खालच्या दर्जाचे राजकारण

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    11-Aug-2020
Total Views |
Sanjay Raut Aravind Sawan
 
 


अरविंद सावंत यांचा सर्वात मोठा प्रमाद म्हणजे गोपीनाथ मुंडे यांच्यासारख्या स्वयंभू व कर्तृत्ववान व्यक्तीच्या मृत्यूचे राजकारण करण्याचा त्यांनी केलेला अश्लाघ्य प्रकार. आपल्या सर्वांना माहिती आहेच की, गोपीनाथजींच्या जीवनाचा अंत एका दुर्दैवी अपघातात झाला. मात्र, आता त्याची सीबीआय चौकशी करा, अशी मागणी करत अरविंद सावंत यांनी अतिशय खालच्या दर्जाचे राजकारण करुन दाखवले आहे.
 
 
देशभरात धुरळा उडत असलेले अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूचे प्रकरण शिवसेनेच्या अंगाशी येत असल्याचे दिसते. कारण, समाजमाध्यमांसह प्रसारमाध्यमांतून या प्रकरणाशी संबंध असल्याच्या संशयावरुन आदित्य ठाकरे यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका-टिप्पणी व आरोपबाजी होत आहे. उल्लेखनीय म्हणजे, आपल्याला लक्ष्य करुन होणार्‍या टीकेवर खुद्द आदित्य ठाकरे यांनीदेखील एक पत्रक जारी करत स्पष्टीकरण दिलेले आहे.
 
तथापि, सुशांत सिंहच्या मृत्यू प्रकरणाचा तपास प्रभावित करण्यात शिवसेनेचे युवराज-पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांचा सहभाग आहे किंवा नाही, हे आता कदाचित सीबीआयच सांगू शकेल. मात्र, शिवसेना खासदार अरविंद सावंत यांच्यासारख्या लोकांनी या प्रकरणावरुन भाजपवर निशाणा साधण्यासाठी सध्या जे काही गलिच्छ राजकारण चालवले आहे, ते आदित्य ठाकरे यांना यातून बाहेर काढणारे नव्हे, तर अधिकाधिक संशयाच्या गर्तेत ढकलणारेच ठरत आहे व त्यातून आदित्य ठाकरे यांची प्रतिमा उजळण्याऐवजी काळवंडण्याचाच धोका संभवतो.
 
तत्पूर्वी महाराष्ट्रात एकामागोमाग मुलाखतीचे पर्व सुरु असताना शेवटची मुलाखत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संजय राऊत यांना दिली व ती नंतर फार मोठ्या मनोरंजनाचा खजिना ठरली. आजतागायत महाराष्ट्राच्या कुठल्याही मुख्यमंत्र्याची जेवढी चेष्टा झाली नाही, तेवढी चेष्टा या मुलाखतीनंतर उद्धव ठाकरे यांची झाली, म्हणजेच त्यांची प्रतिमा मुख्यमंत्रिपदाला न शोभणारी व्यक्ती अशी झाली. खरे म्हणजे, राजकारणात आणि समाजकारणात प्रतिमा निर्मितीची एक प्रक्रिया असते आणि ती टप्प्याटप्प्याने आकाराला येते, तसेच तिचे विघटनही टप्प्याटप्प्यानेच होत असते.
 
त्यात ‘जोर का झटका’ वगैरे प्रकार नसतो, तर मुठीतून वाळू सरकत जावी तशी संबंधितांची जनमानसातील प्रतिमा नष्ट होत जाते. एक सहृदय माणूस, उत्तम फोटोग्राफर, चांगला संघटक अशी उद्धव ठाकरे यांची प्रतिमा आहे. मात्र, असंगाशी संग करुन त्यांनी काय ‘करुन दाखवले’ याचा लेखाजोखा आता सर्वांसमोर आहे व त्याबद्दल वेगळे काही सांगण्याची गरज नाही. आता सुशांत सिंह राजपूत प्रकरणाने पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्या प्रतिमेचेही असेच काहीसे होत असून त्यांच्यावरील आरोपांवर प्रतिक्रिया देणार्‍यांचाही या प्रतिमाहननात हातभार लागत आहे.
 
