मुंबई (विशेष प्रतिनिधी) - सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर असणाऱ्या सातारा जिल्ह्यातील चाळकेवाडी पठारावरुन संशोधकांनी गोड्या पाण्यात अधिवास करणाऱ्या पाच प्रजातींच्या खेकड्याची नोंद केली आहे (chalkewadi plateau). महत्त्वाचे म्हणजे हे खेकडे पठारी अधिवासातील भूगर्भातील पाण्याची पातळी राखण्यामध्येही महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचे संशोधनामधून प्रकाशात आले आहे. (chalkewadi plateau)
गोड्या पाण्यात अधिवास करणाऱ्या खेकड्यांवर मुळातच फार कमी अभ्यास झाला आहे. अशा परिस्थितीत सह्याद्रीतील चाळकेवाडी पठारासारख्या महत्त्वपूर्ण अधिवासातील खेकड्यांवर संशोधन करण्याचे काम हे साताऱ्यातील 'महादरे इकोलाॅजी रिसर्च (इंटरडिसिप्लिनरी) (MERI - मेरी) ऑर्गनायझेशन, सातारा'च्या संशोधकांनी केले. यामध्ये सुनील भोईटे आणि गायत्री पवार या संशोधकांचा समावेश होता. यासाठी 'वर्ल्ड वाईल्डलाईफ फंड'च्या (डब्ल्यूडब्ल्यूएफ) 'कॉन्झर्वेशन कॅटॅलिस्ट प्रोग्राम अंतर्गत' या संशोधनाला आर्थिक सहाय्य देण्यात आले. या संशोधनामध्ये संशोधकांनी चाळकेवाडी पठारावर आढळणाऱ्या खेकड्यांवर अभ्यास केला. या अभ्यासात या पठारावरील प्रजाती नोंदीचे शोधवृत्त नुकतेच 'झूलाॅजिकल सर्व्हे आॅफ इंडिया'च्या नियतकालिकामध्ये प्रकाशित झाले आहे.
या संशोधनाच्या माध्यमातून चाळकेवाडी पठारावरुन खेकड्याच्या पाच प्रजाती आढळून आल्या आहेत. यामध्ये बॅरिटेलफुसा (काळा खेकडा) इंग्लेथेलफुसा फ्रंटो (राजं), घाटियाना पुल्क्रा (कपार खेकडा), सह्याद्रियाना अल्कोकी (तुपा) आणि बारुसा ग्रासिलिमा (भेलागडी) यांचा समावेश आहे. ओढ्याच्या पात्रालगत असणाऱ्या ओलाव्याच्या आसाऱ्याला हे खेकडे हिवाळी आणि उन्हाळी महिन्यांमध्ये वास्तव्य करतात. पाऊस सुरू व्हायच्या आधी पठारावर स्थानांतरण करतात. 'इंग्लेथेलफुसा फ्रंटो' प्रजातीस स्थानिक लोक राजं म्हणून संबोधतात. या स्थानांतरणासाठी या खेकड्यांमधील काही प्रजाती या दोन ते पाच किलोमीटर अंतर चालून जातात. पठारी प्रदेशात बीळ तयार करुन त्यात प्रजननासाठी वास्तव्य करतात. याच बीळांमुळे पावसाचे पाणी हे पठारावरून भूगर्भात जिरते आणि त्यामुळे पाण्याची पातळी राखली जात असल्याचे प्राथमिक निरीक्षण या संशोधनामधून पुढे आले आहे. पाच महिने पठारांवर राहिल्यानंतर हे खकडे सात महिन्यांसाठी पुन्हा ओढाच्या पात्रालगत आसऱ्याला जातात.
सदर अभ्यासामध्ये पठारी प्रदेशातील दुर्लक्षित अथवा निम्न महत्त्व दिल्या जाणाऱ्या खेकड्यांसारख्या प्रजातींचा अभ्यास व त्यांची सदर अधिवासातील भूमिका हा मुख्य उद्देश होता. पठारी खेकड्यांवरील भविष्यकालीन व सातत्यपूर्ण संशोधनातून आणखीही बऱ्याचश्या विस्मयकारी बाबी समोर येतील. त्यामधून त्यांच्या संवर्धनास चालना मिळेल.- सुनिल भोईटे, मुख्य संशोधक, मेरी, सातारा.
तुलनेने कमी क्षेत्रफळ असणाऱ्या चाळकेवाडी पठारावर मात्र २० चौरस किलोमीटर मध्ये खेकड्याच्या वेगवेगळ्या पाच प्रजातींचा आढळ ही पठारी जैवविविधतेच्या अनुषंगाने महत्त्वाची बाब आहे. त्यामधून या पठाराचे संवर्धन मूल्य स्पष्ट होते. त्यामुळे अशा पठारांचे प्राधान्यक्रमाने संरक्षण करणे महत्त्वाचे आहे. - गायत्री पवार, सहसंशोधिका, मेरी, सातारा.
वनस्पतींसोबत सहसंबंध
पठारी खेकडे हे त्या अधिवासातील वनस्पतींसोबत सहजीवन करतात. जीवनकार्यातील वेगवेगळ्या कार्यांसाठी त्यांनी पठारवर उगणाऱ्या बहुवर्षायू वनस्पतींचे मदत होते. पठारावरील माळकारवी किंवा खरवर या वनस्पतींचे मुळे तंतुमय आणि जाळीदार असतात. हे खेकडे याच वनस्पतींच्या मुळांशीच पाच महिन्यांच्या पावसाळी कालावधीत बीळे तयार करतात. या वनस्पतीचे आच्छादन हे जमिनीवर डेरेदार वाढत असल्याने खेकड्यांची बीळे दिसत नाहीत. त्यामुळे खेकड्यांचे त्यांच्या भक्षकांपासून रक्षण होते. अंजनीच्या झाडांवर येणारे शेवाळ खाण्यासाठी देखील हे खेकडे झाडावर चढलेले संशोधकांना आढळून आले आहेत.