अनिल परबांशी दुश्मनी महागात! : रामदास कदमांना तिकीट नाहीच!

    21-Nov-2021
Total Views | 441

Ramdas Kadam _1 &nbs



मुंबई
: आगामी विधान परिषदेच्या निवडणुकांसाठी शिवसेनेतर्फे शनिवारी आपल्या उमेदवारांची घोषणा करण्यात आली. मात्र, ज्येष्ठ नेत्यांना डावलण्यात आल्याने शिवसेनेमध्ये नाराजीनाट्य रंगल्याची चर्चा आहे. मुंबई महानगरपालिका स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून माजी आमदार सुनील शिंदे तर अकोला-बुलढाणा-वाशीम मतदारसंघातून आमदार गोपिकिशन बाजोरिया यांना शिवसेनेकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तर शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदम यांना यंदा संधी देण्यात आलेली नाही.


दरम्यान, मुंबईतून उमेदवारी जाहीर झालेले सुनील शिंदे हे वरळी मतदारसंघातील शिवसेनेचे माजी आमदार आहेत. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी विधानसभा निवडणूक लढण्याचा निर्णय घेतल्यानंतर सुनील शिंदे यांनी त्यांच्यासाठी आपली जागा सोडली होती. मात्र, आता विधान परिषदेच्या दोन जागा रिक्त झाल्याने मुंबईतून शिंदे यांना संधी देण्यात आली आहे.



रामदास कदम आणि मंत्री अनिल परब यांच्यातील वादंग कथित कॉल रेकॉर्डींग प्रकरणामुळे पहिल्यांदाच चर्चेत आला. त्यानंतर हे ऑडिओ क्लिप खोटे आहेत, असा दावा कदमांनी केला. तरीही पक्षनेतृत्वाने त्यांच्यावर कारवाईचे आदेश दिले होते. रामदास कदम शिवसेनेच्या यंदाच्या दसरा मेळाव्यालाही उपस्थित राहिलेले नव्हते. मात्र, कदमांनी ठाण्यात बॅनरबाजी करत आपली शक्ती दाखविण्याचा प्रयत्न केला होता. दसरा मेळाव्यात त्यांच्या विरोधात घोषणाबाजीही झाली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तिथे उपस्थित होते तरीही त्यांनी हा प्रकार थांबविण्याचे आदेश दिले नाहीत.  

 
भाजपकडूनही उमेदवारांची यादी जाहीर
 
भाजपकडूनही उमेदवारांची यादी शुक्रवारी रात्री उशिरा जाहीर करण्यात आली. भाजपने जाहीर केलेल्या उमेदवारांच्या यादीत पाच जणांची नावे आहेत. यामध्ये कोल्हापूरमधील जागेसाठी अमल महाडिक, धुळे आणि नंदुरबारमधील जागेसाठी अमरीश पटेल, नागपूरमधील जागेसाठी चंद्रशेखर बावनकुळे, अकोला-बुलढाणा-वाशीम मतदारसंघासाठी वसंत खंडेलवाल आणि मुंबईतून राजहंस सिंह यांचे नाव जाहीर करण्यात आले आहे. भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीने ही नाव जाहीर केली. मुंबईतून एका जागेसाठी उमेदवारी जाहीर झाली असली तरी अजून एका जागेसाठी उमेदवाराचे नाव गुलदस्त्यातच आहे.






अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121