मंदिरांवर हल्ले, मुख्यमंत्री झोपलेले!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    29-Sep-2020
Total Views |


aandhra pradesh_1 &n



चालू महिन्यातच हिंदू मंदिरांवरील हल्ल्याची आणि हिंदू देवी-देवतांच्या मूर्तिभंजनाची-तोडफोडीची अनेक प्रकरणे उघडकीस आली. तरीही सत्ताधार्‍यांनी त्यावर तोंड उघडले नाही. यावरूनच हिंदूंवरील अन्याय-अत्याचाराचा मुद्दा आला की, ठोस उपाययोजना करण्याऐवजी मुख्यमंत्री झोपा काढण्याचेच काम करत असल्याचे दिसते.


तिरुपती आणि व्यंकटेश्वराची भूमी म्हणजेच आंध्र प्रदेशमध्ये मागील काही काळापासून हिंदू मंदिरांवरील हल्ल्यात सातत्याने वाढ होत असल्याचे दिसते. आता पुन्हा एकदा आंध्र प्रदेशमधील चित्तूर जिल्ह्याच्या अगारा मंगलम गावातील शिव मंदिरातील नंदीमूर्तीची तोडफोड करण्यात आली. रविवारी, दि. २७ सप्टेंबरला ही घटना घडली असून, त्याआधीही राज्यात हिंदू मंदिरांना लक्ष्य करण्याचे अनेक प्रकार समोर आले. चालू महिन्यातच १६ सप्टेंबरला कृष्णा जिल्ह्यातील मक्कापेटा गावातील काशी विश्वेश्वर मंदिरावर हल्ला करण्यात आला, तसेच इथेही नंदीमूर्तीची तोडफोड केली गेली. इथल्या घटनेनंतर एका दिवसाच्या अंतराने येलमेश्वर येथील एका मंदिरातील हनुमान मूर्तीची तोडफोड करण्यात आली. त्याआधी ६ सप्टेंबरला अंतरवेदीतील श्री लक्ष्मी नरसिंह स्वामी मंदिरातील शतवर्षीय रथाला आग लावत जाळून टाकले गेले. तथापि, भाविकांच्या नाराजी व संतापामुळे सरकारने एक कोटी रुपये खर्च करून नव्या रथाची उभारणी करू असे सांगितले. तत्पूर्वी १४ फेब्रुवारीला नेल्लोरमधील प्रसन्ना वेंकटेश्वर स्वामी मंदिराचादेखील रथ जाळण्यात आला होता, तर २१ जानेवारीला पूर्व गोदावरी जिल्ह्याच्या पीथापुरम शहरातील देवीदेवतांच्या मूर्तींची तोडफोड करण्यात आली होती, तसेच फलक फाडून टाकले होते.


यंदाच्या वर्षांत आंध्र प्रदेश राज्यात हिंदू मंदिरांवरील हल्ल्याच्या अनेक घटना घडल्या, त्यापैकी काहींचाच इथे उल्लेख केला आहे. मात्र, जिथे जिथे मंदिरांवर हल्ल्याच्या घटना घडल्या, तिथल्या स्थानिकांनी व भक्तांनी यामागे नक्कीच कसलेतरी षड्यंत्र असल्याचा दावा केला. पण, राज्यातील जगनमोहन रेड्डी सरकारने मंदिरांवरील हल्ल्याची फारशी गांभीर्याने दखल घेतली नाही वा असे हल्ले रोखण्यासाठी ठोस उपाययोजनादेखील केल्या नाहीत. उलट मंदिरांवरील हल्ल्याविरोधात निषेध, निदर्शने करणार्‍यांना ताब्यात घेण्याचे, त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे काम त्यांच्या सरकारने प्राधान्याने केले. राज्य सरकारचे हे कर्तृत्व पाहून भाजपने हिंदू मंदिरांवरील हल्ल्यांच्या संदर्भाने नुकताच एक प्रस्ताव पारित केला. योगायोगाने नव्हे तर नियोजनबद्ध पद्धतीने राज्यभरातील हिंदू मंदिरांना लक्ष्य केले जात असून याद्वारे जातीय व धार्मिक ध्रुवीकरणाचा डाव असल्याचे भाजपने प्रस्ताव मंजूर करताना म्हटले. मंदिर व मूर्ती तोडफोडीच्या घटना घडल्यानंतर स्थानिकांनी व भाविकांनी केलेल्या षड्यंत्राच्या आणि भाजपने केलेल्या सुनियोजित हल्ल्याच्या दाव्यामुळे आंध्र प्रदेशमध्ये खरेच हिंदुंविरोधी कारवाया सुरू असल्याचे म्हणता येते.


