"धर्म' ही 'रिलिजन'पेक्षा व्यापक संकल्पना" - स्वामी गोविंददेवगिरी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    28-Sep-2020
Total Views |
swami_1  H x W:
 
 
 
 
मुंबई : "धर्म म्हणजे रिलिजन नाही. रिलिजन ही उपासना पद्धती आहे आणि धर्म ही अत्यंत व्यापक संकल्पना आहे, हे आपल्या लक्षात येणे गरजेचे आहे."असे श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यास समितीचे कोषाध्यक्ष स्वामी गोंविददेवगिरी महाराज यांनी प्रतिपादन केले. आपल्या एका धर्मात कितीतरी उपासना पद्धती आहेत. हिंदू हा जीवनमूल्यात्मक धर्म आहे, असेही ते म्हणाले. 
 
 
 
सा. विवेकच्या 'राममंदिर ते राष्ट्र मंदिर' ग्रंथानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रजागरण व्याख्यानमालेचे दुसरे पुष्प सोमवार दि. २८ सप्टेंबर २०२० रोजी सायंकाळी सहा वाजता पार पडले. या प्रसंगी स्वामी गोविंददेवगिरी महाराज यांनी 'धर्मविचार : काल, आज आणि उद्या' या विषयावर आपले विचार प्रकट केले.
 
 
 
गोविंददेवगिरी महाराज पुढे म्हणाले, "राष्ट्र' या संकल्पनेत तीन गोष्टींचा अंतर्भाव होतो. पहिली गोष्ट म्हणजे प्रत्येक राष्ट्राला ठरलेली भूमी असते. दुसरी म्हणजे त्या भूमीवर एक समाज असतो. तिसरी गोष्ट म्हणजे त्या समाजाला एक परंपरा असते. समाज आहे आणि परंपरा नाही असे राष्ट्र होत नाही."
 
 
 
"दीर्घकाळापर्यंत आफ्रिका हे राष्ट्र नव्हते, कारण तिथे जंगली समाज होता, भूमी होती, पण परंपरा नव्हती. भारताचा विचार केला असता भारत हे राष्ट्र ज्या परंपरेला बांधलेले आहे, त्याला धर्माचे अधिष्ठान आहे, त्यामुळे हे राष्ट्र टिकून आहे, असेही ते म्हणाले. आजच्या काळात धर्म समजून घ्यायचा असेल, तर सामंजस्य चतुष्टम, पुरुषार्थ चतुष्टम्, वर्ण चतुष्टम्, आश्रम चतुष्टम्, साधन चतुष्टम् आणि ऋण चतुष्टम् या गोष्टी समजून घ्याव्या लागतील, असेही स्वामी गोविंददेवगिरी महाराज म्हणाले.
 
 
 
भारतीय संस्कृतीचे महत्त्व विशद करताना ते म्हणाले, "सगळ्या जगातल्या संस्कृतींचा अभ्यास केल्यावर असे दिसून येते की, भारतीय संस्कृतीइतका मानवी विकास झालेला अन्य कोणताही देश नाही. म्हणून ह्या देशाचे वेगळेपण टिकून आहे. आपल्या संत महापुरुषांनी भक्तीच्या माध्यमातून धर्म सोपा करून सांगितला. काळ बदलत चालला असला, तरी धर्माची मूलतत्त्वे कधीही बदलत नाहीत. जीवनविकासासाठी प्रत्येकाने धर्माचे आचरण करावे" असेही त्यांनी आवाहन केले.
 
 
 
धर्म म्हणजे काय, धर्माचे अधिष्ठान आदी बिंदूंवर स्वामी गोविंददेवगिरी महाराज यांनी आपले विचार प्रकट केले. उद्या, मंगळवार दि. २९ सप्टेंबर २०२० रोजी सायंकाळी सहा वाजता माजी सनदी अधिकारी व लेखक, विचारवंत अविनाश धर्माधिकारी यांचे 'जागतिक राजकारणात भविष्यातील भारताचे स्थान' या विषयावर व्याख्यान होणार आहे.



@@AUTHORINFO_V1@@