रझा अकॅडमी आणि पीएफआयवर बंदी घाला
नवी दिल्ली, विशेष प्रतिनिधी : महाराष्ट्रात गेल्या काही दिवसात बहुसंख्यांक हिंदूंना नियोजनबद्ध पद्धतीने लक्ष्य करून त्यांच्यावर हल्ले करण्यात आले आहेत. यामध्ये राज्य सरकारची भूमिका अतिशय संशयास्पद आहे. त्यामुळे या हिंसाचारास कारणीभूत असलेल्या रझा अकॅडमी आणि पीएफआय या देशविरोधी संस्थांवर बंदी घालण्यात यावी, अशी मागणी उत्तर – पूर्व मुंबईचे भाजप खासदार मनोज कोटक यांनी बुधवारी लोकसभेत केली.
महाराष्ट्रात रझा अकॅडमी आणि पीएफआय या मुस्लीम कट्टरतावादी संघटनांनी घडविलेल्या हिंसाचाराचा मुद्दा भाजप खासदार मनोज कोटक यांनी संसदेत उपस्थित केला. महाराष्ट्रातील सामाजिक सौहार्द बिघडविण्याच्या घटना गेल्या काही दिवसा घडल्या आहेत. राज्यातील अमरावती, नांदेड आणि मालेगाव या शहरांमध्ये नियोजनबद्ध रितीने बहुसंख्यांक हिंदूंची घरे आणि व्यापारी आस्थापनांवर हल्ले करण्यात आले आहे. त्रिपुरामध्ये जी घटना घडलीच नव्हती, त्याविषयी समाजमाध्यमांवर अफवा पसरविण्यात आल्या. त्यानंतर अल्पसंख्यांकांना रस्त्यावर उतरवून हिंदूंच्या घरांना लक्ष्य करण्यात आल्याचे कोटक म्हणाले.
हिंसाचारामध्ये रझा अकादमी आणि पीएफआय या संघटनांची भूमिका अतिशय संशयास्पद असल्याचे कोटक यानी सांगितले. ते पुढे म्हणाले, या देशविरोधी संघटनांची चौककशी होणे आणि त्यांच्या बंदी घालणे अत्यंत गरजेचे आहे. त्याचप्रमाणे हिंदूविरोधी हिंसाचारामध्ये महाराष्ट्र सरकार आणि महाराष्ट्र पोलिसांची भूमिका अतिशय संशयास्पद असल्याचे स्पष्ट झाले आहे. हिंसाचाराच्या दुसऱ्या दिवशी पोलिसांनी केवळ बहुसंख्यांक हिंदूंवरच कारवाई केली. त्यामुळे महाराष्ट्र सरकार हिंदूंना लक्ष्य करण्याच्या धोरणानुसार काम करीत असल्याचाही आरोप कोटक यांनी यावेळी केला आहे.