सेंद्रिय शेतीचा पुरस्कर्ता

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    12-Apr-2021
Total Views |


Subhash Karale_1 &nb


 

बदलते हवामान, कोरडा आणि ओला दुष्काळ, तसेच घसरता बाजारभाव यांसारख्या आव्हानांनी पाचवीला पूजलेला व्यवसाय म्हणजे शेती. राज्यातील बहुतांश शेती व्यवसाय तोट्यात असल्याने सेंद्रिय शेतीच्या माध्यमातून शेतकर्‍यांना नवी दिशा दाखविण्याचा प्रयत्न काही प्रयोगशील शेतकरी करत आहेत. त्यासाठी सेंद्रिय उत्पादनांचा वापर स्वतःच्या शेतात करून इतर शेतकर्‍यांना प्रगतीचा मार्ग दाखवणारे प्रगतशील आणि उद्यमी शेतकरी म्हणजे सुभाष वसंत कराळे. कृषिक्षेत्राच्या विकासामध्ये मौल्यवान योगदान असलेल्या सुभाष कराळेंच्या कार्यप्रवासाचा घेतलेला हा धांडोळा...


पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील कारेगाव येथे जन्मलेल्या सुभाष कराळे यांची वडिलोपार्जित शेती. शाळेत असल्यापासून सुभाष वडिलांना शेतकामात मदत करत. उत्पन्नाचे एकमेव साधन असल्याने वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी त्यांच्यावर शेतीची जबाबदारी पडली. शेती म्हटली की, विविध आव्हाने ओघाने आलीच. त्यापैकी एक म्हणजे पिकांवर पडणारे विविध प्रकारचे रोग. त्यातून पिकांचे आणि परिणामी शेतकर्‍यांचेही मोठे नुकसान होते. अमुक एका पिकावर एखादा रोग कसा येतो, त्यावर मात करण्यासाठी काय करता येईल, याबाबत सुभाष यांनी अभ्यास आणि संशोधन सुरू केले. थोडीथोडकी नव्हे, तर जवळपास २० ते २५ वर्षे निरनिराळी पिके, हवामानाचा परिणाम, पिकांवर पडणार्‍या वेगवेगळ्या रोगांवर त्यांनी संशोधन करत रसायनमुक्त सेंद्रिय औषधे तयार केली.

सुरुवातीला या औषधांचा त्यांनी स्वत:च्या शेतीत प्रयोग केला. या प्रयोगातून पिकांमध्ये सकारात्मक बदल झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यानंतरच सुभाष यांनी तयार केलेली औषधे त्यांच्या काही शेतकरी मित्रांना वापरायला दिली. त्यांनाही त्यांच्या शेतीत चांगला फरक अनुभवायला मिळाला. आपल्याकडील संशोधनाचा फायदा इतर शेतकर्‍यांनाही व्हावा, म्हणून मग सुभाष यांनी आपल्या चार मित्रांना सोबत घेत २०१६ साली ‘एस. व्ही. अ‍ॅग्रो कंपनी’ची स्थापना केली. सुरुवातीला शेतीसोबतच सेंद्रिय औषधांच्या उत्पादनासह त्यांची विक्री आणि विपणनाचे काम त्यांना स्वतः करावे लागले. त्यातून सुभाष यांचे विक्रीकौशल्य चांगलेच विकसित झाले. कोणती पिके घ्यावी व त्यातून कसे उत्पन्न वाढवता येईल, याबाबत बरेचदा शेतकर्‍यांना पुरेसे ज्ञान नसते. सामान्यतः आपल्या शेजारी शेतकर्‍याने डाळिंबाचे पीक घेतले आणि त्यातून भरघोस उत्पादन मिळाले, तर आपणही आपल्या शेतात तेच पीक घ्यावे, असा एक प्रवाह दिसून येतो. अशावेळी जर त्या शेतकर्‍याला पिकाबाबत पुरेशी माहिती नसेल, तर तो सल्लागार नेमतो आणि हे सल्लागार कृषिमार्गदर्शनाच्या नावाखाली पुन्हा शेतकर्‍याकडून पैसे उकळतात. यामध्ये शेतकर्‍याची मोठी फसवणूक होण्याची शक्यता असते. त्यामुळे शेतकर्‍यांची होणारी फसवणूक थांबावी, याकरिता सदैव प्रयत्नशील असल्याचे सुभाष सांगतात. 


सुभाष यांचे वडीलदेखील कृषितज्ज्ञ. त्यामुळे गावातील शेतकर्‍यांच्या समस्या सोडविण्याच्या जबाबदारीचा जणू हा परंपरागत वारसा. आज सुभाष स्वतः शेतकर्‍यांच्या बांधावर जाऊन त्यांना शेतीविषयक मार्गदर्शन करतात. या प्रवासाविषयी बोलताना ते म्हणतात की, “सुरुवातीपासून शेतकर्‍यांसाठी काहीतरी करावे, अशी इच्छा होती. बाजारात शेतकर्‍याला फसवले जाऊ नये, म्हणून मी शेतकर्‍यांना अपेक्षेपलीकडे जाऊन सेवा देण्याचे काम करतो. नवीन काहीतरी शिकण्याच्या मनोवृत्तीतून आणि बाजाराची अपेक्षा लक्षात घेऊन नवनवीन सेंद्रिय शेतीपूरक उत्पादने बाजारात आणण्याचा आमचा अट्टाहास असतो.”


