अनंत अमुची ध्येयासक्ती...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    12-Apr-2021   
Total Views |

Anil Soundade_1 &nbs
 
 
“माझ्याकडे काहीच नाही, मला कुणाचे पाठबळ नाही, मलाच अडचणी येतात, किती लढू? जाऊ दे, त्यापेक्षा काहीच न केलेले बरे!” असे म्हणत रडणारे नकारात्मक लोक आपण नेहमीच अवतीभवती पाहतो. पण, शून्यातूनच विश्व निर्माण करणार्‍या अनिल सौंदडे यांची यशोगाथा ‘मराठी पाऊल पडते पुढे,’ असे म्हणायला भाग पाडते. ‘शीतल इंडस्ट्रीज’ आणि ‘एफिशियन्ट इंजिनिअरिंग’ या दोन कंपन्यांचेसर्वेसर्वा असलेले अनिल यांनी अनेक अडचणींचा सामना केला. त्यांचीच ही यशोगाथा...
“माझ्या कंपनीचा ‘टर्नओव्हर’ दहा कोटींचा आहे. पण, थोड्याच कालावधीत तो १०० कोटींपर्यंत करण्याचा माझा प्रयत्न आहे. तो 100 कोटी होणारच! कारण, तसा मला आत्मविश्वास आहे आणि तशा प्रकारे कामाचे मी नियोजनही केले आहे. माझा भाऊ निलेश, माझ्या कंपनीतले अधिकारी, कर्मचारी आम्ही सगळे मिळून हे उद्दिष्ट नक्की साध्य करू.” यशस्वी उद्योजक अनिल सौंदडे आत्मविश्वासाने सांगत होते. आपल्याला वाटेल, भरभक्कम पार्श्वभूमी असेल, अनुभव असेल त्यांना. पण, तसे नाही. ‘नाही रे’ सामाजिक आणि आर्थिक परिस्थितीमध्ये जगणार्‍या कुटुंबात त्यांचा जन्म झाला. मातंग समाजातील सौंदडे कुटुंबातले अनिल सुपुत्र. अनिल यांचे वडील रावसाहेब आणि आई शालन. दोघांनीही मुलांना कुठल्याही परिस्थितीमध्ये मनाने खचायचे नाही हेच शिकवले. रावसाहेब वेल्डर होते. ते खासगी कंपनीत कामही करायचे आणि ‘फॅब्रिकेशन’च्या कामाची छोटी-मोठी कंत्राटेही घ्यायचे. पडेल ते कष्ट करण्याची त्यांची तयारी. तेच सद्गुण यांच्यामध्येही आले. रावसाहेब हेच अनिल यांचे आदर्श. असो.
 
 
 
अनिल यांच्या लहानपणीची एक आठवण आहे, ती वाचली की, त्यांचे लहानपण कसे गेले असेल, हे चटकन जाणवते. ते सहावी उत्तीर्ण झाले आणि आणि सातवीच्या वर्गात गेले. पण, शाळेच्या गणवेशाची पॅन्ट पाठीमागून फाटलेली. घरची परिस्थिती अशी नव्हती की, नवीन पॅन्ट मिळेल. तसेच सातवीला नवीन पॅन्ट घेतली, तर आठवीला पुन्हा नवे माध्यमिक सत्र सुरू होणार. आठवीची पॅन्ट वेगळी. मग ही पॅन्ट एका वर्षासाठी का घ्यायची? त्यामुळे तीच पॅन्ट घालणे क्रमप्राप्त झाले. फाटकी पॅन्ट कितीही शिवली तरी जर्जर झालेली. शाळेत कसे जायचे? जून महिन्याचे पावसाचे दिवस. घरात आजोबांचा की कुणाचा जुनापुराणा स्वेटर होता. तो स्वेटर घालून ते शाळेत जाऊ लागले. स्वेटर पाठीमागून खाली सोडला की, पॅन्ट कशी आहे हे दिसण्याचा प्रश्नच येत नसे. सुरुवातीला सगळ्यांना वाटले, तब्येत ठीकनसेल. एक वर्ष शाळेत स्वेटर घालून गेले. कोवळ्या वयात भावना किती तरल असतात, हे सगळ्यांनाच माहिती आहे. पण, हट्ट, जिद्द, आवडनिवड हे आपल्यासाठी नाही, हे बालवयातच त्यांना परिस्थितीने शिकवले होते.
 
