आता सचिन वाझे एनआयए कोठडीत आहेतच, पण त्याआधी ते ज्या बेदरकारपणे वागत होते, महाविकास आघाडी सरकारमधील लाभार्थी त्यांची बाजू घेत होते, त्यांचे निलंबन करण्याचीही मुख्यमंत्री व गृहमंत्र्यांची हिंमत होत नव्हती ते पाहता, स्फोटकांच्या गाडीचे प्रकरण केवळ तेवढ्यापुरते मर्यादित नाही, तर त्यात आणखीही काही काळेबेरे दडल्याचे स्पष्ट होते.
प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या ‘अॅन्टिलिया’ निवासस्थानाबाहेर जिलेटीनच्या कांड्यांनी-स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ गाडी आढळल्याप्रकरणी रविवारी ‘राष्ट्रीय तपास यंत्रणे’ने (एनआयए) साहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांना अटक केली आणि नंतर ‘एनआयए’ न्यायालयाने त्यांना दहा दिवसांची कोठडी सुनावली. मात्र, सचिन वाझे यांच्या ‘एनआयए’ने केलेल्या चौकशी आणि सुनावलेल्या कोठडीआधी महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरे, गृहमंत्री अनिल देशमुख, शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांनी अक्षरशः धिंगाणा घातला. कारण, अंबानींच्या घरासमोर सापडलेल्या गाडीपर्यंत सर्वप्रथम सचिन वाझे पोहोचले होते, त्यानंतर तीनच दिवसांत संबंधित गाडीमालकाचा-मनसुख हिरन यांचा रेतीबंदर-मुंब्र्याच्या खाडीत संशयास्पद स्थितीत मृत्यू झाल्याचे आढळले.
इथूनच सचिन वाझे यांचे नाव चर्चेतआले आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत त्यावरूनच राज्य सरकारला धारेवर धरले. मात्र, त्याचवेळी एका साहाय्यक पोलीस निरीक्षकाच्या बचावासाठी मुख्यमंत्र्यांपासून गृहमंत्री आणि शिवसेनेच्या नेत्यांची पलटण उतरली. देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात ‘कॉल डिटेल्स रेकॉर्ड’ (सीडीआर) सादर केले, तर त्यांना ते कुठून मिळाले, असे विचारत त्यांच्याच चौकशीची भाषा त्यांनी केली.
पण त्यानेही देवेंद्र फडणवीस थांबले नाही आणि अखेर अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी सचिन वाझे यांची बदली करण्याची नामुष्की तिघाडी सरकारवर ओढवली. त्यानंतर मुकेश अंबानींच्या ‘अॅन्टिलिया’बाहेरील ‘जिलेटीन’च्या कांड्यांनी भरलेल्या गाडीच्या तपासाची जबाबदारी ‘एनआयए’कडे सोपवण्यात आली आणि पुढच्या घटना घडत गेल्या. दरम्यानच्या काळात सचिन वाझे यांनी, ‘जगाचा निरोप घेण्याची वेळ आली’ अशी आत्महत्यासूचक पोस्टदेखील आपल्या ‘व्हॉट्सअॅप स्टेट्स’ला ठेवली. त्यानेही खळबळ माजली, पण त्यांनी कोणतेही वेडेवाकडे पाऊल उचलण्याआधीच सचिन वाझे यांना अटक करण्यात आली.
आता सचिन वाझे ‘एनआयए’ कोठडीत आहेतच, पण त्याआधी ते ज्या बेदरकारपणे वागत होते, महाविकास आघाडी सरकारमधील लाभार्थी त्यांची बाजू घेत होते, त्यांचे निलंबन करण्याचीही मुख्यमंत्री व गृहमंत्र्यांची हिंमत होत नव्हती ते पाहता, स्फोटकांच्या गाडीचे प्रकरण केवळ तेवढ्यापुरते मर्यादित नाही, तर त्यात आणखीही काही काळेबेरे दडल्याचे स्पष्ट होते. दरम्यान, सचिन वाझे यांना पोलीस सेवेतून निलंबित करण्यात आले होते, त्यानंतर ते शिवसेनेचे सदस्यही झाले आणि राज्यात सत्तांतर झाल्याने कोरोनाच्या कारणावरून त्यांना मुंबई पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण विभागात रुजूही करुन घेण्यात आले.
तसेच मुंबई वा ठाकरे सरकारशी संबंधित प्रकरणे त्यांच्याचकडे पोहोचतील, अशी व्यवस्था केली गेली. मात्र, सचिन वाझे यांना उच्च न्यायालयाच्या आदेशाने निलंबित करण्यात आले होते व अशा अधिकार्याला पुन्हा सेवेत घेणे न्यायालयाचाच अवमान असतो, तरी तो राज्य सरकारने केला. तसेच देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळातही शिवसेनेने सचिन वाझे यांना पुन्हा सेवेत घेण्याचा आग्रह धरला होता, पण फडणवीसांनी ‘अॅडव्होकेट जनरल’शी चर्चा करुन ती मागणी नाकारली होती.
