इच्छाशक्तीची पारख...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    13-Jul-2020
Total Views |

cosmic-mind-power-healing




इच्छाशक्तीत एक प्रकारची जबरदस्त कार्यशीलता आहे. ‘केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे’ ही उक्ती इच्छाशक्तीचे खरे सार आहे. काही जणांकडे प्रबळ इच्छाशक्ती आहे आणि काही जणांकडे इच्छाशक्तीची वानवा आहे, या सिद्धांतात तसे काही तथ्य नाही. तथ्य इतकेच आहे की, काही जण आपल्या आयुष्य बदलण्यासाठी वा त्यात परिवर्तन करायला तयार असतात आणि काहींची तशी अजिबात तयारी नसते.




व्यक्तीला जर आयुष्यात आपल्या ध्येयांपर्यंत पोहोचायचे असेल, तर गरज आहे ती दांडग्या मानसिक सामर्थ्याची. दमदार इच्छाशक्ती ही या दांडग्या मानसिक सामर्थ्यात वास करून असते. इच्छाशक्तीचा प्रतिसाद आपल्या मेंदूबरोबर आपल्या शरीरातून येत असतो. ‘प्रीफ्रॉन्टल कॉर्टेक्स’ (Prefrontal Cortex) हा आपल्या मेंदूचा भाग आपल्या मनात येणार्‍या इच्छांचे नियोजन करण्यात आणि सारासार निर्णय घेण्यासाठी महत्त्वाचा आहे. आपल्या मनात जी अंतर्गत द्वंद्व घडत असतात, त्यांना प्रतिक्रिया देताना आपल्या इच्छाशक्तीची प्रक्रिया घडत जाते. 




आपल्याला एखादी गोष्ट करायची असते. जसे की, गोड पदार्थ जेवणात खायचा असतो किंवा पानात घालून तंबाखू खायचा असतो. पण, आपल्याला शास्त्र सांगत असते की, आपल्या आरोग्याच्या स्थितीनुसार तसे करून चालणार नाही किंवा आपल्याला आपला आयकर वेळेत भरणे आवश्यक आहे. पण, आपण ते करत नाही. अशावेळी खरी गरज असते ती आपल्या मानसिक नियोजनाची. या मानसिक नियोजनात स्वयंशिस्त, स्वनियमन आणि इच्छाशक्ती अशा प्रकारच्या मानसिक पैलूंची आवश्यकता असते. या पैलूंचे योग्य नियोजन मेंदूच्या ‘प्रीफ्रॉन्टल कॉर्टेक्स’मध्ये केले जाते आणि म्हणून हा भाग अत्यंत मोलाचा आहे. 




आपण जेव्हा आपला देहस्वभाव बदलतो, सभोवताली असलेल्या मनाला विचलित करू पाहणार्‍या अनेक गोष्टींपासून आपलं लक्ष योग्य कार्यात केंद्रित करायचा प्रयत्न करतो किंवा खूप कष्टाने वाया जाणार्‍या वेळेचे चोख व्यवस्थापन करतो, तेव्हा आपण आपल्या बौद्धिक क्षमतेचा वा मेंदूच्या कार्यक्षमतेचा एक स्रोत जो या सगळ्या गोष्टींचे नियोजन करण्यासाठी वा त्यांना नियंत्रित करण्यासाठी अनिवार्य आहे, त्याचा आपण सतत वापर करत असतो. सततच्या अशा वापराने आपले स्नायू जसे थकतात आणि त्यासाठी त्या स्नायूंना व्यायामाने सक्षम करण्याची गरज असते वा स्नायूंना शिक्षित करणे कधीकधी आवश्यक असते. तसेच मनालाही प्रशिक्षित करण्याची व सार्थ वळण देण्याची जरुरी आहे. सर्वसामान्य समज असा आहे की, स्वतःला मर्यादेपलीकडे व्यक्ती रेटत राहिली तर तिची इच्छाशक्ती वर्धित होते. 




