माहिती-तंत्रज्ञानापेक्षा अनेक पटींनी प्रभावी आणि जगाच्या अर्थव्यवस्थेला कलाटणी देणारे कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान म्हणजे काय, कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा वापर कुठे आणि कसा केला जातो, यासंदर्भातील चार भागांची माहितीपूर्ण लेखमालिका आजपासून प्रकाशित करत आहोत. कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान याच लेखमालेतील आजचा भाग पहिला.
गेली २५ वर्षे जगाने माहिती-तंत्रज्ञानातील कॉम्प्युटर, लॅपटॉप, मोबाईल, इंटरनेट, ई-मेल, सोशल मीडिया, गुगल या साधनांचा अनुभव घेतला आहे. यातील प्रत्येक नवा टप्पा हा आश्चर्यच घेऊन यायचा. सध्या व्हॉट्सअॅप, व्हिडिओ कॉन्फरन्सिंगने तर जग अजूनच बदलून टाकले आहे. मोबाईलमधून माहिती-तंत्रज्ञान वापरणे किती पराकोटीला गेले आहे, याचा आपण अनुभव करत आहोत. हे सारे सुरू असतानाच म्हणजे याच मालिकेतील ‘जी-५’ (५-जी) तंत्रज्ञान येण्याची दवंडी पिटली जात असताना या क्षेत्रातील अजून काही मोठे सिग्नल येत आहेत, ते म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारलेली यंत्रे येण्याचे. माणसाच्या बुद्धिमतेची जेवढी नक्कल करता येते, तेवढी नक्कल करणारी ही यंत्रे म्हणजे संगणक, मोबाईल, रोबोट, ड्रोन, मोबाईल टॉवर्स, उपग्रह. मानवी बुद्धिमत्तेची अधिकाधिक क्षमता त्यात सुसूत्रपणे भरल्याने आपल्यापर्यंत पोहोचणारी ही यंत्रणा सध्याच्या विद्यमान तंत्राच्या कितीतरी पटींनी अधिक आपले जीवन व्यापून राहणार आहे. आपोआप चालणारी वाहने, विमाने, ट्रॅक्टर, आपापले निर्णय घेऊन मोठमोठी उत्पादने करणारे कारखाने एवढेच नव्हे तर स्वतंत्र उत्पादन करण्याबरोबरच जेथे माणसे राबतात, अशी यंत्रणा ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’चे प्राथमिक टप्पे असतील. आजपर्यंत हे सारे वर्णन आपण ‘फॅन्टसी’ चित्रपटात बघत होतो. माणसाच्या अधिकाधिक बुद्धीचे ‘प्रोग्रॅमिंग’ करून त्या क्षमता यंत्रांना जोडण्याचा आरंभ झाला आहे. जगातील पाच टक्के लोकच साऱ्या जगाची यंत्रणा चालवतील, असे त्यातील अभ्यासक आणि विचारवंत बोलून दाखवत आहेत.
‘स्वदेशी गुगल’, ‘स्वदेशी ई-मेल’ आणि ‘स्वदेशी सोशल मीडिया’ आवश्यक
मोबाईल वापरात आल्यावर त्याची नेमकी आवश्यकता किती तेवढाच वापरण्यापासून ते अनावश्यक वापर आणि नको तेवढा अतिवापर असाही त्याचा परिणाम आपण पाहिला आहे. कोणत्याही एकांतात मोबाईल वापरून आपण जगात सगळीकडेच असल्याचा अनुभव घेतो. याचे कारण असे की, युट्यूब, ई-मेल, कॉन्फरन्सिंग, फेसबुक, सोशल मीडिया, यांनी आपल्या प्रत्येक सेकंदावर नियंत्रण मिळवले होते. यातील प्रत्येक मिनिटाला आपल्याला माहीत असूनही प्रत्येक मिनिटाला आपण सोईस्करपणे विसरत होतो की, हे सारे चालवणाऱ्या मोठमोठ्या कंपन्या आहेत. येणाऱ्या ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’बाबत असे जाणकारांकडून सांगण्यात येत आहे की, सध्या ज्याला आपण बहुराष्ट्रीय कंपन्या म्हणतो किंवा महासत्ता म्हणतो, तशा बहुराष्ट्रीय कंपन्या आणि महासत्ता या कृत्रिम तंत्रज्ञानाच्या साधनसामग्रीतून जगातील सामान्य माणसाच्या जीवनाचा ताबा घेणार आहेत. माणसाच्या कमालीच्या क्षमतेची अतिशय छोटी किंवा प्रत्यक्षात न दिसणारी यंत्रणा साऱ्या जगाचा ताबा