अहमदाबाद : गुजरातेत भाजप प्रदेशच्या वतीने गरजू रुग्णांना रेमडेसिवीर इंजेक्शन्सचे मोफत वाटप सुरु आहे परंतू हाच धागा पकडून आता राजकारणाला सुरुवात झाली आहे. अनेक आरोप-प्रत्यारोपांनंतर आता या प्रकरणात गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी स्पष्टीकरण दिले आहे.
रुपाणी यांनी दिलेल्या स्पष्टीकरणानुसार “राज्यात प्रदेश भाजपने ५००० रेमडेसिवीर इंजेक्शन मागवले होते. भाजपकडून हे रेमडेसिवीर इंजेक्शन सुरतमध्ये मोफत दिले जात आहेत. पण भाजपकडून मोफत वाटप होत असलेल्या रेमडेसिवीर इंजेक्शनशी राज्य सरकारचा काहीही संबंध नाही.
मोफत वाटप होत असलेल्या रेमडेसिवीर इंजेक्शनचा साठा हा भाजपने मागवलेला आहे. हे रेमडेसिवीर इंजेक्शन्स सुरतमध्ये वाटले जात आहे. हा संबंधित पक्षाचा अंतर्गत विषय आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष सी. आर. पाटील यांनी हा त्यासाठी वेगळी ऑर्डर दिलेली आहे. सदरील लस वाटप प्रकरणात राज्य सरकारचा कुठलाही संबंध नाही“ असं त्यांनी स्पष्ट केले आहे.
सुरतमध्ये वाढत्या रुग्णांमुळे भाजप प्रदेशाध्यक्ष सी. आर. पाटील यांनी चिंता व्यक्त केली होती. यामुळे त्यांनी सुरतसाठी 5 हजार रेमडेसिवीर इंजेक्शन्सची व्यवस्था केली. आता त्यांनी हे रेमडेसिवीर इंजेक्शन्स कुठून आणले, हा प्रश्न तुम्ही त्यांनाच विचारा, असं मुख्यमंत्री विजय रुपानी म्हणाले.सरकारने रेमडेसिवीर इंजेक्शनबाबत रुग्णांसाठी वेगळी व्यवस्था केली आहे. भाजपकडून होत असलेल्या रेमडेसिवीर इंजेक्शन्सचे वाटप हे वेगळे आहे. राज्य सरकारने सुरतला पाठवलेल्या रेमडेसिवीर इंजेक्शन्सच्या साठ्याशी याचा काहीही संबंध नाही. सरकारच्या साठ्यातून एकही रेमडेसिवीर इंजेक्शन देण्यात आलेले नाही, असं विजय रुपानी यांनी सांगितलं.
भाजपचे गुजरात प्रदेशाध्यक्ष सी.आर.पाटील यांनी काही दिवसांपुर्वी सुरतमधील न्यू सिव्हील हॉस्पिटलला भेट दिली होती. त्या भेटी दरम्यान पाटील यांनी भाजपकडून गरजू रुग्णांसाठी ५००० हजार रेमडेसिवीर इंजेक्शन्सचे मोफत वाटप केले जाईल अशी घोषणा केली होती. सुरतमधील भाजपच्या पक्ष कार्यालयातून हे रेमडेसिवीर इंजेक्शनचे शनिवारपासून वाटप होईल, असे पाटील यांनी सांगितले होते.
विरोधी पक्षाचे आरोप-प्रत्यारोप
सुरतेत होणार्या रेमडेसिवीरच्या मोफत वाटपावर गुजरातेतील विरोधी पक्षाने आरोप-प्रत्यारोप करायला सुरुवात केली आहे. देशात इतक्या मोठ्या प्रमाणात रेमडेसिवीरचा तुटवडा असताना भाजपकडे इतक्या मोठ्या प्रमाणात रेमडेसिवीर इंजेक्शन्स कुठून आले ? असा सवाल विरोधी पक्षाने विचारायला सुरुवात केली आहे.