सोमवार, दि. १३ डिसेंबर रोजी वेदमूर्ती डॉ. भीमराव कुलकर्णी यांचे वयाच्या १०० व्या वर्षी डोंबिवलीत निधन झाले आणि एक चालताबोलता ज्ञानयज्ञ शांत झाला. आजच्या काळातील निवडक अशा वेदवेत्त्यांमध्ये डॉ. भीमराव कुलकर्णी यांचे स्थान खूप वरचे होते. त्यांच्या निधनाने ज्ञानविज्ञान क्षेत्रातील एक लखलखीत व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड गेले आहे, असेच म्हणावे लागेल.
भारतीय आणि हिंदू संस्कृतीचे ठळक वैशिष्ट्य आणि अभिमानस्वरूप असलेल्या वेदांची अनेक भाषांतरे किंवा अनुवाद अनेक विद्वानांनी केले. परंतु, केवळ विज्ञानाधिष्ठित अर्थाच्या दृष्टिकोनातून वेदांचा अर्थ सामान्यांना समजेल अशा सोप्या भाषेत लिहिण्याचे अत्यंत कठीण कार्य डॉ. भीमराव कुलकर्णी यांनी केले आहे.वेदमूर्ती डॉ.भीमराव कुलकर्णी यांचे नाव वेदांच्या, किंबहुना वेदांच्या भाषांतराच्या संदर्भात मी ऐकून होतो. चारही वेदांचे, ॠग्वेद, यजुर्वेद, अथर्ववेद आणि सामवेद यांचे अनुवाद त्यांनी केले आहेत, हे मला ठाऊक होते. वेदांवर विपुल साहित्य निर्माण करणारे डॉ. भीमराव कुलकर्णी, जी. एस. मेडिकल कॉलेजमध्ये अध्यापन करीत होते, ते इलेक्ट्रॉनिक इंजिनिअर झाले, अनेक विषयांत त्यांना गती आहे, स्वत:चा मोबाईल आणि टीव्ही ते स्वत: दुरुस्त करतात, याही वयात ते केवळ माहिती मिळविण्यासाठी बाईकवरून किंवा चारचाकीतून दोन दोन हजार मैलाचा प्रवास करतात... हे सर्व ऐकून त्यांना भेटण्याविषयी मी खूपच उत्सुक होतो.त्यांचा हा सर्व व्यासंग, वेदांचे आकर्षण आणि त्यासाठी त्यांनी केलेले कष्ट, घेतलेले परिश्रम म्हणजे एक अथक प्रवासच आहे. त्यांच्या या विलक्षण प्रवासाचा मागोवा घेण्याचा या लेखातून केलेला हा प्रयत्न...
विश्वकोश निर्मितीचे केंद्र असलेल्या वाई या नितांत सुंदर रमणीय गावात डॉक्टरांचे बालपण आणि प्राथमिक शालेय शिक्षण झाले. पुढे मुंबईत येऊन त्यांनी एम.एस्सी.पीएच.डी. केले आणि नंतर जी. एस. मेडिकल महाविद्यालयात ते अध्यापन करू लागले. यादरम्यान वेदांच्या भाषांतराचे काम करावयाचे आहे, याची नोंद त्यांच्या अंतर्मनात सतत होती.या ध्येयामागे दोन प्रेरणा होत्या. पहिली प्रेरणा अशी की त्यांना शालेय जीवनात संस्कृत शिकविणारे गोटखिंडीकर नावाचे शिक्षक होते; ते नेहमी म्हणत की, ॠग्वेदामध्ये विज्ञान ठासून भरले आहे. हे ज्ञान-विज्ञान मराठी भाषेत आणायला हवे, जगासमोर यायला हवे. डॉ. भीमराव कुलकर्णी यांच्या अंतर्मनात कुठेतरी या विधानाची नोंद होतीच आणि त्याचवेळेस म्हणजे प्राध्यापक म्हणून निवृत्त व्हायच्या काळात डोंबिवलीतील लेलेशास्त्री त्यांना एकदा म्हणाले की “आम्ही पौरोहित्य करताना ॠग्वेदातील ॠचा म्हणतो, पण आम्हाला त्या ॠचांचा अर्थ माहीत नाही, तो तुम्ही आम्हाला समजावून सांगा.” लेलेशास्त्री यांच्या वाक्यावरून डॉ. भीमराव यांना त्यांच्या गोटखिंडीकर या शिक्षकांच्या वाक्याची आठवण झाली आणि त्यांनी वेदांच्या भाषांतराचे काम सुरु केले.
