गन कल्चरचा शाप

    15-Sep-2025
Total Views |

अमेरिकेच्या युटा राज्यात झालेल्या चार्ली किर्क यांच्या हत्येने पुन्हा एकदा अमेरिकन लोकशाहीच्या आत्म्यालाच हादरा दिला आहे. युटा विद्यापीठाच्या प्रांगणात हजारो तरुणांसमोर व्यासपीठावरून संवाद साधणाऱ्या वक्त्याचा आवाज दाबण्यासाठी एका गोळीचा आधार घेण्यात आला. ही घटना म्हणजे, केवळ एका व्यक्तीचा अंत नाही, तर अमेरिकेतील विचारस्वातंत्र्यावर झालेला प्राणघातक हल्ला आहे. लोकशाहीत मतभेद असतात, संघर्ष असतो. परंतु, त्याला उत्तर द्यायचे साधन गोळी असेल, तर लोकशाहीचा पाया किती कमकुवत झाला आहे, याची ही स्पष्ट जाणीव होते.

चार्ली किर्क हे अमेरिकेतील कन्सर्व्हेटिव्ह विचारसरणीचे अग्रदूत होते. ‘टर्निंग पॉईंट युएसए’ या संस्थेच्या माध्यमातून चार्ली यांनी अमेरिकेतील विद्यार्थ्यांना राष्ट्रवादी अजेंड्याशी जोडले. ट्रम्प यांच्या राजकीय मोहिमेत त्यांना अमेरिकेतील तरुणांचा पाठिंबा मिळवून देण्यात चार्ली यांची भूमिका अनन्यसाधारण अशीच. ‘मेक अमेरिका ग्रेट अगेन’ या घोषणेला प्रत्यक्ष कॅम्पसवर नेऊन पोहोचवणारा चेहरा म्हणजे, चार्ली किर्क. शांत, थेट आणि प्रभावी संवाद ही चार्ली यांची बलस्थाने. अमेरिकेमध्ये सध्या फोफावलेल्या वोक संस्कृतीविरोधात चार्ली यांनी मोहीम राबवली होती. त्यामुळे त्यांनी मांडलेल्या विचारांशी असहमती ठेवणे शय आहे. परंतु, त्यांच्या विचारांना दाबण्याचा मार्ग हिंसा असूच शकत नाही. कोणत्याही लोकशाहीमध्ये विचारांचा सामना विचारांनीच व्हायला हवा. लोकशाही शासन व्यवस्थेची अनिवार्य अटच आहे. पण, अमेरिकन वास्तव काही वेगळेच सांगते आहे. आजमितीला अमेरिकेमध्ये राजकीय ध्रुवीकरण इतके तीव्र झाले आहे की, विरोधक आता शत्रू म्हणून पाहिले जातात. समाजमाध्यमांच्या जमान्यात सुरू होणार्या टीकेचे, अपशब्द आणि द्वेषपूर्ण घोषणाबाजीनंतर थेट हिंसेत रूपांतरण होताना दिसते आहे. चार्ली यांच्या हत्येने दाखवून दिले की, अमेरिकन समाजातील संवाद हरवत चालला आहे. कोणत्याही लोकशाहीतील संवाद हरवला की, ती लोकशाही केवळ कागदोपत्री राहते आणि हिंसेचीच भाषा प्रबळ ठरते.

चार्ली यांच्या हत्येमुळे समोर आलेल्या अनेक मुद्द्यांपैकी अजून एक मुद्दा महत्त्वाचा आहे, तो म्हणजे अमेरिकेतील वाढतं गन कल्चर! अमेरिकेच्या संविधानातील तरतुदीनुसार अमेरिकेच्या नागरिकांना मिळालेला शस्त्र बाळगण्याचा अधिकार आता स्वातंत्र्याचे प्रतीक राहिलेला नाही; तो साक्षात मृत्यूचा परवाना झाला आहे. आज अमेरिकेतील चर्च, शाळा, विद्यापीठ असे कोणतेही ठिकाण सुरक्षित राहिलेले नाही. अमेरिकेतील गोळीबाराच्या घटनांची वाढती मालिका अमेरिकेच्या सामाजिक आराखड्यालाच चिरडून टाकते आहे. स्वातंत्र्याच्या नावाखाली हिंसेला खतपाणी घालणारी व्यवस्था लोकशाहीची किती थट्टा करते, याचा हा जिवंत पुरावाच.

अमेरिका कायमच जगाला लोकशाहीचे, मानवाधिकारांचे, अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे धडे देत असते. त्यातील फोलपणा आज चार्ली यांच्या हत्येने अधिकच अधोरेखित झाला आहे. ज्या राष्ट्रात विरोधी विचारांचा आवाज दाबण्यासाठी शस्त्रांनी होतो, तर तिथे लोकशाही आहे असे कसे म्हणावे. लोकशाहीत मतभेदांचा स्वीकार, वादविवाद स्वीकार्य असतात. परंतु, हिंसेच्या बळावर विचारांना गप्प करण्याचा प्रयत्न म्हणजे लोकशाहीची हत्याच!

चार्ली किर्क यांच्या हत्येने अमेरिकेला आज आरसा दाखवला आहे. या आरशात अमेरिकेच्या लोकशाहीचे एक पोकळ प्रतिबिंब लख्ख दिसत आहे. जिथे चर्चा नाही, जिथे विरोध सहन करण्याची संस्कृती नाही, जिथे शस्त्र हेच शेवटचे उत्तर होते. जर जगातील सर्वांत मोठी लोकशाही म्हणवणार्या राष्ट्राची ही अवस्था असेल, तर इतरांना लोकशाहीबाबत शिकवण्याचा त्यांचा नैतिक अधिकार कुठे उरतो? आज प्रश्न केवळ एका व्यक्तीच्या हत्येचा नाही, तर अमेरिकेच्या भविष्याचा आहे. लोकशाही जिवंत ठेवायची असेल, तर संवादाचे दरवाजे उघडे ठेवावे लागतील. गन कल्चरवर कठोर नियंत्रण आणावे लागेल. अन्यथा, लोकशाहीचा दावा करणारे हे राष्ट्र आपल्या स्वतःच्या रक्तरंजित वास्तवामुळे जगाच्या नजरेत लहान ठरेल. चार्ली किर्क यांच्या हत्येने दिलेला धडा निर्विवाद आहे. हिंसेचा वरवंटा शेवटी स्वतः समाजालाच चिरडून टाकतो. अमेरिकेकडे सुधारण्याची संधी अजूनही आहे; पण वेळ निघून गेल्यास अमेरिकेची लोकशाही केवळ इतिहासाच्या पुस्तकात मिळेल इतकं मात्र निश्चित.

कौस्तुभ वीरकर