कणखर आणि कलासक्त दुर्गा!

नवदुर्गा - कणखर आणि कलासक्त दुर्गा!

    08-Oct-2021
Total Views | 114

Varsha Kolhatkar_1 &
 
 
प्रशासकीय सेवेत अमूल्य कार्यठसा उमटवणाऱ्या अधिकारी, प्रसिद्ध कथ्थक नृत्यांगना, वनवासी कल्याण आश्रम (कोकण प्रांत) उपाध्यक्षा वर्षा अनिल कोल्हटकर यांच्या कर्तृत्वाला वंदन करणारा लेखमालेतील दुसरा लेख...
 
ती येते, भेटते, बोलते आणि क्षणार्धात अनेकांवर आपली छाप सोडून जाते. तिची ओळख तरी काय सांगावी? एक कर्तव्यदक्ष सरकारी अधिकारी, निपुण कथ्थक नृत्यांगना, हुशार कायदेतज्ज्ञ, समाजासाठी समर्पण वृत्तीने काम करणारी कार्यकर्ती. हे आणि असे अनेक पैलू आहेत वर्षा कोल्हटकर या आजच्या आपल्या आधुनिक नवदुर्गेचे.
 
 
२०२० मध्ये ३५ वर्षांहून अधिक काळ सरकारी क्षेत्रात सेवा देऊन वर्षा कोल्हटकर ‘असिस्टंट कमिशनर सेंट्रल एक्साईज’ या पदावरुन निवृत्त झाल्या आणि लगेचच नोकरीमुळे राहून गेलेल्या ‘कथ्थक’ विषयाच्या ‘पीएच.डी’च्या अभ्यासाला लागल्या.
लहानपणापासूनच अतिशय धाडसी असलेल्या वर्षा कोल्हटकर महाविद्यालयात असताना अभाविपच्या कामात सक्रिय होत्या. अभ्यासाबरोबरच क्रिकेट, ट्रेकिंग या विषयाचीदेखील त्यांना आवड होती. बी.कॉम, एलएलबीपर्यंत शिक्षण पूर्ण होत असतानाच सरकारी नोकरीची संधी चालून आली. नोकरी सुरू झाली आणि मग लगेच अनिल कोल्हटकर यांच्याशी त्यांचा विवाह झाला. वर्षा या कोल्हटकर कुटुंबीयांच्या गळ्यातला ताईत झाल्या. मोठे एकत्र कुटुंब, आल्या-गेल्यांचा राबता घरी कायम होताच. पण, नोकरीमधील जबाबदारीदेखील वाढत होती. निखील आणि वृषाली या दोन्ही मुलांना घडवले. कन्या वृषालीबरोबर वर्षा कोल्हटकर यांनी वयाच्या ३७ व्या वर्षी कथ्थकचे धडे गिरवायला सुरुवात केली आणि माय-लेकी दोघींचा नृत्यविषयासाठी पदवीचा एकत्र प्रवास सुरु झाला. परंतु, याबरोबरच सरकारी नोकरी, पदोनत्ती आणि विविध ठिकाणी होणाऱ्या बदल्या ही कसरतदेखील त्या सांभाळत होत्या. घरातले सणवार, पै-पाहुणा सगळं बघत होत्या. ‘वनवासी कल्याण आश्रम’ या संस्थेसाठी त्या करत असलेले कामही आजही सुरू आहे आणि आता त्यात पतीचीदेखील साथ लाभत आहे.
 
 
वयाच्या ५१व्या वर्षी ‘कथ्थक’ विषयात एमए केलेल्या वर्षाताई २०१२ पासून ‘श्रीमुद्रा कला संस्थे’ची ठाणे शाखा सांभाळत आहेत आणि आज ३५ हून अधिक विद्यार्थिनी त्याच्याकडे नृत्याचे धडे घेत आहेत. ‘वनवासी कल्याण आश्रम’च्या तलासरी भागात फिरता दवाखाना सुरू करणे, मोखाडा तालुक्यातील बेरीस्ते येथे आरोग्यकेंद्र सुरू करणे, वनवासी बांधवांच्या मुलांसाठी संस्कार केंद्रे, क्रीडा विषयक संधी निर्माण करणे, वारली केलेला नागरी जीवनाशी जोडणे यासारख्या अनेक विषयांसाठी वर्षाताई ‘वनवासी कल्याण आश्रम’ (कोकण प्रांत) उपाध्यक्ष म्हणून सतत काम करत असतात.
 
 
सरकारी कार्यालयात प्रामाणिक माणसे असली पाहिजेत, या भूमिकेतून नोकरीत असताना त्यांनी परीक्षा देत बढती तर मिळवलीच, पण ‘जीएसटी’सारख्या नव्याने समोर आलेल्या विषयासाठी स्वतः प्रशिक्षण घेऊन त्याच विषयासाठी ‘मास्टर ट्रेनर’ म्हणून भारतातील अनेक सरकारी, निमसरकारी आणि खासगी संस्थांना मार्गदर्शक म्हणून त्या काम करतात. कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून सरकारी सेवेत असताना त्यांनी निर्भीडपणे अमली पदार्थ तस्करी विरोधात अनेक कारवाया केल्या आहे. प्रशासकीय सेवेतील योगदानाबद्दल भारतीय अर्थ मंत्रालयाकडून त्यांना विशेष प्रशस्ती मिळाली आहे.
 
 
विविध शास्त्रीय नृत्यप्रकार सादर करणाऱ्या नामांकित १६ नृत्यगुरूंना आपापल्या शिष्यांसह ‘दशावतार-आपले समाजगुरू’ या विषयाच्या सादरीकरणासाठी एकत्र आणणाऱ्या वर्षाताई एकमेव समन्वयक होत्या. या कार्यक्रमासाठी प्रसिद्ध सिने अभिनेत्री पद्मश्री हेमामालिनी यांनी त्यांचा सत्कार केला होता. कलाक्षेत्रातील अमूल्य योगदानासाठी अनेक संस्थाकडून त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.
 
 
‘जे जे आपणासी ठावे, ते ते दुसऱ्यासी सांगावे’ या समर्थ रामदासांच्या वचनावर विश्वास असणाऱ्या वर्षाताई कला, समाजसेवा, कायदा, ‘जीएसटी’ यासारख्या अनेक विषयांवर विविध संस्थामधून सतत मार्गदर्शन करत असतात.
 
- शिवानी नेमावरकर
9594969654
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121