कथालेखकापासून नाट्यदिग्दर्शनापर्यंत अशा कलेच्या विविध प्रांतांमध्ये मुसाफिरी करणार्या भिकू बारस्कर यांनी स्वत:सोबतच अनेक कलावंत घडविले. त्यांच्याविषयी आपण जाणून घेऊया...
बारस्कर हे मूळचे खोपोली येथील आहेत. त्यांचा जन्म कल्याणमध्ये झाला. त्यांची घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची होती. आई आणि वडील दोघेही मोलमजुरी करून घरचा गाडा कसाबसा हाकत होते. त्या बिकट अवस्थेत खेळण्या-बागडण्याच्या वयात त्यांची पावले अर्थाजन करण्याकडे वळत होती. या परिस्थितीतही त्यांनी कधी हार मानली नाही. अभ्यासाकडे दुर्लक्ष होऊ दिले नाही. बारावीपर्यंतचे शिक्षण त्यांनी पूर्ण केले. ते शाळेत असतानाच कल्याण-डोंबिवली महापालिकेत काम करू लागले. त्याकाळात कल्याण नगरपालिका होती. नगरपालिकेतर्फे रस्त्याची कामे चालत.
दिवसभर रस्त्याची कामे संपल्यावर फावडं-घमेली एकत्र साठवून त्यावर पत्रे ठेवायचे, असे सायंकाळी ६ ते सकाळी ८ पर्यंत १४ तास ते काम करीत असत. त्यांना एका दिवसाला चार रुपये मिळत होते. सकाळी शाळा आणि रात्री अर्थाजनासाठी नोकरी असाच त्यांचा दिनक्रम होता. नगरपालिकेची आता इमारत उभी आहे त्याठिकाणी पूर्वी एक उद्यान होते. त्या उद्यानात बारस्कर पहारेदार म्हणून काम करीत होते. उद्यानाकडे लक्ष देता देता ते रात्रभर अभ्यास करीत असत. नोकरी करत ते शिक्षणाचा एक एक टप्पाही पार करत होते. आता महापालिकेत ते शिपाई पदावर काम करू लागले होते. महापालिकेत शिपाई पदावर काम करीत असताना शिक्षणाची जोड मिळाल्याने त्यांनी ‘क्लार्क करा’ असा आग्रह धरला होता. त्यावेळी भगवानराव जोशी नगराध्यक्ष होते. त्यांनीही बारस्कर यांना ‘तुझे काम करू’ असा शब्द दिला.
तो शब्द जोशी यांनी पाळला. बारस्कर यांना ‘डिफेन्स’मध्ये काम करण्याची इच्छा होती. शाळेत असताना त्यांनी ‘एनसीसी’मध्ये जाण्याचा प्रयत्न केला होता. बारस्कर यांच्या त्या प्रयत्नाला यश आले नव्हते. धडाडीचे काम करण्याचा विचार बारस्कर यांनी मनाशी पक्का केला होता. त्यासाठी त्यांनी ‘होमगार्ड’मध्ये प्रवेश केला. सोबतच ‘सिव्हील डिफेन्स’चे विविध कोर्स त्यांनी केले. त्यानंतर त्यांची बदली अग्निशमन दलात झाली. या क्षेत्रातील मूलभूत कोर्सेस त्यांनी मुंबईला जाऊन केले. ‘फायर फायटर’ असे सगळे कोर्स करीत असतानाच ते शहरात कुठे आग लागल्यास त्यासंबंधीचा फोन आल्यानंतर अग्निशमनाचे कामही करीत होते. अग्निशमन दलात काम करताना शहराचा पूर्णपणे अभ्यास असणे गरजेचे आहे, अशी जाणीव त्यांना झाली. एखाद्या परिसरात आग लागली आणि कॉल आला तर गाडी कोणत्या रस्त्याने गेली पाहिजे, हे माहीत असले पाहिजे. याकरिता त्यांनी अभ्यास केला. शहराच्या इतिहासाबद्दल अधिक माहिती जाणून घ्यायची संधी त्यांना मिळाली. महापुरापासून ते दंगलीपर्यंत सगळ्या प्रकारच्या ‘कॉल’वर बारस्कर जात होते.
