मुख्यमंत्र्यांनी ठामपा आयुक्त आर. ए. राजीव यांची चौकशी करावी अशी सरनाईकांची मागणी
ठाणे: शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक आणि सध्या ‘एमएमआरडीए’चे आयुक्त असलेले तत्कालीन ठामपा आयुक्त आर. ए. राजीव यांच्यातील वैर संपताना दिसत नाही. ठाणे महापालिकेत आयुक्तपदाच्या कार्यकाळात या दोघांमधील वाद शिगेला पोहोचले होते. ‘टॉप्स सिक्युरिटी’ कंपनीच्या कथित गैरव्यवहार प्रकरणी ‘ईडी’ने सुरू केलेल्या चौकशीच्या निमित्ताने हे दोघे पुन्हा एकदा आमने-सामने आले आहेत.
‘ईडी’मार्फत सुरू असलेल्या चौकशीत प्रताप सरनाईक यांचे निकटवर्तीय असलेल्या अमित चंडोले याला अटक झाली असून ते सध्या कोठडीत आहेत. सरनाईक पितापुत्रांकडेही ‘ईडी’ने चौकशी केली असून सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळे सध्या त्यांना संरक्षण आहे. याप्रकरणी ‘ईडी’ने ‘एमएमआरडीए’चे महानगर आयुक्त आर. ए. राजीव यांना समन्स बजावून चौकशीसाठी बोलावले होते. जवळपास सात तास ही चौकशी झाली. ‘ईडी’ कार्यालयातून बाहेर पडल्यानंतर ‘टॉप्स सिक्युरिटी’ला ‘क्लिन चीट’ दिली नसल्याचे वक्तव्य राजीव यांनी केल्याने खरी ठिणगी पडली.
‘टॉप्स’ला दिलेल्या ठेक्याचा वाद २०१४ ते २०१७ दरम्यानचा आहे. त्यावेळी युपीएस मदान हे आयुक्त होते. त्यांच्या अपरोक्ष मी चौकशीला सामोरे जातो आहे, असा राजीव यांचा दावा चुकीचा आहे. राजीव यांच्या कार्यकाळात जर काही घोटाळा झाला असेल तर त्याला राजीव हेसुद्धा जबाबदार असू शकतात. त्यामुळे त्यांनी बचावात्मक पवित्रा न घेता खरीखुरी माहिती देणे गरजेचे आहे. तसेच, प्रसारमाध्यमांसमोर माहिती जाहीर करून त्यांनी गोपनीयतेचा भंग केला असून राज्याच्या मुख्य सचिवांमार्फत मुख्यमंत्र्यांनी त्यांची चौकशी करावी, अशा मागणी सरनाईक यांनी केली आहे.
मुंबईच्या येलोगेट पोलीस ठाण्यात ऑक्टोबर, २०२० मध्ये तक्रार दाखल झाल्यानंतर आर्थिक गुन्हे शाखा व ‘ईडी’च्या अधिकार्यांनी ‘एमएमआरडीए’कडे या प्रकरणाची चौकशी केली. तेव्हा, राजीव यांच्या संमतीने ‘एमएमआरडीए’च्या अधिकार्यांनी अंतिम कागदपत्रेही सादर केल्याचे समजते. त्या अंतिम अहवालाची माहिती शासनाला दिली आहे का? या संदर्भात शासनातील मुख्यमंत्री, नगरविकासमंत्री अथवा मुख्य सचिवांशी यासंदर्भात चर्चा झाली का? मंत्रिमंडळातील एका ज्येष्ठ मंत्र्यांनी प्रशासकीय सेवेतील काही अधिकारी हे उद्योगपतींच्या गाड्या घेऊन फिरतात, असे सांगितले असल्याने अशा प्रकरणांमुळे विरोधी पक्षाला अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी शासनाला अडचणीत आणण्यासाठी राजीव रसद पुरविण्याचे काम तर करत नाहीत ना? अशा अनेक शंका आ. सरनाईक यांनी व्यक्त केल्याने वाद पेटण्याची चिन्हे आहेत.