घेण्यास सज्ज झाली आहेत. गेल्या २५ वर्षांचा आपला अनुभव असा की, जगातील २०० देशांचे टपाल पोहोचविणारे टपाल खाते, टेलिफोन खाते मूठभर कंपन्यांनी ताब्यात घेतले होते. मोबाईल तयार करणाऱ्या चीनसारख्या देशांनी मोबाईल ‘रेकॉर्ड’ करण्याची तयारी पहिल्यापासून ठेवली होती. आपला असा समज होता आणि आहे की, आपले ई-मेल आणि फोन ऐकून त्यांना काय करायचे आहे. पण साऱ्या जगाला फक्त ‘कन्झ्युमर’ म्हणजे ग्राहक पातळीवर कसे रोखायचे, हे आपल्या ई-मेल आणि मोबाईलवरूनच ठरते. एका बाजूला या साऱ्या सोयींचे स्वर्गसुख आपण घेत असतानाच महासत्ता आणि महाकंपन्या त्यातून माहिती हस्तगत करून सामान्य माणसाला त्याच्या गरजेनुसार आणि सोयीनुसार लागणारे ‘आर्टिफिशियल’ची यंत्रे तयार करण्याची डिझाईन तयार करण्यात गुंतले होते आणि आहेत.
भारतासाठीची पाच युद्धक्षेत्रे
या साऱ्याचा भारतावर कसा परिणाम होईल, यावर प्रकाश पाडणारे राजीव मल्होत्रा यांचे पुस्तक आले आहे. पुढील किमान २०-२५ वर्षे तरी महासत्तांचे राजकारण, अर्थकारण, विज्ञान, तंत्रज्ञान, जगाचे भूगोलही याच्या आधारे आकार घेणार असल्याने त्यांनी त्या पुस्तकात ‘फाईव्ह बॅटल ग्राऊंडस्’ म्हणजे आपल्यासाठी पुढे वाढून ठेवलेली ‘पाच युद्धक्षेत्रे’ मांडली आहेत. त्या विषयावर त्यांचे अनेक युट्यूब व्हिडिओ उपलब्ध आहेत. त्यात डॉ. विजय भटकर यांचा समावेश आहे. त्या पुस्तकाचे ऑनलाईन प्रकाशन दि. ८ जानेवारी रोजी झाले. त्यात स्वत: डॉ. राजीव मल्होत्रा यांनी साहजिकपणे भाग घेतलाच, पण देशातील या क्षेत्रातील कार्यरत विचारवंतांचाही त्यात समावेश होता. त्यात ‘रिलायन्स’ कंपनीचे डाटा चीफ आणि ‘जिओ’चे वरिष्ठ अधिकारी डॉ. शैलेंद्र कुमार, ‘इंडिया अहेड’चे संपादक आणि आघाडीचे गुंतवणूक सल्लागार भूपेंद्र चौभे, भारतीय सेनेचे माजी उपप्रमुख लेफ्टनंट जनरल पी. जे. एस. पन्नू आणि न्यूयॉर्कयेथील ‘वेदांत सोसायटी’चे स्वामी सर्वप्रियानंद यांचा सहभाग होता. याखेरीज या विषयावर अनेक नामवंतांनी या विषयाला साऱ्या देशानेच अग्रक्रम देणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले आहे. या सर्वांच्या चर्चेतील समान मुद्दा असा की, साऱ्या जगातील अर्थव्यवस्था, महासत्ता, अनेक देशांचे भूगोल तर बदलेलच, पण बहुतांशी व्यक्तींच्या जीवनात काय साध्य करायचे, याचेही क्रम बदलतील. त्यांनी त्या पुस्तकात प्रामुख्याने भारताचा विचार केला आहे. ते म्हणतात, गेल्या २५ वर्षांत भारतीय तरुणांनी माहिती-तंत्रज्ञानात मोठी आघाडी मिळवली होती. त्यातून भारताचा जगातील परिचयच बदलला. भारतालाही जगाची निराळी ओळख झाली. भारतीय तरुण हे जगातील एक स्वतंत्र सामर्थ्य झाले होते, पण ती स्थिती आज नाही. गेल्या पाच वर्षांत अन्य देशांनी बाजी मारली आहे. आता हे नवे आव्हान पुढे येत आहे. त्यासाठी भारतीय तरुणांनी पुन्हा एकदा तयारी करायला हवी. ती कोणती आव्हाने आहेत, त्याची कोणतीही कल्पना आज त्यांनाही नाही आणि जगालाही नाही. भारतातील महाविद्यालयात ही मुले जेव्हा कॉम्प्युटरचा अभ्यासक्रम शिकत होती, तेव्हा त्यांच्या जे पदरात पडले त्यापेक्षा फार निराळी आव्हाने त्यांना त्यांच्या क्षेत्रात अनुभवावी लागली. आजही तीच स्थिती आहे. आता हे आव्हान फक्त आयटीचा अभ्यास करणाऱ्या तरुणापुरते मर्यादित राहिलेले नाही.