प्रत्यक्षात इच्छाशक्तीला प्रमाणाच्या बाहेर मनाविरुद्ध लोटत राहिलो तर ती आपल्याला साथ देत नाही. आपल्या मानसिक मर्यादांचा आपण विचार न करता रेटत राहिलो तर तिचा चांगलाच फज्जा उडतो. एक विलक्षण थकवा अशा तर्‍हेने स्वतःला मर्यादेबाहेर रेटणार्‍या व्यक्तींना जाणवतो. कर्तृत्व माणसाच्या आयुष्यातील एक बहुमोल गोष्ट आहे, यात वादच नाही. पण, त्यासाठी स्वतःला क्षमतेपलीकडे ढकलण्यात दमछाक होण्याचा धोका अधिक आहे. आपल्या गाडीत पेट्रोल कितीही असेल, पण आपली गाडी चालूच झाली नाही, तर काय उपयोगाची? म्हणूनच इच्छाशक्तीचे एकंदरीत अस्तित्व आणि तिची निष्पत्ती या दोन्ही गोष्टी जितक्या आव्हानात्मक आहेत, तितक्याच त्या अनाकलनीयही आहेत. 




सर्वसाधारणपणे आपण अचाट कार्यक्षमता असलेल्या व्यक्तींच्या जीवनाकडे पाहिले, तर त्यांच्या इच्छाशक्तीला संपन्न करणार्‍या इतर अनेक गोष्टी असतात किंवा त्यांनी त्या स्वतः नियमितपणे विकसित केलेल्या असतात. याचाच विधायक परिणाम म्हणून सामान्य परिस्थितीतसुद्धा त्यांच्या हातून जे घडते, ते केवळ असामान्य आणि दिव्यत्वाची प्रचिती देणारे असते. इच्छाशक्तीत एक प्रकारची जबरदस्त कार्यशीलता आहे. ‘केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे’ ही उक्ती इच्छाशक्तीचे खरे सार आहे. काही जणांकडे प्रबळ इच्छाशक्ती आहे आणि काही जणांकडे इच्छाशक्तीची वानवा आहे, या सिद्धांतात तसे काही तथ्य नाही. तथ्य इतकेच आहे की, काही जण आपल्या आयुष्य बदलण्यासाठी वा त्यात परिवर्तन करायला तयार असतात आणि काहींची तशी अजिबात तयारी नसते.



व्यसनाधीनतेच्या बाबतीत याची प्रचिती आपण सगळ्यांनी घेतली आहे. व्यसनमुक्त होणार्‍यांची प्रेरणादायी ऊर्जा प्रभावी असते. इच्छाशक्तीचा स्रोत मुळात या प्रेरणादायी ऊर्जेत आहे. यात आपल्याला मोह पडणार्‍या गोष्टींपासून आपण स्वतःला कसे दूर ठेवू शकतो, हे महत्त्वाचे आहे. यात व्यसनाधीनतेतून मुक्ती कशी मिळवायची, याबरोबरच भ्रष्टाचारातून स्वतःला कसे दूर ठेवायचे, यासारख्या सामाजिक सुरक्षिततेसाठी अत्यंत आवश्यक असलेल्या अनेक गोष्टींचा समावेश आहे. म्हणूनच इच्छाशक्तीची वल्गना करणार्‍यांची वेळोवेळी फजिती झालेली आपण पाहिली आहे.




नृशंस प्रामाणिकपणा आवश्यक आहे, त्या प्रत्येकासाठी, ज्यांना आपल्या इच्छाशक्तीचा विकास करायचा आहे. आपल्या मानसिक बगिच्यात किती मोहाची फुले आहेत, कुठे चिखलाची जमीन आहे, कुठून झाडाची अवजड फांदी आपल्यावर कोसळणारे आहे आणि कुठून एखादा विंचू आपल्याला डसणार आहे, याची उत्तम जाण व्यक्तीला असायला लागते. आपले आपल्यालाच अडकविणारे सापळे ओळखायला यायला लागतात. 





(क्रमशः)
- डॉ. शुभांगी पारकर
@@AUTHORINFO_V1@@