'राईड गर्ल’ विशाखा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

Total Views |

vishakha fulsunge_1 



बाईक रायडिंग, बाईक स्टंट हे सगळे पुरुषी खेळ, ते महिलांच्या कुवतीबाहेरचेच, हा पूर्वग्रह मोडीत काढत वार्‍याच्या वेगावर बाईकसवारी करणार्‍या साहसी विशाखा फुलसुंगे हिच्याविषयी...


मुंबईतील विशाखा फुलसुंगे ही महाराष्ट्रातील टॉप लेडी बायकर्सपैकी एक. संपूर्ण जगावर आपल्या गाडीच्या या दोन चाकांची छाप पाडणे हेच तिचे स्वप्न. २७वर्षांची स्टंट बाईकर विशाखा ही एमबीए पदवीधर आहे. सोबतच मॉडेलिंग आणि निवेदनाच्या क्षेत्रातही ती काम करते. स्वतःच्या मालकीची बाईक घेतल्यापासून ते ’मोटोव्लॉगर’ किताब जिंकेपर्यंतचा विशाखाचा हा प्रवास अत्यंत प्रेरणादायी आहे. विशाखा सहा वर्षांची असल्यापासूनच तिला दुचाकींचं भारी आकर्षण. त्यामुळे लहानपणीच तिने सायकल चालवायला सुरुवात केली. त्यानंतर १२वर्षांची असताना विशाखाने चक्क पहिल्यांदा आपल्या वडिलांच्या स्कुटरला किक मारली आणि वयाच्या १४व्या वर्षी ती ’होंडा पॅशन’ ही बाईक चालवायला सुरुवात केली आणि तिची हीच जिद्द आज तिला एक वेगळे ओळख देऊन गेली. विशाखाच्या नावे ’इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स’मध्ये दोन सर्वोच्च विक्रमांची नोंद आहे, ज्यात बंगालचा उपसागर पार करणारी पहिली महिला रायडरचा किताब आहे आणि अंदमान बेटांचा प्रवास करणार्‍या महिला रायडरचा विक्रमदेखील आहे.

पायोनियरच्या भारताची पहिली महिला ’मोटोव्लॉगर’ होण्याचा मान विशाखाने पटकाविला आहे. 2017 मध्ये युट्यूबवरून तिचा प्रवास तिने व्लॉगिंगकडे वळविला. ’राईड गर्ल विशाखा’ नावाचे तिचे पेज प्रसिद्ध आहे. सध्या विशाखाचे साडेतीन लाखांहून अधिक फॉलोवर्स आहेत. बाईकच्या या तिच्या छंदासाठी, तिला आईकडून भरपूर प्रोत्साहन मिळाले. खरंतर ‘स्टंट बाईकिंग’मध्ये मुली फारशा दिसत नाहीत. कारण, हा प्रकार करताना अपघात होण्याची शक्यता जास्त असते. पण, विशाखाला मात्र तेच आवडतं. विशाखाच्या साहसकथा अंगावर अक्षरश: रोमांच उभ्या करणार्‍या आहेत. त्याशिवाय विशाखा ’सोलो बाईक रायडिंग’ देखील करते आणि त्या माध्यमातून सामाजिक संदेश, जनजागृतीचा तिचा प्रयत्न असतो. याचवर्षी मार्चमध्ये विशाखाने ’स्वच्छ भारत’ या उपक्रमाअंतर्गत ’नर्मदा परिक्रमा’ पूर्ण केली. ज्यात आठ दिवसांपेक्षा अधिक काळ पर्वत आणि गावागावांतून प्रवास करत तिने नर्मदा परिक्रमा पूर्ण केली. मध्य भारतातील मैकल टेकड्यांमधून उगम पावणार्‍या नर्मदा नदीविषयी तेथील रहिवाशांना जागरूक करणे, हा तिच्या या प्रवासामागचा उद्देश होता.


विशाखा सांगते, “नर्मदा परिक्रमेदरम्यान मला काही काळ थांबून आराम करणे आवश्यक होते. पण, या प्रवासात मला मला तीन हॉटेल्सने वास्तव्यास नकार दिला. कारण काय तर, मी एक महिला सोलो बाईक रायडर होते. यावरून मला त्यांच्या संकुचित विचारसरणीचा प्रत्यय आला. परंतु, त्यानंतर मी एका घरात आश्रय घेतला.” एका रात्री गावातील एकमेव अशा हॉटेलने विशाखाला राहाण्यासाठी नकार दिल्यानंतर तिने या परिस्थितीवर इन्स्टाग्रामवर लाईव्ह येत खरमरीत भाष्य केले. त्यानंतर तिच्या अनेक फॉलोवर्सने तातडीने हॉटेलला नकारात्मक रेटिंग करणे सुरू केले. तेव्हा आपल्याला सोशल मीडियाची खरी ताकद अनुभवायला मिळाल्याचे विशाखा सांगते.




विशाखा म्हणते की, “आज महिलांना त्यांची खरी ताकद जगाला दाखवून देण्याची गरज आहे. त्यांनी स्वबळावर स्वतःला सिद्ध करणे आवश्यक आहे. त्यासाठी त्यांना योग्य मार्गदर्शन मिळणे गरजेचे आहे.” विशेषत: मध्य प्रदेशात महिला सोलो बाईक रायडर्सकरिता पुरुषांच्या तुलनेत फारसे कार्यक्रम, स्पर्धा आयोजित केल्या जात नाहीत. ही मानसिकता बदलण्याची गरज असल्याचे विशाखा सांगते. तसेच ती सध्या १० मुलींना 'मोटोव्लॉगिंग'ची कला शिकवण्याच्या प्रकल्पात कार्यरत आहे. ज्यात १९वर्षांच्या सर्वात लहान मुलीसह, सहा मुलींची निवड करण्यात आली आहे आणि सध्या आणखी चार मुलींची निवड केली जात आहे. तिचे सुरुवातीचे दिवस आठवताना विशाखा सांगते की, मोटोव्लॉगिंगवर सर्वाधिक वर्चस्व पुरुषांचे असून तिच्या या कामाचे फारसे स्वागत होत नव्हते. जेव्हा ती सहकार्याची विनंती करायची, तेव्हा ते काहीतरी कारण सांगून तिचे काम पुढे ढकलायचे. तथापि, आज वेळ बदलली आहे. विशाखाने ’सॅमसंग’, ’रायनॉक्स’, ’मामा अर्थ’ आणि ‘रॉयल एनफील्ड’ सारख्या मोठ्या ब्रँड्सबरोबर काम केले आहे.


आंतरराष्ट्रीय बिझिनेस, मार्केटिंग आणि फायनान्स या विषयात ‘ड्युअल स्पेशलायझेशन’सह एमबीए पदवीधर असणार्‍या विशाखाने दहावीच्या वर्गात शिकत असताना एका बेकरीत कॅशियर म्हणून काम केले. तिचे ध्येय आणि जिद्दीच्या जोरावर ‘मान्सून स्कूटर रॅली’सारखे अनेक साहसी प्रवास केले आहेत. याबद्दल बोलताना विशाखा सांगते की, “मला हे करताना खूप मजा येते. आनंद वाटतो. मी कितीही आजारी असेन तरी दिवसातून एकदा बाईकवर चक्कर मारल्याशिवाय मला बरंच वाटत नाही. अगदीच काही नाही, तर मी गाडीला किक मारून तरी परत येतेच.” अशा या साहसी लेडी बाईक रायडरच्या जिद्दीला दै.‘मुंबई तरुण भारत’चा सलाम!
@@AUTHORINFO_V1@@