मुंबई - कोविशिल्ड लसीच्या किमंतीमध्ये २५ टक्के कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या लसीचे उत्पादक सीरम इस्टिट्यूट आॅफ इंडियाने याबाबत निर्णय घेतला आहे. सीरमचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पूनावाला यांनी लसीची किमंत कमी केल्याची माहिती ट्विट करुन दिली आहे.
१ मे पासून देशभरात १८ ते ४४ वयोगटातील व्यक्तींच्या लसीकरणाला सुरुवात होणार आहे. लसीकरणाच्या या टप्प्याच्या पार्श्वभूमीवर सीरमने आपली कोविशिल्ड लस बाजारात विकण्याचा निर्णय घेतला होता. त्याअनुसार राज्य सरकारला ४०० रुपये आणि खासगी रुग्णालयांना ६०० रुपये प्रतिलस दराने ही लस विकण्यात येणार होती. मात्र, राज्य सरकारसाठी निश्चित केलेला ४०० रुपयांचा दर हा जास्त असल्याचे राज्य सरकारांचे म्हणणे होते. महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनीही कोविशिल्डचा विक्री दर जास्त असल्याचे म्हटले होते. या पार्श्वभूमीवर आता सीरमने कोविशिल्डची किमंत कमी केली आहे.
सीरमचे अदर पूनावाला यांनी ट्विटवर माहिती दिली आहे की, "राज्य सरकारला कोविशिल्ड आता ४०० रुपयांमध्ये नाही, तर ३०० रुपयांमध्ये विकत घेता येईल. यामुळे राज्य सरकारचा हजारो कोटी रुपयांचा निधी वाचेल आणि लसीकरण अधिक सक्षम होऊन अनेक जीव वाचतील." महाराष्ट्रासाठी लसीच्या दरात झालेली घट फायदेशीर ठरणार आहे. कारण, राज्य सरकारने कोरोना लसीकरण मोफत करणार असल्याची घोषणा केली आहे. त्यामुळे लस विकत घेण्याच्या दृष्टीने निधीमध्ये कपात होणार आहे.