कला, भाषा आणि संस्कारांचा आग्रहकर्ता

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    19-Jan-2021   
Total Views |

 Jayprakash Jategavkar_1&
 
 
 
नाशिक येथील जयप्रकाश जातेगावकर नाट्य, साहित्य या माध्यमातून करत असलेले कार्य व त्यांचे या क्षेत्रातील योगदान याचा परिचय करुन देणारा हा लेख...
 
 
 
जयप्रकाश जातेगावकर हे नाव नाशिककरांना नक्कीच सुपरिचित असे. नाशिकमध्ये दाखल होणारी बहुतांश नाटकेही जातेगावकर यांच्याच माध्यमातून नाशिककर रसिकांना उपलब्ध होत असतात. पण, एवढीच त्यांची ओळख नसून, त्यांनी ‘नामको चॅरिटेबल ट्रस्ट’च्या माध्यमातून उत्तर महाराष्ट्रात सन २००० पासून कर्करोगग्रस्तांना उपचार उपलब्ध करून देण्याकामी केलेले कार्य हे उल्लेखनीय असेच आहे. तसेच त्यांनी ‘नॅशनल असोसिएशन ऑफ हॅण्डिक्राफ्ट’चे अध्यक्ष म्हणूनही आपली भूमिका बजावली आहे. याशिवाय ते ‘नॅशनल असोसिएशन ऑफ ब्लाइंड’चे खजिनदारही होते. उच्च न्यायालयाच्या वतीने धर्मदाय रुग्णालयांचे कार्य कसे चालते, याची तपासणी करण्याकामी नेमण्यात आलेल्या समितीचे कामकाजही त्यांनी पाहिले आहे. सध्या नाशिकमध्ये जातेगावकर हे नियोजित ९४व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनकामी नव्याने चर्चेत आहेत. नाशिकचे भूषण आणि ‘ज्ञानपीठ’ पुरस्कार विजेते कवी कुसुमाग्रज यांनी १९५० मध्ये स्थापन केलेल्या ‘लोकहितवादी मंडळा’चे जातेगावकर सध्या अध्यक्ष आहेत. याच मंडळाच्या माध्यमातून नाशिक येथे साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे. या मंडळात ‘चित्रकला’, ‘तीर्थरूप’, ‘चिरंजीव’, ‘संगीत’, ‘वनवासी भागात काम’, अशा अनेक समित्या कार्यरत असून, त्या आपापल्या विभागांतर्गत आपले कार्य करत आहेत. या सर्वांचे कार्य हे चोख आणि दर्जेदार असावे, यासाठी जातेगावकर प्रयत्नशील असतात.
 
 
मराठी भाषा हे भाषा साम्राज्याला लाभलेले एक विलक्षण देणे आहे. या भाषेचा विकास होणे आणि सर्वांनी मराठी साहित्य वाचावे आणि समजून घ्यावे, यासाठी जातेगावकर कायमच आग्रही भूमिका घेताना दिसतात. ‘लोकहितवादी मंडळा’ने आजवर राज्यनाट्य स्पर्धेतील पुरस्कार चुकविला नाही, हे विशेष. मराठी भाषेचा विकास आणि प्रचार व्हावा, तसेच या भाषेचे बाळकडू मिळावे, यासाठी दरवर्षी २७ फेब्रुवारी या दिवशी बालकवी संमेलन आयोजित केले जाते. या माध्यमातून बालकवींनी स्वरचित एक व कुसुमाग्रज यांची एक कविता वाचन करणे, असा कार्यक्रम आयोजित करण्यात येत असतो. या कार्यक्रमात नाशिक येथील उर्दू हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी मराठी कविता सादर करत प्रथम पारितोषिक प्राप्त केले आहे. मराठी भाषा घराघरांत पोहोचावी, यासाठी घेतलेला हा पुढाकार या उदाहरणावरून नक्कीच स्पष्ट होण्यास मदत होते. कोरोनाकाळात ज्येष्ठ नागरिकदेखील ऑनलाईनच्या जमान्यात चांगलेच रुळले. मात्र, घरातील इतर लहान सदस्यांसमोर मोबाईलचा होणारा अतिवापर हा निश्चितच आदर्शवत नाही. पुढील पिढीसमोर ऑनलाईन संस्कृती निर्माण होऊ नये, ग्रंथचळवळ उभी राहावी, देशातील थोर महापुरुषांचे कार्य हे घरोघरी पोहोचावे, यासाठी नाशिक येथे साहित्य संमेलन आयोजित करण्यात आल्याचे जातेगावकर नमूद करतात. मराठी ही भाषा ही जीवंत राहणे आवश्यक असून इतरही भाषा या महत्त्वाच्या असल्याचे ते सांगतात.
 