 
सध्या शिवसेनेवर कोणताही आघात झाला की, त्यावर उत्तर देण्याचा विडा संजय राऊत यांच्यासारख्या उथळ माणसाने उचललेला आहे. मग ते पालघरमधील साधू हत्याकांडाचे प्रकरण असो वा आताचे सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरण वा आणखी कोणतेही. मात्र, संजय राऊत यांच्या बोलघेवडेपणाचे सरकार व पक्षावर काय परिणाम होतील, याची कल्पना मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना नाही, असे दिसते. त्यात आता अरविंद सावंत यांच्यासारख्या अतिबालिश माणसाची भर पडली, हे शिवसेना व ठाकरेंना अधिक अडचणीत आणणारेच. दरम्यान, अरविंद सावंत हे महाशय मुळात दोन्ही वेळच्या लोकसभा निवडणुकीत निवडून आले ते मोदी लाटेत; अन्यथा जिथे मोहन रावले यांच्यासारखा उमेदवार पडला तिथे अरविंद सावंत यांच्यासारखी मतदारसंघात पाळेमुळे नसलेली उपरी व्यक्ती निवडून येणे शक्यच नव्हते.
 
नंतर यांनीच नरेंद्र मोदी सरकारच्या दुसर्‍या कार्यकाळातील मंत्रिमंडळात केंद्रीय मंत्रिपददेखील भोगले. मात्र, यामुळे आधीच मर्कट, त्यात मद्य प्याला, अशी अवस्था झालेले हे महाशय काहीही बडबडू लागले. अर्थात, शिवसेनेचे नेते मुक्त माध्यमांवर चेष्टेचा विषय झालेले आहेतच, त्यात अरविंद सावंत यांच्या बडबडीने आणखी एक बरळूबहाद्दर सर्वांसमोर आला. मात्र, अरविंद सावंत यांचा सर्वात मोठा प्रमाद म्हणजे आताच्या सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणावरुन गोपीनाथ मुंडे यांच्यासारख्या स्वयंभू व कर्तृत्ववान व्यक्तीच्या मृत्यूचे राजकारण करण्याचा त्यांनी केलेला अश्लाघ्य प्रकार. आपल्या सर्वांना माहिती आहेच की, गोपीनाथजींच्या जीवनाचा अंत एका दुर्दैवी अपघातात झाला. मात्र, आता त्याची सीबीआय चौकशी करा, अशी मागणी करत अरविंद सावंत यांनी अतिशय खालच्या दर्जाचे राजकारण करुन दाखवले आहे.
 
कारण, गोपीनाथ मुंडे यांच्या अपघाती मृत्यूनंतर केंद्रीय गृहमंत्रालयाने सीबीआयमार्फत त्याची चौकशी आधीच केलेली आहे. तसेच सीबीआयने चार महिने तपास करुन मुंडे यांच्या अपघाती मृत्यूत काहीही भलेबुरे नसल्याचा निष्कर्ष काढलेला आहे. मात्र, केंद्रीय मंत्री राहूनही अक्कल न आलेल्या अरविंद सावंत यांना हेही माहिती नाही आणि हा शिवसेनेतील थेट पायाच्या घोट्यापर्यंत मेंदू घरंगळत आलेल्या राजनेत्याचा अस्सल नमुनाच म्हणावा लागेल. अर्थात केंद्रातील मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागल्याने, त्याची सल त्यांच्या मनात असेल व त्यामुळे भाजपची प्रतिमा मलीन करण्यासाठी ते गोपीनाथ मुंडे यांच्या अपघाती मृत्यूचे राजकारण करत असावेत.
 