अर्थातच, हे काम तसे सोपे नव्हते. डॉ. भीमराव संस्कृत भाषेचे जाणकार होतेच, त्यांचे वडीलही संस्कृततज्ज्ञ होते आणि घरात संस्कृतची परंपरा असली तरी वेदांतील संस्कृत वेगळेच आहे, हे त्यांच्या लक्षात आले. वेगळे म्हणजे नित्याचे संस्कृत व्याकरण आणि वेदांतील संस्कृतचे व्याकरण यात खूप फरक आहे, हे ध्यानात आल्यावर त्यांनी वेदांतील संस्कृत भाषेच्या व्याकरणाचा अभ्यास सुरु केला. पुण्यातील काही ज्ञानी मंडळींशी संपर्क साधून, चर्चा करून आधी वेदांतील व्याकरण समजावून घेतले. त्याचबरोबर सायनाचार्य यांच्या ॠग्वेदीय भाषांचे खंड मिळविले आणि आद्य व्याकरणकार पाणिनीच्या आधीच्या संस्कृत व्याकरणाचा अभ्यास केला.मुळात ब्रह्माचे, ब्रह्मज्ञानाचे मूर्त स्वरूप म्हणजेच वेद होय. सर्वसामान्यपणे विचार केला तर तत्कालीन समाजरचना आणि आपापसातील व्यवहाराचे नियम वेदांत ग्रंथित केले आहेत आणि हे नियम निसर्गाला अनुसरून असल्यामुळे या ग्रंथांना ‘वेद’ म्हणून मान्यता मिळाली आहे.
डॉ. भीमराव कुलकर्णी यांनी तर्काच्या कसोटीवरच वेदांचे अनुवाद केले. वेदांतील ॠचांचे दोन अर्थ असून एक अर्थ पारंपरिक असून दुसरा गूढ म्हणजेच विज्ञानाधिष्ठित असा आहे. म्हणून अनुवाद करताना पारंपरिक अनुवाद न करता, त्यातील विज्ञान म्हणून जे काही आणि जेवढे असेल, ते मराठी भाषेत आणायचे आणि साधी, सरळ, सोपी भाषा वापरायची हा दंडक पाळला.चारही वेद मिळून एकूण ३० हजारांच्यावर ॠचा आहेत आणि त्या ॠचा अनेक मंडले, सूक्ते यात छंदोबद्ध केल्या आहेत. जवळपास ६०० हूनअधिक ॠषींनी वेदांची मांडणी केली असून, त्यात ३० स्त्रियांचाही सहभाग होता. काही सूक्तांची रचना तरब्राह्मणांव्यतिरिक्त अन्य जातीतील विद्वानांनी केली आहे. यावरून एक गोष्ट लक्षात येते की, वेदकाळात स्त्रियांना आणि अन्य जातींच्या लोकांनाही वेद पठणाचा अधिकार होता. स्त्रिया आणि ब्राह्मणांव्यतिरिक्त अन्य जातीतील लोकांना वेद पठणाचा किंवा ‘ॠत्विज’ म्हणून धार्मिक कार्ये करण्याचा अधिकार नव्हता, हा दंडक त्यावेळच्या काही स्वार्थी महाभागांमुळे घातला गेला असावा. स्त्रिया केवळ वेद पठणच नव्हे, तर धार्मिक कार्ये करत असल्याचे उल्लेखही ॠग्वेदात आहेत.
