क्षत्रियाने कधीही धीर न सोडता, तलवार चालवली तर ‘जय’ अवश्य प्राप्त होतो. समर्थ सांगतात की, जसा तोफेचा गोळा गवताच्या गंजीत निर्भयपणे शिरतो, तसे क्षत्रियाने मुसंडी मारून शत्रूच्या सैन्यात शिरले पाहिजे. अशा रीतीने सैन्यातील प्रत्येकजण उसळून आला, तर शत्रूसैन्याची पर्वा करण्याचे कारण नाही. मर्दाने आपली ताकद, आपला उत्साह न सोडता लढले तर ‘जय’ प्राप्त होतो. समर्थांची ही चढाई करण्याची रणनीती शिवाजी महाराजांनी वापरलेली होती. परंतु, समर्थांचा विवेक येथेही दिसून येतो.
सर्व महाराष्ट्रीय संतांनी परमेश्वराच्या भक्तिमार्गाचे प्रतिपादन करून सामान्यातल्या सामान्य माणसाला उद्धाराची वाट मोकळी करून दिली. समर्थ रामदास स्वामी या संतपरंपरेपेक्षा निराळे होते, असे मानण्याचे कारण नाही. ‘दासबोध’ ग्रंथ लिहायला घेतल्यावर समर्थांच्या दृष्टीसमोर ही भक्तिपरंपरा होती. कारण, ग्रंथाच्या सुरुवातीस समर्थ, भक्तिमार्गाचा गौरव करताना दिसून येतात.
भक्तिचेनि योगें देव। निश्चयें पावती मानव। ऐसा आहे अभिप्राव। इये ग्रंथीं॥
दासबोध ग्रंथाचे प्रास्ताविक करताना, ‘येथ बोलिला विशद। भक्तिमार्ग।’ किंवा ‘मुख्य भक्तीचा निश्चयो’ हे स्पष्ट करतात. मनाच्या श्लोकातही ‘मना सज्जना भक्तिपंथेचि जावे’ असे सांगून भक्तिमार्गाचे महत्त्व किती आहे, हे श्रोत्यांना स्पष्ट करतात. दासबोध ग्रंथात समर्थांनी भक्ती, ज्ञान, वैराग्याची लक्षणे, ब्रह्म, माया यांचे निरूपण केले आहे. तसेच त्या अनुषंगाने येणार्या नाना मतांचा विचार केला आहे. बहुतेक सर्व पारमार्थिक कल्पना समर्थांनी विवेचनात स्पष्ट केल्या आहेत. तसेच शुद्धज्ञान, सायुज्जमुक्ती, मोक्ष, विदेहस्थिती यांचा ऊहापोह करीत ज्ञानमय भक्तिमार्गाचे स्पष्टीकरण केले आहे. त्यांच्या सर्व विवेचनात विवेकाचा वावर सर्वत्र दिसून येतो. भक्तिमार्गातील फापटपसारा दूर करण्याचा समर्थांनी प्रयत्न केला. त्यासाठी बुद्धिनिष्ठ विवेकाचे महत्त्व व कार्य मोलाचे ठरले.'
समर्थांनी भक्तिमार्ग सांगताना जुन्या रूढ परंपरांगत समजुतींचे अनुयायित्व पत्करले नाही. विवेकाच्या साहाय्याने अनावश्यक रुढी, पूर्वापार चालत आलेल्या समजुती मोडीत काढून खर्या भक्तिमार्गाच्या मुळाशी असलेल्या तत्त्वज्ञानाचा बुद्धिनिष्ठ पाठपुरावा केला. भोळसर, नेभळट, अज्ञानी समजुतींना त्यांच्या विवेकयुक्त विचारसरणीत स्थान उरले नाही. तो काळच असा होता की, जुन्या रूढी पूर्वापार समजुतींनुसार परमार्थासाठी लोक प्रपंचाची अवहेलना करीत होते. त्यामुळे ना धड परमार्थ होत होता ना प्रपंच. अशा प्रसंगी समर्थांनी प्रपंचविज्ञानाला बाधक परंपरागत रूढी, समजुती परमार्थ क्षेत्रांतून विच्छिन्न करून टाकल्या आणि लोकमताचा ओघ बदलण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे समर्थांचे परमार्थ क्षेत्रातील कार्य समाजोपयोगी व राष्ट्रीयहिताच्या दृष्टीने उपयोगी ठरले. परमार्थ तोच असला किंवा भक्तिमार्ग तोच असला तरी इतर संतांपेक्षा, त्याकडे पाहण्याची समर्थांची दृष्टी वेगळी होती.
