मुंबई : आज राज्यभर वाढीव वीजबिलांविरोधात भाजपने महावितरणाच्या कार्यालयाबाहेर 'टाळा ठोको' आंदोलन पुकारले आहे. कोरोना काळात सर्वसामान्यांना चार ते पाच पटीने वाढीव वीजबिल आली आणि सवलत देऊ असे सांगून ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी यूटर्न घेतला.याविरोधात आज मुंबईत वडाळा महावितरण कार्यालयासमोर भाजप मुंबई पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात निदर्शने करत महावितरणला 'टाळा ठोको' व 'हल्लाबोल' आंदोलन केले.
कोरोनाच्या कठीण काळात आर्थिक परिस्थिती ढासळलेली असतानाच वाढीव वीजबिलांमुळे सर्व सामान्यांचे अतोनात हाल झाले आहेत. त्यात माजलेल्या सरकारने वीज बिल माफ करणार नाही असं म्हटलंय. त्यांचा हाच माज उतरवण्यासाठी जनतेच्या हितार्थ वीजबिल सवलतीसाठी महावितरण विरोधात आम्ही आंदोलन पुकारलं आहे. आणि आलेल्या वाढीव बिलाची होळी आम्ही या ठिकाणी केली आहे असं भाजपचे वरिष्ठ नेते कालिदास कोळंबकर यांनी आंदोलन करताना म्हटले.
कोरोनाच्या काळात आधीच सर्वसामान्य नागरिक संकटात आहेत आणि महावितरणने त्यांना अधिकचे विज बिल दिले आहे. सर्वसामान्यांना हे वीजबिल भरणे अशक्य आहे. त्यामुळेच सवलत मिळावी अशी सर्वसामान्यांची मागणी आहे. विविध राजकीय संघटनांनी याविरोधात वारंवार आंदोलने केली, निवेदने दिली. यावरून ऊर्जा मंत्र्यांनी वीज बिलात सूट देऊ असे आश्वासन दिले. मात्र आता वीज बिल भरा अन्यथा मीटर कट करू असा फतवा या सरकारने काढला आहे . त्यामुळे नागरिक चिंतित झाले आहेत म्हणून आज भाजपने राज्यभर आंदोलन करत सरकारचे डोळे उघडे करण्याचा प्रयत्न केलाय. जोपर्यंत बीज बिलाबाबत निर्णय हे सरकार घेत नाही तोपर्यंत आम्ही सर्वसामान्यांसाठी लढत राहू असे दक्षिण-मध्य मुंबई अध्यक्ष राजेश शिरोडकर यांनी सांगितले.तसेच राज्यभरात विविध ठिकाणी आंदोलन होत असताना भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी मुंबईत मुलुंड येथील महावितरण कार्यालयावर आंदोलन करत, निर्णय घ्या अन्यथा खुर्ची खाली करा अशा सरकार विरोधात घोषणा दिल्या व वीज बिल कमी करावे किंवा योग्य निर्णय घ्यावा अशी मागणी यावेळी सोमय्यांनी केली