दरम्यान, राज्यात असे का होत असावे? हिंदू मंदिरांवरील हल्ल्यामागे कोणाचा हात असावा? मंदिरांवर इतके हल्ले झाले तरी मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांनी एकाही घटनास्थळाचा दौरा का केला नसावा? हे प्रश्न उपस्थित होतात आणि त्यामागे त्यांचे ख्रिश्चनत्व आडवे येत असल्याचे सांगितले जाते. उल्लेखनीय म्हणजे, आंध्र प्रदेशचे पोलीस महासंचालक आणि गृहमंत्रीदेखील ख्रिश्चनच असून त्यामुळेच चर्चच्या इशार्‍यावरून हिंदू मंदिरांना लक्ष्य केले जात असल्याचा आरोप करण्यात येतो. संविधानाने राजकीय वा प्रशासकीय सत्तेवर कोणी यावे किंवा न यावे यात धर्माची अट ठेवलेली नाही. पण, अशी सत्तास्थाने स्वधर्मीय असल्याने ख्रिश्चन मिशनरी व चर्चना अभय वाटत असेल का? हा एक महत्त्वाचा मुद्दा आणि सत्तेच्या वरिष्ठस्थानी बसलेली मंडळी आपली असल्याने आपण काहीही केले तरी आपल्याला हात लावला जाणार नाही, असे त्यांचे मत झाले असावे का? कारण, जगनमोहन रेड्डी मुख्यमंत्रिपदी आल्यापासून त्यांच्यावर नेहमीच चर्च व मिशनरीधार्जिणेपणाचे आरोप केले गेले. आताही ते मंदिरांवरील हल्ल्याबाबत भाष्य करण्याऐवजी मौन धारण करून आहेत, तेही चर्चच्या सांगण्यावरूनच का?


जगनमोहन रेड्डी आणि त्यांच्या वायएसआर काँग्रेस पक्षावर ख्रिश्चनांशी जवळीक साधण्याचा किंवा त्यांना मोकळीक दिल्याचा आरोप होत असतानाच त्यांच्याच पक्षाच्या एका खासदाराने केलेले दावे धक्कादायक आहेत. गेल्या चार-पाच महिन्यांपासून खा. रघुराम कृष्ण राजू सातत्याने राज्यातील ख्रिश्चन मिशनर्‍यांच्या कारवायांबाबत बोलत आहेत. आंध्र प्रदेशमध्ये ख्रिश्चन मिशनर्‍यांचे प्राबल्य वाढल्याचे सांगतानाच धर्मांतराची प्रक्रिया वेगाने सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले. राज्यातील कागदावरील ख्रिश्चन लोकसंख्या २.५ टक्के असली तर ती प्रत्यक्षात २५ टक्क्यांपर्यंत पोहोचल्याचा दावाही त्यांनी केला होता. तथापि, यामुळे सरकारवर आरोप होण्याच्या काळजीमुळे त्यांनी या प्रकारात आम्ही तरी काय करू शकतो, हे सर्व देशभरात सुरू आहे, असा पवित्राही घेतला होता. मात्र, याच रघुराम कृष्ण राजू यांनी संसदेच्या आताच्या अधिवेशनात आंध्र प्रदेशमध्ये हिंदू मंदिरांबाबत ‘कन्स्ट्रक्टिव डिस्ट्रक्शन’ सुरू असल्याचा मुद्दा उपस्थित केला होता. तसेच राज्यात धार्मिक आयोगाच्या स्थापनेची मागणी केली होती. हे पाहता आंध्र प्रदेशमधील सत्ताधारी हिंदूविरोधी आणि ख्रिश्चनानुकूल आहेत, असे कोणी म्हटल्यास, ते वावगे ठरू शकत नाही.


दरम्यान, राज्यातील मंदिरांवरील हल्ल्याचा प्रश्न केवळ भाजप, जनसेना पक्ष किंवा हिंदुत्ववादी संघटनाच उपस्थित करत नसून टीडीपीसारखा पक्षही यावरून सरकारवर टीका करताना दिसतो. तथापि, मंदिरांना कोण लक्ष्य करत आहे, हे सिद्ध होण्यासाठी याची निष्पक्ष चौकशी व्हायला हवी. म्हणजे राज्यभरातील सर्वच मंदिरांवरील हल्ल्याच्या घटनांचे बिंदू जोडून एखादा व्यापक कट शिजतोय का, हे उघड होईल. त्यासाठी सरकारने एसआयटी किंवा सीबीआय/एनआयएच्या माध्यमातून तपासासाठी प्रयत्न करायला हवेत. जेणेकरून खरे गुन्हेगार देशासमोर येतील. यातला आणखी एक मुद्दा म्हणजे मंदिरांवरील हल्ल्याबाबत तथाकथित धर्मनिरपेक्ष प्रसारमाध्यमे आणि बुद्धिजीवी-विचारवंतांंच्या गोटातली चिडिचूप शांतता. देशातील कुठल्याही चर्च वा मशिदीवर एखादा दगड पडला तरी ‘खतरे में’चा आरडाओरडा करणार्‍यांचे टोळके मंदिरांना लक्ष्य करणार्‍यांचा शब्दानेही निषेध करताना दिसले नाही. कारण, मुद्दा हिंदूंशी निगडित होता आणि या सर्वांच्या दृष्टीने हिंदू असहिष्णू, हल्लेखोर, दहशतवादी असतो, त्यामुळे त्याच्या मंदिरावर वा देवदेवतांवर हल्ले झाले तरी तोंड उघडण्याची गरज नाही, असे या ढोंगी धर्मनिरपेक्षतावाद्यांना व तटस्थ प्रसारमाध्यमांना वाटते. यामुळे लोकांनीही त्यांचे बुरखे फाडण्याचे काम केले पाहिजे, त्यामागचे हिडीस चेहरे ओळखले पाहिजे.

 
@@AUTHORINFO_V1@@