मुंबई : 'मला 'लॅव्हीश' रहायला आवडतं', असं मिश्कीलपणे सांगणारे उर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांची मंत्रीपदाचे आसन सध्या डळमळीत झाले आहे. राज्यातील वाढीव विजबिलांचे प्रश्न प्रलंबित असल्याने उर्जा विभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहेत. उर्जामंत्र्यांच्या काळातील उर्जा विभागाचा कारभार, मुंबईतील ब्लॅकआऊट आणि चार्टड विमानाने फिरण्याच्या मुद्द्यांवरुन सरकारला विरोधकांनी घेरले होते.
त्यामुळे हा गोंधळ निस्तारला जावा यासाठी विधानसभेचे माजी अध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे या पदाचा कार्यभार द्यावा, अशी मागणी करणारा एक गट सरकारमध्ये तयार झाला आहे. स्वतः पटोलेही या मंत्रीपदासाठी इच्छुक आहेत. सोबत विधान सभेच्या अध्यक्षपदावर नितीन राऊत यांची नियुक्ती करावी, अशीही काँग्रेसची इच्छा आहे. मात्र, सचिन वाझे प्रकरण सुरू असताना अशाप्रकारे मंत्रीपदांमध्ये फेरबदल हे ठाकरे सरकारला शक्य होणार आहे का याबद्दल दिल्ली दरबारी खलबते सुरू आहेत.
महाराष्ट्र काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पदी नियुक्ती झाल्यानंतर आता नवे विधानसभा अध्यक्ष कोण होणार यावर राजकीय विश्वात चांगलीच चर्चा रंगली होती. मात्र आता ऊर्जामंत्री नितीन राऊत यांची विधानसभा अध्यक्षपदी वर्णी लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसंच प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना ऊर्जा मंत्रीपद देण्यात येणार आहे अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
ऊर्जा मंत्री नितीन राऊत हे राज्यात मोठा चर्चेचा विषय ठरत आहेत. महाविकास आघाडीत ऊर्जामंत्री झाल्यापासून नितीन राऊत हे वाढीव वीज बिल, तसेच नुकतेच त्यांचा बेकायदा विमान प्रवास, कार्यालय व घरातील सुशोभीकरण यामुळे वादात अडकल्याचे दिसत आहेत. विरोधी पक्षांनी ऊर्जामंत्री पदावरून त्यांना हटवण्याची मागणी केली. त्यातच राऊत हे डोईजड होऊ नये म्हणून त्यांना आता ऊर्जामंत्री पदावरून हटवून त्यांना दुसरीकडे स्थलांतर करणार असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे.
राज्यात सध्या ऊर्जा विभागाला विरोधक धारेवर धरत आहेत. त्यामुळे ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांच्यावर सोनिया गांधी सहित दिल्लीतील काही ज्येष्ठ नेते नाराज असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे ऊर्जा मंत्री पद हे इतर कोणाकडे जाण्याची शक्यता आहे. आपल्याला ऊर्जामंत्री पद मिळावा म्हणून महाराष्ट्र प्रदेशाद्याक्ष नाना पटोले यांच्या कडून दिल्लीदरबारी गळ घातली आहे. पण नाना पटोले यांच्या सहित इतरही नावांची चर्चा दिल्लीत सुरू झाली आहे.
गुरुवारपासून महाराष्ट्रातील नेते दिल्लीला पोहचले आहेत. यामध्ये महसूल मंत्री बाळासाहेब थोरात ऊर्जा मंत्री नितीन राऊत आणि महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि सुनील केदार हे नेते दिल्ली दरबारी पोहोचले आहेत. बाळासाहेब थोरात सह काही काँग्रेस नेत्यांनी शरद पवार यांचीही भेट घेतली आहे. त्यामुळे या भेटीत काँग्रेस मध्ये विधानसभा अध्यक्ष पद आणि काँग्रेसजवळ असलेल्या खात्यांचे खांदे पालट संदर्भात चर्चा असल्याची माहिती समोर येत आहे.
काँग्रेस नेते दिल्लीत तग धरून आहेत. तर ऊर्जा मंत्री हे गेल्या दोन दिवसापासून दिल्ली दरबारी तळ ठोकून होते. मात्र शुर्रवारी पुन्हा ते मुंबईत आले. ऊर्जा मंत्री पदासाठी इतर नाव चर्चेत असताना दुसरीकडे क्रीडा मंत्री सुनील केदार यांच्या नावाची देखील जोरदार चर्चा दिल्लीत आहे. त्यामुळे ऊर्जा खाते सुनील केदार यांच्याकडे दिल जाण्याची देखील शक्यता वर्तवली जात आहे. मात्र नाना पटोले यांनाच उर्जा मंत्री पद देतील असं राजकीय विश्लेषक सांगत आहेत.
विधानसभा अध्यक्षपद नितीन राऊतांना ?
नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्यानंतर हे पद कोणाकडे जाणार यासाठी अनेक नावांची चर्चा होती. मात्र ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांच्याकडून ऊर्जा खाते काढून घेतल्यानंतर त्यांचं महत्त्व कमी न करता, त्यांना विधानसभा अध्यक्षपद दिले जाण्याची शक्यता आहे. नितीन राऊत हे दिल्लीतील काँग्रेसच्या काही ज्येष्ठ नेत्याच्या मर्जीतले नेते आहेत. त्यामुळे त्यांच्याकडे विधानसभा अध्यक्षाची जबाबदारी सोपवण्यात यावी अशा प्रकारचा चर्चाही दिल्ली दरबारी सुरू आहे.