एका अर्थाने समर्थ क्रांतिकारक होते, असे म्हटलेले समर्थांच्या शिष्यांना अथवा भक्तांना आवडो अथवा न आवडो, पण तसे मानण्यास जागा आहे. भक्ती ही तर महत्त्वाची आहेच, पण त्यासाठी हिंदू संस्कृतीचे रक्षण प्रथम महत्त्वाचे. हिंदवी संस्कृतीचे वर्धन करायचे, तर त्यासाठी अनुकूल राजकीय व सामाजिक वातावरण असले पाहिजे. हा विचार करून समर्थांनी सात्त्विक लोकांच्या संघटना उभारल्या, त्यांच्या विचारांना दिशा दिली, स्वप्रयत्नाने हिंदुस्थानभर स्वायत्त मठांचे जाळे तयार करून तेथे महंतांना कार्य प्रसारार्थ पाठवले. जुलमी अन्यायी विध्वंसक म्लेंच्छ सत्तेपासून हे राज्य सोडवून तेथे हिंदू संस्कृतीला पोषक रामराज्याची स्थापना करावी, असे विचार लोकांसमोर मांडले. लोकांना बलोपासनेची, प्रयत्नवादाची शिकवण दिली. सामान्य माणसे आपल्या समजुती सोडून द्यायला सहसा तयार नसतात. अशा जनसामान्यांना बुद्धिनिष्ठ, तर्कनिष्ठ बनवून त्यांना खर्या भक्तिमार्गाची ओळख करून द्यावी, हे काही सोपे काम नाही.
प्रभावी व्यक्तिमत्त्व आणि चारित्र्य असणार्या व्यक्तीच ते करू शकतात. समर्थ त्या प्रवर्गातील असल्याने ते अवघड कार्य यशस्वी करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. जनांच्या रुढ समजुती व विचार यांच्या प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जाऊन स्वबळावर जनमताचा ओघ बदलण्याचे समर्थांचे कार्य ऐतिहासिक व राष्ट्रीय स्वरुपाचे होते. तसेच ते नवीन विचारांच्या राष्ट्रनिर्मितीला अनुकूल होते, उपयुक्त होते. समर्थांनी भक्तीचे स्वरस स्पष्ट करताना बल व प्रयत्नांची महती सांगितली. संघटना, चातुर्य दाखवले. एकीचे महत्त्व विशद केले आणि क्षात्रधर्म समजावून सांगितला. प्रपंचविज्ञानासाठी, स्वधर्मराष्ट्र निर्मितीसाठी क्षात्रधर्म समर्थांनी सांगितला. ते विवेचन राजकीयदृष्ट्या महत्त्वाचे आहे. क्षात्रधर्म हा क्षत्रियांचा, वीरांचा धर्म आहे. तो परम दुर्लभ आहे. ज्याला जीवाची भीती वाटत असेल, त्याने क्षात्रधर्माच्या भानगडीत पडू नये.