वैदिक काळात वर्णव्यवस्था (आज आहे तशी) नव्हती. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र आणि निषाद या पाच जनजाती म्हणजे समाजपुरुषाची अंगे असून दैनंदिन व्यवहारात या पाचही जनजाती एकमेकांवर अवलंबून असत आणि कोणत्याही जनजातीतील व्यक्तीने कोणताही विषय अभ्यासून त्यात प्राविण्य किंवा सर्वोच्च सन्मान म्हणजेच ‘ब्रह्मपद’ मिळवावे, अशी रचना होती. याचे उत्तम उदाहरण म्हणजे कोळी जनजातीतील वाल्या, वाल्मिकी,ॠषी होऊ शकला. वेदवती किंवा सत्यवती या निषाद समाजातील स्त्रीचा मुलगा ‘वेदव्यास’ म्हणून प्रख्यात झाला, क्षत्रिय विश्वामित्राचा ‘विश्वामित्र ॠषी’ आणि निषाद ब्रह्मणस्पती देवांचा ‘गुरू बृहस्पती’ झालाच की!वेदकाळ हा अत्यंत प्राचीन आणि कित्येक हजार वर्षांपूर्वीचा असला तरी (इ.स.पूर्व ५००० हून अधिक) त्यावेळचा भारतीय समाज-संस्कृती अत्यंत प्रगत होती आणि या सुप्रगत समाजाचे प्रतिबिंब वेदांमध्ये पडले आहे. वेदांतील २० टक्के ते २५ टक्के धार्मिक भाग सोडला, तर उर्वरित भागात किती विषय आले आहेत ते पाहा. समाजविज्ञान, भौतिकशास्त्र, खगोलशास्त्र, भूगर्भशास्त्र, भूगोलशास्त्र, न्यायशास्त्र, विवाह आणि कुटुंबव्यवस्था, शेतीविषयक अत्यंत प्रगत माहिती, कृत्रिम पर्जन्यशास्त्र, प्रवास-वाहनव्यवस्था, विमान आणि जहाजबांधणी तसेच आर्य चाणक्याच्या अर्थविषयक ग्रंथातील राजनीतीचे मूळ देखील वेदात आहे. अशा कित्येक विषयांचा सखोल ऊहापोह केला आहे. काही सूक्ते जरी विविध देवतांना उद्देशून असले तरी प्रत्यक्षात त्या देवता म्हणजे सौरऊर्जेचीच विविध रूपे आहेत. इंद्राच्या चोरलेल्या गायींचा शोध घेण्यासाठी कुत्र्यांचा उपयोग केल्याचा उल्लेख आहे. आपण जेवण्यापूर्वी ‘ओम प्राणाय स्वाहा, अपानाय स्वाहा, व्यानाय स्वाहा, उदानाय स्वाहा, समानाय स्वाहा, ब्रह्मणे स्वाहा...’ असे म्हणत ताटाभोवती पाणी फिरवतो. या मंत्रात प्राणवायू, कार्बनडायऑक्साईड वायू, नायट्रोजन आणि हायड्रोजन तसेच वाफ या सर्वांचा उल्लेख आहे. या वायूंचा आपल्या शरीराला उपयोग होतो. या सर्वावरून वेदांतील विज्ञानाची थोडी तरी कल्पना येऊ शकेल. काळाच्या ओघात आणि परकीयांनी केलेल्या आक्रमणात आपल्या प्राचीन संस्कृतीवर हल्ले झाले, साहित्य, ग्रंथ जाळून नष्ट केले गेले; तरी संस्कृती लोप पावली नाही. या वेदांच्या माध्यमांतून, श्रुती(ऐकलेले),स्मृती(आठवणीतील) यांच्या साहाय्याने संस्कृतीचे वहन होत राहिले.