प्रगतीचे प्रत्येक क्षेत्र हे युद्धक्षेत्रही राहील
कारखानदारीपासून शिक्षणक्षेत्रापर्यंत, शेतकऱ्यांपासून ते राजकारण्यापर्यंत आणि संरक्षण विभागापासून ते मुत्सद्देगिरीपर्यंत प्रत्येक क्षेत्रात याचा मोठा परिणाम होणार आहे. याबाबत भारताची एक जमेची बाजू आहे की, जर नेटाने प्रयत्न केला तर कदाचित भारतीय तरुणच यात अंतर कापतील. पण त्यासाठी काही अब्ज कोटी डॉलरची गुंतवणूक आवश्यक असल्याने सध्या तरी त्यावर अमेरिका आणि चीन यांचे वर्चस्व राहील. भारतीय तरुण व एकूणच प्रत्येक कृतिशील व्यक्ती प्रथम प्रशिक्षण, नंतर आपापल्या क्षेत्राचा त्या दृष्टिकोनातून अभ्यास अशा पद्धतीने पुढे गेल्यास भारत जगाच्या मागे राहणार नाही, असे म्हणता येईल. गेल्या २५ वर्षांत जगातील महासत्ता आणि महाकंपन्यांनी माहिती-तंत्रज्ञानाच्या आधारे जे कमावून ठेवले आहे, तेवढेच किंवा त्यापेक्षा चार-पाच पावले पुढे जाणे अशी मर्यादित अपेक्षा ठेवून त्या कंपन्या उतरलेल्या नाहीत. ३००-३५० वर्षांपूर्वी भारतात ‘ईस्ट इंडिया’ कंपनी आली आणि त्यांनी ब्रिटिशांचे साम्राज्य ‘जगावरील सूर्य मावळणार नाही’ अशा पद्धतीने वाढविले. आताही त्याच इतिहासाची पुनरावृत्ती होते आहे. आपल्याला फक्त ब्रिटिशांची ‘ईस्ट इंडिया’ कंपनी माहीत आहे, पण युरोपातील बहुतेक देशांची भारतासाठी स्वतंत्र ‘ईस्ट इंडिया’ कंपनी होती. सध्या फक्त दोन मोठ्या सत्ता या रिंगणात आहेत. त्या महासत्ता म्हणजे अमेरिका आणि चीन. संगणक युग आल्यावर जगात गरीब आणि श्रीमंत देशांची एक निराळीच यादी तयार झाली. इ.स. १९९०-९२च्या काळात येथे लादलेली नवी अर्थव्यवस्था मोकाट सुटली असती, तर आपणही गरीब देशांच्या यादीत गेलो असतो. पण त्याच वेळी येथे माहिती-तंत्रज्ञानाची म्हणजे आयटी क्षेत्रातील तरुण पिढी तयार असल्याने त्यांनी परिस्थितीत अद्ययावतता आणली. चीन सध्या पाकिस्तान, आग्नेय आशिया आणि आफ्रिका यावर लक्ष ठेवून आहे. दक्षिण अमेरिकेतही थोडे फार हातपाय पसरवून ठेवले आहेत. अमेरिकेला युरोपच्या जगावरील वर्चस्वाचा अधिकार कळत नकळत मिळाल्याने त्यांनीही तयारी करून ठेवलेली आहे. पण भारतीय तरुणांची जगातील कामागिरी निराळी आणि देशातील जनतेचा प्रतिसाद हा विषय निराळा.