नगरपालिकेला १२५ वर्षे पूर्ण झाली. त्यावेळीच्या कर्मचार्यांनी ‘शतकोत्तर रौप्य महोत्सव’ साजरा करण्याचे ठरविले. तेव्हा नाटक बसविण्याचा विचार पुढे आला. नारायणराव मराठे हे नगरसेवक होते. त्यांना नाटकाची आवड असल्याने त्यांनी कर्मचार्यांना एकत्रित केले. बारस्कर हे १९७६ पासून ‘अनुराग नाट्यसंस्थे’त कार्यरत होते. बारस्कर यांना नाटकाची आवड होती. ते नाटकेही करत. त्यांनी ‘नंदादीप’ नावाचे नाटक केले. त्यानंतर नाटकाची मालिकाच सुरू झाली. राज्य नाट्य स्पर्धेत ते उतरू लागले. त्यांनी १९८० च्या दरम्यान मयुरेश सामाजिक आणि सांस्कृतिक संस्था स्थापन केली. या संस्थेत अनेक मुले-मुली येत. या मुलांसोबत अनेक सांस्कृतिक कार्यक्रम केले. या मुलांना हाताशी धरून ते सामाजिक कामाकडे वळले. बारस्कर ज्या परिस्थितीतून आले होते, त्याची जाणीव कायम होती.
१९९५च्या अगोदरच्या काळात कल्याण-डोंबिवलीत प्रशासकीय राजवट होती. त्यामुळे कोणीही नगरसेवक नव्हते. त्यामुळे सामाजिक काम फारसे कुणी करत नव्हते. मयुरेश संस्थेतील मुलांना सोबत घेऊन बारस्कर कुष्ठरोग्यांना फराळ वाटप, वनवासींना कपडे वाटप, रक्तदान शिबीर, चष्मा वाटप शिबीर घेत होते. या कामाला चांगला प्रतिसादही मिळत होता. १९९०-९७ या काळात विशेष कार्यकारी दंडाधिकारी म्हणून त्यांनी काम केले होते. १९९७ नंतर त्यांना विशेष कार्यकारी अधिकारी पद मिळाले. राजकीय क्षेत्रात ते फारसे रमले नाही. सांस्कृतिक कार्यक्रम करीत होते. त्यातूनच त्यांना कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करण्याची आवड निर्माण झाली. मोठेमोठे ‘इव्हेंट’ ते करू लागले. बारस्कर यांनी अत्रे रंगमंदिर येथे बाबासाहेब पुरंदरे यांच्या वाढदिवसाचा ‘इव्हेंट’ केला होता. अशा प्रकारचे कार्यक्रम करण्यात त्यांचा हातखंडा होता.
अग्निशमन दलात काम करत असताना त्यांची लेखनकला हळूहळू फुलत होती. अनेक नाटकांचे दिग्दर्शन त्यांनी केले आहे. ‘होऊन जाऊ दे’ या नाटकाचे पुणे, मुंबई, नाशिक, बारामती अशा अनेक ठिकाणी प्रयोग केले आहेत. सगळे करताना त्यांनी आपली नोकरी सांभाळली. तरुणांनी कोणतीही कला जोपासताना प्रथम नोकरी-व्यवसाय सांभाळावा. त्यानंतरच कला जोपासा असा सल्लाही बारस्कर यांनी दिला आहे. नाट्यपरिषद कल्याण शाखेचे अध्यक्षपद त्यांनी दहा वर्षे भूषविले. महाराष्ट्र साहित्य परिषद-पुणे शाखेच्या कल्याण उपशाखेचा कार्याध्यक्ष आहे. सध्या ही ते कार्याध्यक्ष पदांवर आहेत. सार्वजनिक वाचनालय सरचिटणीस म्हणून ते काम आजही पाहत आहे.
डोंबिवलीनंतर कल्याणमध्ये सुरू झालेल्या ‘नववर्ष स्वागतयात्रा इव्हेंट’मध्ये १४ वर्षे बारस्कर यांचा सहभाग होता. स्वागतयात्रेमधील राजकारणाला कंटाळून त्यांनी त्यातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. २००१ पासून कथा लिखाणास सुरुवात केली. साहित्यिक राजीव जोशी यांच्यासोबत गप्पा मारताना बारस्कर यांच्यातील लेखक जागा झाला. त्यांनीही लिखाणास सुरुवात केली.आतापर्यंत त्यांचे पाच कथासंग्रह प्रकाशित झाले. एक काव्यसंग्रह आणि एक कथासंग्रह संपादित करण्याचे काम बारस्कर यांनी केले. दोन व्यक्तींची आत्मचरित्र तयार करण्याचे काम सुरू आहे. दिलीप गुंड आणि भास्कर शेट्टी यांच्या जीवनावरील आत्मचरित्राचे काम सुरू आहे.
- जान्हवी मोर्ये