कारण, राजकारणात हिशेब चुकते करावे लागतात आणि एका कुटुंबाचे गुलाम असलेल्या राजकीय पक्षात तर हे हिशेब जरा लवकरच चुकते करावे लागतात. मात्र, ज्या कुटुंबाची चाटुगिरी करुन अरविंद सावंत यांच्यासारखी कर्तृत्वहीन माणसे आपले अस्तित्व टिकवून आहे, त्या कुटुंबाच्या बाबतीत सारेकाही अलबेल आहे, असे मुळीच नाही. सगळ्यांना भरभरुन देणार्‍या हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर त्यांच्या मृत्युपत्रावरुन कुटुंबातच झालेला वाद तर माध्यमांच्या चव्हाट्यावरदेखील आला होता! तथापि, भाजपने मात्र कधीही या किंवा अशा कुठल्याही फालतू विषयाचे राजकारण केले नाही वा त्यावरुन तोंड चालवले नाही. पण, गोपीनाथ मुंडे यांच्या अपघाती मृत्यूचा विषय उकरुन काढत अरविंद सावंत यांनी तसे केले, मात्र यातून त्या पक्षाची पातळी किती घसरली, हेच दिसून येते.
 
दरम्यान, भाजपला लक्ष्य करत अरविंद सावंत गोपीनाथ मुंडे यांच्या अपघाती मृत्यूच्या चौकशीची मागणी करत असले तरी त्यांच्याच पक्षाच्या राज्य सरकारने सुशांत सिंह राजपूत प्रकरणात तर घटना घडून 50 दिवस उलटले तरी एफआयआरसुद्धा दाखल केलेला नव्हता. त्याचे वडील मुंबईत आल्यानंतरही इथल्या पोलिसांची कुठल्यातरी दबावाखाली चालू असलेली कार्यपद्धती पाहून त्यांनी इथे सुशांतच्या मृत्युप्रकरणी तक्रार करण्याऐवजी बिहारमध्ये गुन्हा दाखल करण्याचा निर्णय घेतला. तिथून पुढे बिहार सरकारने या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवत असल्याचे जाहीर केले. मात्र, ठाकरे सरकारने यावरुनही मोठाच गहजब माजवला आणि ‘सीबीआय चौकशी नको,’ असे एकच पालुपद चालवले. तथापि, एखादा गुन्हा दोन राज्यांशी संबंधित असेल तर त्याच्या तपासाचे आदेश राज्य सरकारने विनंती केली नाही तरी केंद्र सरकार सीबीआय वा एनआयएला देऊ शकते. मात्र, ही बाबही राज्य सरकारला समजत नसावी, म्हणून त्यातले मंत्री आणि तिघाडी सरकारच्या घटक पक्षातील नेते अधिकाराची भाषा करताना दिसतात.
 
कहर म्हणजे शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांनी एक पाऊल पुढे टाकत सुशांत सिंह राजपूतच्या वडिलांच्या चारित्र्यावरच चिखलफेक करण्याचा घाणेरडा उद्योग केला. मात्र, आपल्या धन्याला मुख्यमंत्री करण्यासाठी संजय राऊत यांनी ‘मातोश्री’ ते ‘सिल्व्हर ओक’ असे हेलपाटे मारले, त्याच सरकारने पालघरमध्ये जमावाने एकत्र येऊन दोन हिंदू साधूंची दगडाने ठेचून हत्या केली तरी आरोपपत्र दाखल केले नव्हते. तसेच साधूंना मारहाणीच्या सर्वत्र प्रसारित झालेल्या ध्वनिचित्रफितीत दिसणार्‍या व नाव येणार्‍या व्यक्तीविरोधातही ठाकरे सरकारने कोणतीही कारवाई केली नाही. सोमवारी तर स्थानिक न्यायालयाने या हत्याप्रकरणातील 28 आरोपींना पोलिसांनी आरोपपत्र दाखल न केल्याने जामिनावर सोडून देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे संजय राऊत यांनी सुशांत सिंह प्रकरणी चोंबडेपणा करण्याऐवजी आधी हे कसे झाले आणि आता इथे कोणाच्या कुटुंबावर चिखलफेक करणार, याचे उत्तर द्यावे.
 
@@AUTHORINFO_V1@@