेपासून सुरु असलेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन कक्षाला भेट देवून सर्व यंत्रणांना सतर्क व सुसज्ज राहण्याचे आदेश दिले.तसेच नाल्याची साफसफाई करणे, शहरात सखल भागात पाणी साठणार नाही, धोकादायक इमारती तसेच वृक्ष पडून जीवित व वित्तहानी होणार नाही याकडे विशेष लक्ष देण्याच्या सूचना दिल्या.एमएमआर क्षेत्रात दोन दिवस अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली असून ठाणे शहरात देखील त्याचा प्रभाव जाणवत असल्याने या काळात नागरिकांनी घराबाहेर पडू नये तसेच योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन आयुक्त डॉ. शर्मा यांनी केले.तसेच,कुठल्याही प्रकारच्या आपत्कालीन परिस्थितीमध्ये मदतीसाठी प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन कक्षाशी संपर्क साधावा.असेही त्यानी सागितले.
वृक्ष पडझडीमुळे वाहने क्षतीग्रस्त
पाऊस व वादळी वाऱ्यामुळे ठाण्यात ६१ वृक्ष उन्मळून पडले तर, २१ वृक्षांच्या फांद्या कोसळल्याने काही वाहने क्षतीग्रस्त झाली.पालिकेचे आपत्ती व्यवस्थापन आणि अग्निशमन दलाने उन्मळून पडलेल्या वृक्षांना बाजूला केले. पावसामुळे कोरम मॉल,कोर्ट नाका आणि राबोडी परिसरात पाणी साचले होते.ठाणे नौपाडा, ब्राह्मण सोसायटी येथे द्वारका इमारतीत असलेले मोठे झाड कोसळल्याने इमारतीच्या संरक्षक भितींचा काही भाग तसेच, रामदास निवास आणि बिवलकर इमारतीचे व वाहनांचे नुकसान झाले.
सुदैवाने अनर्थ टळला...
ठाणे महापालिकेच्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील प्रवेशद्वाराच्या कमानीवर सोमवारी सायंकाळी झाड कोसळून कमान तुटली.सुदैवाने कमानीखाली कोणीही उभे नसल्याने अनर्थ टळला.तर,दुसऱ्या घटनेत नौपाडयात भलामोठा वृक्ष कारवर कोसळला.या कारच्या आत डॉ. रितेश गायकवाड अडकुन पडले होते.अग्निशमन दलाने झाड कापून त्यांची सुटका करीत रुग्णालयात दाखल केल्याने आणखी एक अनर्थ टळला.