वेदातील ज्ञान-विज्ञान तसेच जातिभेद, वर्णभेद हे भारतीय संस्कृतीला मान्य नाहीत, हे सत्य समाजापुढे आणण्यासाठी, सामान्य लोकांपर्यंत पोहोचावे यासाठी डॉ. भीमराव कुलकर्णी यांनी हा सर्व अट्टाहास केला. किती साध्या भाषेत त्यांनी लिहिले आहे, याचे उदाहरण म्हणजे गायत्री मंत्रात सूर्यकिरणातील अवरक्त (इन्फ्रारेड), क्ष-किरण, अल्ट्रा व्हायोलेट किरण यासंबंधीचा उल्लेख कसा आहे, येथपासून ते सूर्यावर दर ११ वर्षांनी पडणार्या काळ्या डागांची नावे ॠग्वेदात आहेत, हे सांगताना त्यांनी आपल्या हस्ताक्षरात लिहिलेल्या मंत्राच्या जोड्या दाखविल्या. (रुद्राचा संबंध), ॠग्वेदाचा काळ हा इसवी सनापूर्वी ३७ हजार वर्षे इतका आहे अशी शासकीय नोंद आहे, तसेच वेदांना ‘अपौरुषेय’ का म्हणतात, हेही त्यांनी विस्ताराने सांगितले. ॠषींना अवकाशातून आलेल्या ध्वनींतून वेदांचे ज्ञान झाले. या वेदांच्या अनुवादासह डॉ. कुलकर्णी यांनी अन्य पुस्तकेही लिहिली आहेत. त्यातील एक महत्त्वाचे म्हणजे ‘नित्य पाठाची वैदिक सूत्रे’ हे विवेकानंद केंद्राच्या मराठी प्रकाशन विभागातर्फे प्रकाशित झाले आहे.जवळपास आठ वर्षे ते ॠग्वेदातील ॠचांचा अनुवाद करत होते आणि पुढील आठ वर्षे ते अन्य वेदांवर काम करत होते. शुक्ल यजुर्वेदात राज्य कारभारासंबंधी इथ्यंभूत माहिती आहे. राज्याचे प्रमुख धर्मगुरू, राजगुरू आणि इतर मंडळींची नेमणूक करत असत आणि त्यांना राज्य कारभारासंबंधी माहिती देत असत. एवढ्यावरच यजुर्वेद संपत नाही, तर स्त्रीरोग, गर्भदान, गर्भोत्पती, बालसंगोपन आणि त्यासंबंधीच्या शस्त्रक्रिया याविषयी सखोल माहिती त्यात आहे. त्या काळात स्त्रियादेखील वैद्यकीय शास्त्राचा अभ्यास करून ‘भिषग्वर्या’ ही पदवी प्राप्त करू शकत होत्या. या वैद्यकीय ज्ञानात पारंगत असलेल्या स्त्रिया स्वतंत्ररीत्या व्याधीचिकित्सा, बाळंतपण आणि त्यानंतरचे उपाय अशा प्रकारे सामान्यांना सेवा देत असत. दीर्घायुषी होण्यासाठीचे आरोग्य कसे प्राप्त करावे, याचाही उल्लेख यजुर्वेदात आहे.
डॉ. भीमराव कुलकर्णी यांच्या या विज्ञानाधिष्ठितकार्याची यथोचित दखल अनेक पातळीवर घेतली गेली. ‘ब्राह्मण सभा’ आणि ‘एकनाथ महाराज संशोधन मंदिर’ यांसारख्या काही मान्यवर संस्थांनी त्यांचा सन्मान केलाच आहे. पण, महाराष्ट्र शासनानेदेखील त्यांच्या या कार्याची नोंद घेऊन, ‘संस्कृत दिनी’ म्हणजेच नारळी पौर्णिमेच्या दिवशी ‘महाकवी कालिदास संस्कृत साधना पुरस्कार’ देऊन त्यांना गौरविले आहे. याचबरोबर करवीर पीठाचे शंकराचार्य, फुलगावचे स्वामी स्वरूपानंद यांनी कौतुक, तर पंडित गुलाम दस्तगीर अ. बिराजदार यांनी त्यांना ‘वेदमूर्ती’ हा बहुमानाचा पुरस्कार दिला आहे.असे डॉ. भीमराव कुलकर्णी वयाची शंभरी आली तरी कालपर्यंत कार्यरत होते. आपल्या आवडत्या कामात मग्न होते. ७० उपनिषदांचे अनुवादाचे काम त्यांनी पूर्ण केले होते. अजूनही काही प्रकल्प त्यांच्या मनात होते. पण, शेवटी ‘ईश्वरेच्छा बलियसी’ हेच खरे! वेदचरणी विलीन झालेल्या डॉ. भीमराव कुलकर्णी यांनळ विनम्र वंदन!