 
 
पुढे शाळेत असतानाच ते रा. स्व. संघाच्या शाखेत जाऊ लागले. रा. स्व. संघाची शाखा म्हणजे व्यक्तिनिर्माणाचे एक पवित्र स्थान. आईवडिलांचे कष्ट, संस्कार आणि संघाच्या शिस्तीने दिलेला आत्मविश्वास यामुळे परिस्थिती बदलायचीच, असा संकल्प अनिल यांनी केला. लहानपणापासूनच त्यांचा कल व्यवसायाकडे होता. कारण, त्यात स्वतःच्या निर्णयाला वाव असतो, स्वतःच्या कर्तृत्वालाही संधी असते. निर्णय योग्य असेल तर फायदाच होतो आणि निर्णय चुकला तर शिकायला मिळते. तसेही अनिल सौंदडे यांना जीवनामधील अनुभवाने खूप काही शिकवले; नव्हे अनुभव हाच त्यांचा गुरू, असे म्हणायला हरकत नाही. डिप्लोमाचे शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी ठरवले की, वडिलांच्या मदतीने छोटीमोठी कंत्राटे घ्यायची. तशी संधीही आली. एका कंपनीमध्ये अनिल यांना फॅब्रिकेशनचे कंत्राटी कामही मिळाले. ती जबाबदारी त्यांनी मेहनतीने सांभाळली. त्यावेळी कंपनी दर महिन्याला पैसे न देता, दोन-तीन महिन्यांनी द्यायची. मात्र, कर्मचार्‍यांना पगार तर वेळेवर करणे आवश्यक असायचे. त्यासाठी ते व्याजाने पैसे काढत आणि कर्मचार्‍यांना वेळेवर पगार देत. कंपनीकडून पैसे मिळाले की कर्ज फेडत. एकवेळ अशी आली की, एक कर्मचारी पगार होण्याआधी गावी गेला. अनिल यांच्याकडून त्यांचा पगार चुकून खर्च झाला. ‘तो कर्मचारी आला की करू काहीतरी,’ असा विचार यांनी केला. तो कर्मचारी गावाहून आला. गुढीपाडव्याचा सण होता. मात्र, अनिल यांच्याकडे पैसे नव्हते. मग त्यांनी कंपनीला दिलेली बिले घेतली. माहितीतल्या लोकांकडे गेले की ही कंपनीची बिले आहेत, याबद्दल कंपनी आम्हाला पैसे देणार आहे. पैसे आले की, तुमची रक्कम चुकवू. पण, आता कर्ज द्या. त्या कर्मचार्‍याचा पगार होता ३,५०० रुपये. पण, कुणीही पैसे दिले नाहीत. शेवटी एक मित्र मदतीला आला. अनिल यांनी स्वत:च्या गळ्यातली आणि त्याच्या गळ्यातली चैन सोनाराकडे गहाण ठेवली आणि पैसे उभे केले. यानंतर त्यांनी कानाला खडा लावला. उगीचच पैशांची उधळपट्टी करायची नाही, दुसर्‍यांच्या विश्वासावर कोणतेही काम करायचे नाही, असे पक्के ठरवले. त्यानंतर अक्षरशः योग्य काटकसर करत ते जगू लागले. इतके की तीन-चार वर्षांत त्यांनी अनावश्यक उधळपट्टी टाळून सहा लाख रुपये साठवले.
 