 
छापील पुस्तके ही माणसाशी संवाद साधत असतात. त्यात एक प्रकारे जीवंतपणा असतो. त्यात व्यक्ती समरस होते. मात्र, ई-स्वरूपातील पुस्तके ही जरी उत्तम असली, तरी त्यात व्यक्तीला समरस होण्यात अडचणी येतात, अशी जातेगावकर यांची धारणा आहे. परिवर्तनाची दिशा ही साहित्यात असून साहित्याने अनेक सामाजिक बदल तसेच क्रांती घडवली आहे. त्यामुळे तरुणांना दिशादर्शक अशी साहित्य संमेलने असावी, अशी आग्रही भूमिका ते मांडतात. आजची पिढी ही विचाराने आणि साधन सामग्रीने समृद्ध आहे. त्यामुळे या पिढीसमोर चांगला आदर्श ठेवल्यास ही पिढी नक्कीच प्रगल्भ होईल, अशीच धारणा जातेगावकर यांची आहे. यासाठी ते आपल्या नातवाचे उदाहरण देतात. इयत्ता दुसरीमध्ये इंग्रजी माध्यमात शिक्षण घेणार्‍या त्यांच्या नातवास त्यांनी नाशिक येथील सार्वजनिक वाचनालय दाखविले. त्यातील ग्रंथसंपदा दाखविली. त्यातून प्रेरणा घेत त्यांचा नातू हा एक उत्तम वाचक म्हणून घडत आहे. पालक हे आपल्या पाल्यांना अष्टपैलू बनविण्याच्या नादात त्यांना एका वेगळ्याच स्पर्धेत ढकलत आहेत. आधुनिक जगाची गती ही जास्त आहे. त्यामुळे आजचा युवक हा गोंधळलेला दिसून येतो, असे जातेगावकर सांगतात. न केवळ नाशिक येथे आयोजित होणारी, तर राज्यातील विविध भागांत विविध नाटके रसिकांपर्यंत पोहोचविणे कामी त्याचे सर्वार्थाने नियोजन करणे येथून जातेगावकर यांच्या कार्यास प्रारंभ झाला. त्यांच्यामार्फत नाटकांना देण्यात येणारे ‘कॅप्शन’ या आघाडीच्या नाट्यसंस्थामार्फत देखील वापरण्यात येतात. आधी नमूद केल्याप्रमाणे रसिकांना दर्जेदार नाटक उपलब्ध करून देणे, लोकहितवादी मंडळाच्या माध्यमातून कार्य करत होतकरू तरुणांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे, माजलगाव, अंबेजोगाईसारख्या भागात नाट्य केंद्र उभे करणे, एक उदात्त उद्दिष्ट समोर ठेवून साहित्य संमेलन आयोजित करण्याकामी महत्त्वाची भूमिका बजाविणे, विविध सामाजिक कार्यात सक्रिय असणे, अशी जातेगावकर यांच्या व्यक्तिमत्त्वाची ओळख आहे. मराठीचा आग्रह धरताना ते इतर भाषांचाही सन्मान राखतात. कला, साहित्य या माध्यमातून संस्कार समृद्धतेचाही ते विचार मांडतात. त्यांच्या आगामी कार्यास दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या शुभेच्छा!
 
 
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@