वाशिम - वाशिम जिल्ह्यातील मालेगाव तहसीलमध्ये उजलका रेल्वे फार्म कॉम्प्लेक्समध्ये पाण्याच्या शोधात आलेल्या ११ नीलगायी विहिरीत पडल्या. या नीलगायींकडे कोणाचे लक्ष न गेल्याने त्यांचा मृत्यू झाला. गुरुवारी रात्री उशिरा या नीलगायींच्या मृतदेहांना जेसीबीने बाहेर काढण्यात आले.
मिळालेल्या माहितीनुसार, गावातील एक माणूस शेताच्या आवारात लाकूड गोळा करण्यासाठी गेला होता. विहिरीजवळ येताच त्याला नीलगायींचे मृतदेह विहीरीत तरंगताना दिसले. त्यांनी तातडीने या घटनेची माहिती ग्रामस्थांना दिली. हा परिसर काटेपूर्णा अभयारण्याच्या आसपास असल्याने याठिकाणी नीलगायी, बिबट्या आणि इतर वन्यप्राण्यांचा वावर असतो. नीलगायी पडलेल्या विहिरीला संरक्षक भिंत नव्हती. ही विहीर जमिनीशी समांतर होती, म्हणून नीलगाय पाण्याच्या शोधात त्याठिकाणी आल्या आणि विहिरीत पडल्याचा अंदाज वन विभागाने व्यक्त केला आहे.
या घटनेची माहिती वनविभागाला समजताच वनविभागाच्या बचाव दलाच्या चार तासांच्या अथक प्रयत्नांनंतर कर्मचार्यांनी रात्री उशिरापर्यंत जेसीबीच्या मदतीने मृत नीलगायी बाहेर काढल्या। शासकीय नियमांनुसार मृतदेहांची विल्हेवाट लावण्यात आली. राज्यात वनक्षेत्रानजीक कठडे नसलेल्या विहिरींची समस्या दिवसागणिक गंभीर स्वरुप धारण करत आहे. वनक्षेत्राच्या आसपास वन्यप्राण्यांचा वावर असल्याने कठडा किंवा संरक्षण भिंत नसलेल्या विहिरींना कुंपन घालण्याची मागणी होत आहे.