डोंबिवली : कोरोना निर्बंधामुळे अनेकांचा रोजगार संकटात सापडले असताना स्थानिकांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्याचे काम दीपेश पाटील आणि राम म्हात्रे या दोन तरूणांनी केले आहे. यामुळे आता स्थानिकांना रोजगार आणि खव्वयांना सी फूडची पर्वणी मिळणार आहे.
लोढा पलावा येथील लक्ष्मी मार्केटच्या परिसरात स्व. शांताराम काळू पाटील मासळी बाजार सुरू करण्यात आला आहे. चांगले मासे मिळविण्यासाठी परिसरातील नागरिकांना दूरवर जावे लागत होते. पण या मार्केटमुळे आता त्यांची पायपीट थांबणार आहे. लोढा पलावा आणि आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांना आता मासळी बाजार त्यांच्या दारातच उपलब्ध होणार आहे. या बाजारात 55 गाळे असून त्यातून माश्यांची विक्री केली जाणार आहे. या मार्केटच्या उद्घाटनप्रसंगी लालबावटा रिक्षा युनियनचे काळू कोमास्कर, तिसगावचे माजी नगरसेवक महेश गायकवाड, एकनाथ पाटील, अभिनेत्री पायल पाटील, प्रभाकर जाधव, भगवान पाटील, निळजेचे सुभाष पाटील, मुकेश भोईर, उत्तम पवार, दिपेश पाटील, राम म्हात्रे, संजय पाटील गाळेधारक आणि नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
एकनाथ पाटील म्हणाले, या परिसरात मार्केटची गरज होती. या परिसरातील लोकांना डोंबिवली स्थानक किंवा मुंब्राकडे जावे लागत होते. पण आता ती मच्छी तुमच्या दारात येऊन ठेपली आहे. या परिसरातील नागरिकांची आता मच्छी खरेदीसाठी होणारी पायपीट थांबणार आहे, असे त्यांनी सांगितले.
दिपेश पाटील म्हणाले, माङया कार्यालयातून ही जागा दिसत होती. या जागेचा वापर नागरिकांना रोजगार देण्यासाठी करायचं असे एक स्वप्न होते. पण काय करायचे हे निश्चित नव्हते. एकेदिवशी जागा मालक स्वत:हूनच आला. कामाचे नियोजन केले. या परिसरात नागरिकांना मासे विकत घेण्यासाठी डोंबिवली, पनवेल,कल्याण किंवा मुंब्रा गाठावे लागते होते. आता त्यांच्या दारात मासे मार्केट आपण आणले आहे. त्यामुळे अनेकांना रोजगार उपलब्ध झाला आहे असे ही त्यांनी सांगितले.
राम म्हात्रे म्हणाले, या मासे मार्केटची संकल्पना दीपेश यांनी बोलून दाखविली. स्थानिक नागरिकांना रोजगार मिळणार म्हणून हा प्रकल्प सुरू केला आहे. तसेच नागरिकांची ही सोय होणार आहे. यामुळे नागरिकांना चांगल्या दर्जाची मच्छी एकाच छताखाली मिळणार आहे.
मासे विक्रेते सागर गुडदे म्हणाले, मी पहिल्यांदा कल्याण मार्केटमध्ये मासे विक्रीचा व्यवसाय करीत होतो. आता याठिकाणी नवीन मार्केट खुले झाल्याने येथे येऊन आता विक्री करीत आहे. ग्राहक मोठय़ा प्रमाणात येतील या आशेने आम्ही या मार्केटमध्ये व्यवसाय करायला आलो आहोत.
------------------------------
------------------------