मुंबई : युरोपीयन राष्ट्र हंगेरी येथे गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून बुडापेस्टच्या भारतीय दूतावासातील अमृता शेर-गिल सांस्कृतिक केंद्रात गुरु-शिष्य परंपरा दर्शवणारा एक सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात सांस्कृतिक केंद्रातील विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या सुरेल आणि भावपूर्ण कला सादरीकरणांनी सर्वांचे मन जिंकले. या सादरीकरणांमधून त्यांच्या कला-साधनेप्रती असलेली निष्ठा आणि गुरूविषयी असलेली भक्ती स्पष्टपणे दिसून आली.
या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून प्रवीण कुमार, प्रभारी राजदूत (Chargé d’Affaires) उपस्थित होते. त्यांनी गुरु पौर्णिमा साजरी करण्यामागील महत्त्वावर संबोधित केले. कार्यक्रमाची सुरुवात अमृता शेर-गिल सांस्कृतिक केंद्राचे संचालक डॉ. मुकेश कुमार श्रीवास्तव यांच्या स्वागत भाषणाने झाली. त्यांनी गुरु पौर्णिमेच्या आध्यात्मिक आणि ऐतिहासिक महत्त्वावर प्रकाश टाकला. हिंदुत्व, बौद्ध धर्म आणि जैन धर्म यामधील गुरु-शिष्य परंपरेचा उगम आणि विकास यावर त्यांनी माहिती दिली आणि ज्ञान, मूल्ये आणि सांस्कृतिक सातत्य जोपासण्यात गुरूंची महत्त्वाची भूमिका अधोरेखित केली.
या कार्यक्रमामुळे सांस्कृतिक केंद्राचे भारताच्या समृद्ध वारशाचे, मूल्यांचे आणि कलात्मक परंपरांचे जागतिक स्तरावर संवर्धन करण्याच्या कटिबद्धतेचे पुन्हा एकदा दर्शन घडले.
'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक