दोन्ही मंत्री सत्तेत मशगुल! कर्मचाऱ्यांविना हॉस्पिटल सुरूच का केले?

    08-Jul-2020
Total Views |
Thane_1  H x W:


किरीट सोमय्या व निरंजन डावखरे यांचा प्रशासनाला सवाल


ठाणे : कोरोना रुग्णांची महापालिका थट्टा करीत असून, त्यांच्याशी क्रूरपणे वागत आहे. तर ठाण्यातील दोन्ही कॅबिनेट मंत्री सत्तेत मश्गुल आहेत. वैद्यकिय कर्मचाऱ्यांची व्यवस्था पुरेशी नव्हती. तर १००० हॉस्पिटलचे सुरू करण्याचा अट्टाहास का केला. तर आणखी हॉस्पिटल उभारण्याची तयारी का केली जात आहे, असा सवाल भाजपचे प्रभारी किरीट सोमय्या व आमदार निरंजन डावखरे यांनी आज केला. तसेच गायकवाड, सोनवणे आणि मोरे कुटुंबीयांच्या भावनांशी खेळणाऱ्या हॉस्पिटल व्यवस्थापनावर कठोर कारवाईची मागणी केली.


ग्लोबल हब येथील रुग्णालयात भालचंद्र गायकवाड यांचा मृतदेह जनार्दन सोनावणे यांच्या कुटुंबीयांना देण्यात आला होता. तर जनार्दन सोनावणे यांच्यावर मोरे म्हणून उपचार सुरू होते. या गलथान कारभाराच्या पार्श्वभूमीवर भाजपाचे प्रभारी किरीट सोमय्या व आमदार निरंजन डावखरे यांनी आज गायकवाड व सोनावणे यांच्या कुटुंबियांसह महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांची आज भेट घेतली. त्यानंतर दोन्ही नेते पत्रकारांशी बोलत होते.







ठाणे महापालिकेने कोरोनाच्या रुग्णांची क्रूर चेष्टा चालवली आहे. भालचंद्र गायकवाड यांचा मृतदेह जनार्दन सोनावणे यांच्या कुटुंबीयांना दिल्याचा प्रकार झाला होता. काल रात्री भालचंद्र गायकवाड यांच्या कुटुंबियांनी जनार्दन सोनवणे यांची रुग्णालयात भेट घेण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यावेळी रुग्णालयाच्या व्यवस्थापनाने पीपीई किट घालून गायकवाड कुटुंबीयांना जनार्दन सोनवणे यांच्याजवळ रात्री ११ वाजता नेले होते. प्रत्यक्षात जनार्दन सोनावणे यांचा नऊ वाजून ४० मिनिटांनी मृत्यू झाला होता. जनार्दन सोनवणे यांच्यावर मोरे म्हणून उपचार सुरू होते. तर खुद्द मोरे हे रुग्ण दुसऱ्या मजल्यावर नॉन आयसीयू मध्ये उपचार घेत आहेत. एकाच नावाने दोन रुग्णांवर उपचार सुरू असल्याचा हा प्रकार धक्कादायक व बेजबाबदार पणाचा कळस आहे, असा आरोप किरीट सोमय्या व निरंजन डावखरे यांनी केला. मृतदेह अदलाबदली संदर्भात दोन्ही बाजू जबाबदार असल्याचा रुग्णालयाच्या व्यवस्थापनाने सोनवणे कुटुंबियांकडून लिहून घेतलेला बॉण्ड हा क्रूरपणा आहे, याकडे सोमय्या यांनी लक्ष वेधले.


ग्लोबल रुग्णालयात केवळ २०० रुग्णांची देखभाल करता येईल, एवढेच कर्मचारी उपलब्ध असल्याचे रुग्णालय व्यवस्थापनाचे म्हणणे आहे. मग १००० बेडचे रुग्णालय उभारण्याचा अट्टाहास का केला? तर आणखी हॉस्पिटल का उभारली जात आहेत, असा सवाल दोन्ही नेत्यांनी करून केवळ व्यवस्था नसल्यामुळे सोनावणे यांचा मृत्यू झाल्याचा आरोप केला. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करावा, अशी मागणी किरीट सोमय्या यांनी केली. तसेच अधिष्ठाता डॉ. योगेश शर्मा यांची हकालपट्टी करण्याची मागणी केली.


विशेष कोरोना रूग्णालयात एवढा भयंकर प्रकार घडूनही ठाणे शहरातील दोन्ही कॅबिनेट मंत्री सत्तेत मशगुल आहेत. दोन्ही मंत्र्यांनी कुटुंबीयांची भेट घेतलेली नाही. तसेच व्यवस्थापनाशी चर्चाही केली नाही, ही दुर्दैवाची बाब आहे, असे सोमय्या व डावखरे यांनी सांगितले.


यापुढील काळात नातेवाईकांनी मृत व्यक्तीची ओळख पटवल्यानंतरच रुग्णालय प्रशासनाने कार्यवाही करावी. तसेच नातेवाईकांना आणल्याशिवाय अंत्यसंस्कार करू नयेत, अशी मागणी भाजपाने केली. त्याला आयुक्तांनी मंजुरी दिली.









अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121