मुंबई : अनेकदा चित्रपटाचे चित्रीकरण सुरु असताना अपघात होत असतात. त्याला बॉलीवूड असो किंवा हॉलीवूड दोघेही अपवाद नाहीत. बॉलीवूडपेक्षा हॉलीवूडमध्ये चित्रीकरणासाठी वापरलेले जाणारे तंत्रज्ञान हे अत्याधुनिक पद्धतीचे आहे. असे असूनदेखील हॉलीवूडचा स्टार अभिनेता एलेक बाल्डविन याचा आगामी चित्रपट 'रस्ट'च्या चित्रिकरणादरम्यान एक अपघात घडला. यामध्ये सिनेमॅटोग्राफरला आपला जीव गमवावा लागला आहे. तर, चित्रपटाचा दिग्दर्शक जखमी झाला आहे. न्यू मेक्सिकोमधील सांता फे मधील बोनान्जा क्रीक रेंच चित्रपटाच्या सेटवर ही घटना घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, अभिनेता एलेक बाल्डविन हे आगामी चित्रपट 'रस्ट'चे चित्रीकरण करत होते. त्यादरम्यान त्याच्याकडून चित्रीकरणासाठी वापरल्या जाणाऱ्या बंदुकीतून चुकून गोळी झाडली गेली. यामध्ये ४२ वर्षीय सिनेमॅटोग्राफर हलिना हचिन्स जखमी झाली. तिला तातडीने उपचारसाठी हेलिकॉप्टरने न्यू मेक्सिको विद्यापीठाच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, रुग्णालयात तिला मृत घोषित करण्यात आले.
तसेच या अपघातात लेखक-दिग्दर्शक ४८ वर्षीय जोएल सुझा देखील जखमी झाले आहेत. त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्यची माहिती देण्यात येत आहे. पोलिसांनी या प्रकरणी तपास सुरू केला आहे. या घटनेबाबत बाल्डविन, सुझा आणि 'रस्ट'च्या कार्यकारी निर्मात्यांनी मौन बाळगले आहे. पोलिसांनी अद्याप गुन्हा दाखल केला नाही.