गेली १० ते १५ वर्षे कराळे यांना संशोधनापासून ते कंपनी स्थापन करेपर्यंत त्यांच्या तिन्ही मित्रांनी साथ दिली. सुभाष यांच्या कंपनीतील भागीदार ही शेतकर्‍यांची मुले आहेत. सुरुवातीपासूनच प्रत्येकाने शेतीसोबतच इतर छोटी-मोठी कामे केली आहेत. त्यामुळे त्यांना या क्षेत्रात एकत्रित काम करताना फारसे कष्ट पडले नाही. सुभाष यांच्या पुढाकाराने ‘एस. व्ही. अ‍ॅग्रो कंपनी’चा उत्पादन प्रकल्प त्यांच्याच शेतात सुरू केला. सुभाष यांनी संशोधन करून तयार केलेल्या पर्यावरणपूरक कृषी उत्पादन तंत्रज्ञानामुळे शेती उत्पादन खर्च कमी होऊन भरघोस उत्पादन मिळण्यास मदत होऊ लागली. त्याचबरोबर शेतकर्‍यांचे उत्पादनही वाढले. या तंत्रज्ञानामुळे शेतीतील फळे, भाजीपाला व अन्नधान्य रसायनमुक्त होण्यास मदत होऊ लागली. आज संस्थेला किमान दोन ते अडीच लाख शेतकरी जोडले गेले आहे. यामार्फतच या सर्व सेंद्रिय औषधांची विक्री केली जाते. यासाठी कोणतीही स्वतंत्र जाहिरात करण्याची आवश्यकता संस्थेला पडली नाही. एस. व्ही. कंपनीमार्फत शेतकर्‍यांना मोफत शेतीविषयक सल्ला देणे, सेंद्रिय शेतीचे फायदे, जमिनीचा पोत सुधारण्यासंदर्भात वेगवेगळ्या मार्गदर्शन शिबिरांचे आयोजन केले जाते. या माध्यमातून एस. व्ही. कंपनीने जवळपास 300 ते 400 लोकांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे. यामध्ये कृषिक्षेत्रातील उच्चशिक्षित तरुण, अनुभवी व्यक्तींचा समावेश आहे. एस. व्ही. कंपनीचे प्रोसेसिंग युनिट इंदापूर, लोणी देवकर एमआयडीसीमध्ये असून बारामतीमध्ये कंपनीची कार्यालये आहेत. एस. व्ही. अ‍ॅग्रो कंपनीच्या सध्या कर्नाटक, गुजरात, ओडिशासह अनेक राज्यांत शाखा आहेत. उत्पादनासोबतच विक्री आणि वितरणासाठी स्वतंत्र व्यवस्था असून कंपनीने या क्षेत्रात नुकतीच पाच वर्षे पूर्ण केली आहेत. सध्या या कंपनीची भारत सरकारची मान्यताप्राप्त वेगवेगळी २१ सेंद्रिय खते व औषधे सध्या बाजारात विक्रीसाठी उपलब्ध आहेत.


गेली २० वर्षे सुभाष कराळे हे या क्षेत्रात कार्यरत आहेत. महाराष्ट्रातील शेतकरी बंधूंना आपली शेती नापीक होऊ नये म्हणून योग्य ते मार्गदर्शन आपल्या सहकार्‍यांसोबत स्थापन केलेल्या कंपनीच्या माध्यमातून करतात. हजारो एकर नापीकआणि क्षारयुक्त जमिनीवर यशस्वी प्रयोग करून ती जमीन त्यांनी लागवडीखाली आणली. डाळिंब व द्राक्ष उत्पादक शेतकर्‍यांना रसायनमुक्त फळलागवडीचे तंत्रज्ञान पुरविले. २०१९ पर्यंत लाखो शेतकर्‍यांपर्यंत ‘समृद्ध माती, तरच शेती’ हे अभियान त्यांनी पोहोचवले. या अभियानांतर्गत स्वतःचे सेंद्रिय तंत्रज्ञान विकसित करत हजारो शेतकर्‍यांना विषमुक्त शेती अन्नधान्ये, पालेभाज्यानिर्मिती करण्यासाठी मदत केली. तसेच शेतकर्‍यांच्या मुलांना रोजगार मिळवून दिला. ‘ना नफा ना तोटा’ या तत्त्वावर कमी खर्चात माती परीक्षण करून शेतकर्‍यांना त्या पिकांसाठी आधुनिक वेळापत्रक दिले जाते. सेंद्रिय शेती कार्यशाळेचे संपूर्ण महाराष्ट्रभर शेकडो उपक्रम त्यांनी राबविले आहेत. शेतकर्‍यांसाठी शेतीविषयक शिबिरेही ते आयोजित करतात. पुढच्या वर्षी सेंद्रिय शेती करून उत्कृष्ट व भरघोस उत्पादन घेणार्‍या महाराष्ट्रातील निवडक दहा शेतकर्‍यांना इस्रायलला आधुनिक शेतीविषयक भेटीसाठी ते घेऊन जाणार आहेत. तोट्यात जाणार्‍या शेती व्यवसायातून नफा कमावण्याची दिशा देण्याचे काम करणारे आणि शाश्वत शेतीचा पुरस्कार करणारे सुभाष कराळे यांना दै. ‘मुंबई तरुण भारत’कडून भविष्यातील कामगिरीसाठी शुभेच्छा...!
यशाचा मूलमंत्र
शेतकऱ्यांच्या प्रश्नांविषयक असणारी जाण आणि त्यांना समस्यामुक्त करण्याचे बाळगलेले ध्येय हाच माझ्या यशाचा मूलमंत्र आहे.
                                                                                                                                     
                                                                                                                         - गायत्री श्रीगोंदेकर
@@AUTHORINFO_V1@@