एकूणच यातून सचिन वाझे यांची शिवसेनेशी किंवा शिवसेना नेतृत्वाशी चांगलीच जवळीक असल्याचे व न्यायालयाचा अवमान करून सेवेत घेण्याइतके ते कर्तबगार अधिकारी असल्याचे चित्र निर्माण होते आणि त्यांनी आता सेवेत येताच आपले प्रताप दाखवायला सुरुवात केली असेल; तर फडणवीस सरकारच्या सत्तेतही त्यांनी असेच उद्योग करावे, म्हणून शिवसेना त्यांच्या सेवारुजुतेसाठी आग्रही होती का? फडणवीस सरकारच्या काळात जे करणे शक्य झाले नाही, ते कुटाणे करण्यासाठीच त्यांना आताच्या सत्तांतरानंतर सेवेत पुन्हा घेण्यात आले का? असे प्रश्न उपस्थित होतात आणि अंबानींच्या निवासस्थानाबाहेर ‘जिलेटीन’च्या कांड्या भरलेली गाडी ठेवण्यात सचिन वाझे यांचा खरेच सहभाग होता का? असेल तर त्यांचे अन्य साथीदार कोण? त्यांनी कोणाच्या सांगण्यावरून असा प्रकार केला? तसे कोणी सूत्रधार असेल तर यामागचा त्यांचा नेमका उद्देश काय होता? तसेच यात सचिन वाझे केवळ एक प्यादे असल्याचेही दिसून येते.
कारण, सचिन वाझे यांनीही मी केवळ षड्यंत्रातला छोटा मासा असल्याचे म्हटले आहे, तर मग या कारस्थानातला मोठा मासा कोण? असे विविध प्रश्न निर्माण होतात. विशेष म्हणजे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधीमंडळाच्या सभागृहात देवेंद्र फडणवीसांच्या आरोपांना उत्तर देण्याची धमक नसल्याने पत्रकार परिषदेत सचिन वाझे यांच्याबद्दल ते ओसामा बिन लादेन आहेत का, असा सवाल करत त्यांची पाठराखण केली होती. मग आता सचिन वाझे यांना अटक केल्यानंतर, ‘एनआयए’च्या आतापर्यंतच्या आणि यापुढच्या चौकशीत त्यांनी तोंड उघडल्यानंतर तरी नक्की ओसामा बिन लादेन कोण हे समजेल का? हाही प्रश्न उपस्थित होतो.
दरम्यान, सचिन वाझे यांच्यावर ‘एनआयए’ने दाखल केलेली कलमे त्यांच्या गुन्ह्याचे गांभीर्यनिदर्शकच आहेत. ‘एनआयए’ने सचिन वाझे यांच्यावर भारतीय दंड संहितेच्या ‘कलम २८६’ - जाणीवपूर्वक किंवा अजाणतेपणाने स्फोटके बाळगणे, इतरांच्या जीवाला धोका होईल अशी कृती करणे, ‘कलम ४६५’ - खोट्या किंवा बनावट गोष्टी करणे, ‘कलम ४७३’ - दिशाभूल करण्यासाठी केल्या जाणार्या बनावट कृती, ‘कलम ५०६(२)’-दहशत निर्माण करणे किंवा धमकी देणे, ‘कलम १२० ब’-गुन्हेगारी स्वरुपाच्या षड्यंत्रात सहभाग घेणे आणि ‘स्फोटक पदार्थ कायदा १९०८’ ‘कलम ४ अ, ब’-स्फोटके बाळगणे या कलमांतर्गत गुन्हा नोंदवला आहे. कोणतेही न्यायालय समोर आलेल्या आरोपीविरोधात प्रथमदर्शनी पुरावा नसेल तर त्याच्यावर इतक्या गंभीर कलमानुसार गुन्हा दाखल करण्याचा व कोठडीत पाठवण्याचा निर्णय घेत नाही, म्हणजेच इथे सचिन वाझे यांच्याविरोधात सकृतदर्शनी पुरावे आढळले आणि त्यांना कोठडी सुनावण्यात आली.
तसेच सुरुवातीला स्फोटक प्रकरणात ‘स्कॉर्पिओ’ गाडीची चर्चा होत होती, पण आता ‘स्कॉर्पिओ’चा पाठलाग करणारी पांढरी ‘इनोव्हा’ गाडीदेखील ‘एनआयए’ने ताब्यात घेतली आहे. उल्लेखनीय म्हणजे, जप्त केलेल्या ‘इनोव्हा’ गाडीवर पोलीस असे लिहिलेले असून ही गाडी खरेच पोलिसांची होती का? असेल तर कोणत्या पोलिसांची, कोणत्या पोलीस ठाण्याची आणि ती गाडी ‘स्कॉर्पिओ’चा पाठलाग का करत होती? असे अनेक प्रश्न समोर येतात. आगामी काही दिवसांत चौकशी पुढे जाईल तसतशा घडामोडी उलगडत जातीलच, सचिन वाझे यांचा खरा चेहरा समोर येईलच, पण ठाकरे सरकार त्यांचा का, कशासाठी बचाव करत होते, हेही उघड होईल आणि त्यात ठाकरे सरकारच्या उरल्यासुरल्या अब्रुची लक्तरे टांगण्याची ताकद असेल.