नव्याने जगभर पसरणाऱ्या ‘ईस्ट इंडिया’ कंपन्या
गेल्या एक हजार वर्षांतील येथील पारतंत्र्याचा विचार केला, तर या समाजात दुही निर्माण करण्यासाठी ‘ईस्ट इंडिया’ कंपनीच्या प्रयत्नापेक्षा स्थानिकांचे एकमेकांत भांडण्याचे प्रकारच अधिक प्रभावी ठरले होते. दोन स्थानिक राजे किंवा सत्ताधाऱ्यांतील वादामुळेच गेले एक हजार वर्षे येथे पारतंत्र्य होते. भारतात गेल्या पाच-सहा वर्षांत सारा देश एकजिनसी असण्याचे एक पर्व सुरू झाले आहे. पण भारतातील दहशतवादी शक्ती संघटितपणे कामाला लागल्यामुळे काही भाग पोखरलेला आहे, हे विसरून चालणार नाही. त्यामुळे एका बाजूने अतिशय आशादायी पर्व आहे, तर दुसऱ्या बाजूला आपल्यापर्यंत जेवढी माहिती पोहोचते, त्याच्या आधारे आपण केव्हा शत्रूचेच हस्तक बनून जातो, हे आपल्याही लक्षात येणार नाही. याचा परिणाम फक्त आयटी क्षेत्रातील नोकऱ्या असलेल्या लोकांपुरता मर्यादित नाही. प्रत्येक शेतकरी, सेनेतील प्रत्येक घटक, शिक्षणातील प्रत्येक टप्पा, उद्योगविश्व, प्रत्येक व्यक्तीचे भवितव्य याच्याशी निगडित असलेले देशाचे भवितव्य आणि या मानसिकतेतून निर्माण होणाऱ्या मानसिक समस्या आणि त्यामुळे सांस्कृतिक भवितव्य असे विषय ऐरणीवर येणार आहेत.
चीनमधील गुप्तता हेच त्यांचे सामर्थ्य
आफ्रिकेतील देशातील पाच एकराचा तुकडा असो किंवा पाच हजार एकराचे व्यापक क्षेत्र असो. तेथे शेती करणारे ठिबक सिंचनाचे क्षेत्र किंवा ग्रीन हाऊसचे क्षेत्र तेथे प्रत्येक रोपाला त्याच्या गरजेनुसार पाणी मिळेल, खते मिळतील, हवामानाची स्थिती बघून ते मशीनच पुढील बदल करेल. यातील काही विषय पावसाशी, हवामानाशी, कीड, रोग, दुष्काळ, अतिवृष्टी, गारांचा पाऊस, वादळे यांच्याशी संबंधित असतील, तर त्यातील शक्य ते विषय ती यंत्रणाच सोडवेल. मोठ्या संकटाची कल्पना देईल. चोरी, दरोडे हे विषयही हाताळेल. छोट्या देशांना त्याचा उपयोग जाणवू लागला तर तेथील जनमत बदलायला फार वेळ लागणार नाही. शेती हे एक उदाहरण झाले. पण अन्य देशातील जनमानसावर पगडा तयार करणे हे तर एखाद्या युद्धातील प्रभावी शस्त्रासारखे हत्यार असेल. जगामध्ये वापरली जाणारी ‘गुगल’सारखी माहितीच अतिशय विश्वासार्ह पद्धतीने सोडली तर त्या त्या देशात महासत्तांकडून माहितीचे ‘स्लो पॉयझनिंग’ सुरू होईल. ‘गुगल’ने गेली दहा वर्षे त्याची तयारी केली आहे. साऱ्या सोशल मीडिया यंत्रणांनी ती तयारी केली आहे. पाश्चिमात्य महासत्तांचा हा डाव लक्षात घेऊन चीनने ‘गुगल’, ‘ई-मेल’, सोशल मीडिया, मोबाईल फोन यांचे नियंत्रण करणारे स्वत:चे प्लॅटफार्म तयार केले आहेत. जगभर परिचित असणाऱ्या अशा या यंत्रणांना चीनच्या भिंतीकडेही फिरकू दिले जात नाही. एका बाजूला एवढी समांतर यंत्रणा तयार करून चीनमध्येच तयार झालेले जगातील ८० ते ९० टक्के मोबाईल आज सारे जग वापरत आहे. अमेरिकेसारखी महासत्ताही आज ७० टक्के मोबाईल हे चीनचे वापरत आहे. एका बाजूने चीन जगातील ५० देशांना परावलंबी अथवा मांडलिक बनवायच्या तयारीत आहे आणि दुसऱ्या बाजूला कृत्रिम बुद्धिमत्तेच्या जोरावर ते ते देश चालवणारी स्वतंत्र यंत्रणा तयार ठेवत आहे.
- मोरेश्वर जोशी