जयास जीवाचे वाटे भये।
तेणें क्षात्रधर्म करू नये।
काही तरी करून उपाये। पोट भरावे॥
क्षात्रधर्म म्हणजे पोट भरण्याचे साधन नाही. क्षत्रिय हा निर्भय असावा. युद्धात त्याने शौर्य गाजवावे. रणांगणातून भिऊन पळून येताना जर मरण आले, तर नरकद्वारात उभे केले जाईल. तसेच ते लौकिकालाही साजेसे नाही. यासाठी युद्धप्रसंगी-
मारिता मारिता मरावें।
तेणे गतीस पावावें।
फिरोन येतां भोगावें। महद्भाग्य॥
हा क्षत्रियांना केलेला उपदेश गीतेतील ‘हतो वा प्राप्यसि स्वर्गम्। जित्वा वा मोक्षसे महीम्।’ या श्लोकावर आधारित आहे. क्षत्रियाने कधीही धीर न सोडता, तलवार चालवली तर ‘जय’ अवश्य प्राप्त होतो. समर्थ सांगतात की, जसा तोफेचा गोळा गवताच्या गंजीत निर्भयपणे शिरतो, तसे क्षत्रियाने मुसंडी मारून शत्रूच्या सैन्यात शिरले पाहिजे. अशा रीतीने सैन्यातील प्रत्येकजण उसळून आला, तर शत्रूसैन्याची पर्वा करण्याचे कारण नाही. मर्दाने आपली ताकद, आपला उत्साह न सोडता लढले तर ‘जय’ प्राप्त होतो. समर्थांची ही चढाई करण्याची रणनीती शिवाजी महाराजांनी वापरलेली होती. परंतु, समर्थांचा विवेक येथेही दिसून येतो. चढाईचे धोरण ठरवताना, ‘कार्य प्रसंग समय ओळखावा’ हे सांगायला समर्थ विसरत नाहीत. युद्धाची सीमा सांडून क्षत्रियाने खणखणाटाने युद्ध करावे. ज्यांनी आपला स्वधर्म बुडवला, देवांचा उच्छेद मांडला आहे, अशांबरोबर युद्ध करताना ‘पराजय’ पत्करून नुसते जीवंत राहण्यापेक्षा रणांगणात गेलेले काय वाईट, समर्थ सांगतात-
देवमात्र उच्छेदिला।
जित्यापरीस मृत्यू भला।
आपुला स्वधर्म बुडविला। ऐसे समजावे ॥
क्षात्रधर्मात आपली संघटना व आपली विचारसरणी याला खूप महत्त्व आहे. त्यासाठी-
मराठा तितुका मेळवावा।
आपुला महाराष्ट्रधर्म वाढवावा।
येविषयी न करिता तकवा।
पूर्वज हांसती ॥
आपला महाराष्ट्रधर्म वाचवण्यासाठी आपल्या लोकांचे संघटन जरुरीचे आहे. आपले संघटन एवढे मजबूत असावे की, ते कधीही तुटता उपयोगाचे नाही. संघटनेत एक विचार आणि एकवाक्यता महत्त्वाची असते. आपापसातील भांडणाने कोणी संघटन तोडून दुसरा गट स्थापन करण्याचा प्रयत्न केला तर त्याला कोणी चांगला म्हणणार नाही.
एक जाती दोन जाती पावला।
तो कैसा म्हणावा भला।
तुम्हां सकळांस कोप आला।
तरी क्षमा केली पाहिजे ॥
हा विचार काही अतिसाहसी लोकांना पसंत पडणारा नाही, हे मला माहीत आहे. तेव्हा त्यांनी मला क्षमा करावी, पण एकविचाराचे संघटन तुटता नये, असे समर्थांनी कळकळीने सांगितले आहे.
देवद्रोही तितुके कुत्ते।
मारुनि घालावे परते।
देवदास पावती फत्ते।
यदर्थी संशय नाही॥
संघटन आणि देवधर्माच्या रक्षणासाठी जीवाची बाजी लावणे, हा क्षात्रधर्म समर्थांनी सांगितला आहे.
svjakhadi@gmail.com