 
 
याच पैशांतून त्यांनी पुढे स्वत:चा गाळा घेतला. प्रमाणात खर्च करण्याची आणि अनावश्यक उधळपट्टी थांबवण्याचा धडा देणारा हा अनुभव. त्यांनी स्वत:चे काम सुरू केले. त्यासाठी अहोरात्र कष्ट करू लागले. स्वत:चा नवा गाळा घेतला. तिथे फॅब्रिकेशनचे लाखो रुपयांचे काम सुरू केले. काम पूर्णत्वास आले. उद्या तयार झालेले उत्पादन ग्राहकाकडे पोहोचवणार होते. मात्र, आदल्या रात्रीच चोरांनी तिथल्या सुरक्षारक्षकाला मारून त्याचे हातपाय बांधून तो सारा माल लुटून नेला. होत्याचे नव्हते झाले. अनिल यांना तर काय करावे सुचेनासे झाले. इतक्या कष्टाने मिळवलेली ऑर्डर, त्यासाठी केलेली मेहनत, ओतलेला पैसा, पाहिलेली स्वप्ने सगळे सगळे क्षणार्धात भंग पावले. या परिस्थितीने त्यांना पुन्हा शून्यावर आणले.
 
 
 
पण, अनिल म्हणतात, “यावेळी मी खरंच अक्षरशः मोडून पडलो, पण थोडा वेळच. कारण, तितक्याच हिमतीने मी कामाला सुरुवात केली होती. ती हिंमत अशा चोरीमारीने संपणारी नव्हती. मी ठरवले की आज शून्य आहे. मी या शून्यातून पुन्हा निर्मिती करेन. ‘कोशिश करनेवालों की हार नही होती।’ ” त्यांनतर त्यांनी जिद्दीने शब्दातीत कष्टाने पुन्हा काम उभे केले. अर्थात, बाजारात पुन्हा पत, विश्वास तीही खाली खिशाने निर्माण करणे हे काम म्हणजे ‘जावे त्यांच्या वंशा तेव्हा कळे.’ पण, अनिल यांनी ते केले. कारण, त्यांच्या मनात ठाम होते की, “मी परिस्थितीवर मात करणारच. परिस्थिती माझे लक्ष्य, माझे ध्येय माझ्यापासून दूर करू शकत नाही.” त्यांच्या मनमिळावू, प्रामाणिक आणि कष्टाळू स्वभावामुळे थोड्याच काळात त्यांनी यश संपादन केले आहे. पुढे फॅब्रिकेशनचे अद्ययावत काम करण्यासाठी त्यांनी जपानहून मशीनही मागवले. त्यावेळीही त्यांना प्रत्येक ठिकाणी अडचण आली. मात्र, प्रत्येक अडचणीतून मार्ग निघाला. इतका की तीन-चार कोटींची मशीन घेण्यासाठी अनपेक्षितपणे सहकार्यही मिळाले. जयेश नावाच्या मुंबईच्या व्यावसायिक मित्राने अचानक मदत केली. अनिल म्हणतात, “ती मदत मी कधीच विसरू शकत नाही.”
 
 
 
शून्यातून निर्मिती करताना आज एकापुढे त्यांनी अनेक शून्ये निर्माण केली आहेत. त्यांच्या कंपनीचा ‘टर्नओव्हर’ १० कोटी असून लवकरच तो १०० कोटी करण्याचा त्यांचा मनोदय आहे. अर्थात, मनोदय पूर्ण करण्यासाठीच्या त्यांच्या योजनाही तयार आहेत, त्यावर ते कामही करत आहेत. अपेक्षित-अनपेक्षित अडचणींवर मात करत स्वत:चे आणि समाजाचेही स्थान उंचावणारे यशस्वी व्यावसायिक अनिल सौंदडे यांची कर्तृत्वाची गुढी ही समाजासाठी प्रेरणादायी आहे.
 
 
यशाचा मूलमंत्र
 
 
 
‘व्हेंटिलेटर’वर दिसणारी ‘लाईफलाईन’ पाहिली आहे का? ती सतत वर-खाली होत असते. त्यामुळे रुग्ण जीवंत आहे हे कळते. ती एकदम सरळ असेल तर? व्यवसायाचे आणि त्यातही आयुष्याचे असेच आहे. आयुष्यात चढउतार आवश्यकच आहेत. त्याशिवाय आयुष्याची, प्रयत्नांची आणि यशाचीही किंमत कळत नाही.
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@