एक ध्यासवेडा भाषातज्ज्ञ : अरुण फडके

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    23-May-2020
Total Views |

phadke arun_1  
‘शुद्धलेखन हा आग्रह न राहता ती सवय झाली पाहिजे,’ असा आग्रह धरणारे व प्रत्यक्ष कृतीद्वारे आयुष्यभर कार्यरत राहणारे अरुण फडके नुकतेच अनंताच्या प्रवासाला निघून गेलेत. मराठी भाषा, तिचे सौंदर्य अधिकाधिक शुद्ध व स्वच्छ असावे म्हणून फडके प्रयत्नशील होते. त्यांच्या स्मृतींना आणि कार्यांना उजाळा देणारा हा लेख...


मूळ ठाण्याच्या असलेल्या फडकेंनी वडिलांचा पारंपरिक मुद्रणव्यवसाय सुरुवातीस सांभाळला. त्यांना भाषेची गोडी लागली. प्रत्येक शब्द, वाक्य, लिखाण शुद्धलेखनाच्या नियमानुसार शुद्ध असले पाहिजे, याकडे त्यांचा कल वाढला. त्यामुळे त्यांचा अभ्यास ते करू लागले. मुद्रणव्यवसायातील नवीन तंत्रदेखील त्यांनी आत्मसात केली. मात्र, शुद्धतेचा वसा त्यांनी सोडला नाही. किंबहुना, तो अधिक परिपक्व होण्यासाठी प्रयत्न करीत राहिले. यातूनच हा शुद्धलेखनाचा परिपाठ असण्यापुरता मर्यादित न ठेवता तो इतरांपर्यंत पोहोचला पाहिजे म्हणून ते आग्रही राहिले, कृतिशील राहिले; आपल्या अभ्यासाला लिखाणाची जोड दिली. त्यांनी ‘शुद्धलेखन ठेवा खिशात’ हा दैनंदिन वापरातील ११,००० शब्दांचा कोश तयार केला. सर्वसामान्य अभ्यासकासाठी ‘मराठी लेखन कोश’, ‘शुद्धलेखन मार्गप्रदीप’, ‘मला मराठी शिकायचंय’, ‘सोपे मराठी शुद्धलेखन’ अशी पुस्तके त्यांनी लिहिली आहेत. केवळ लिखाणाला पुस्तकाद्वारे मर्यादित न ठेवता, महाराष्ट्रात अनेक ठिकाणी ३००हून अधिक व्याख्याने दिली. प्रात्यक्षिकांसह लोकांमध्ये शुद्धलेखनाची, शुद्ध बोलण्याची गोडी निर्माण केली. व्याख्यानाबरोबर अनेक ठिकाणी परिसंवाद, शुद्धलेखनासंदर्भात कार्यशाळा घेतल्या. त्यांचा भाषणाचा विषय असे, ‘चकवा शब्दाचा, मैत्री शुद्धलेखनाशी.’ यावर तासन्तास बोलणारे फडके महाराष्ट्रातील कोणत्याही ठिकाणाहून आलेले निमंत्रण स्वीकारत लोकांपर्यंत जात व अधिकाधिक लोकांपर्यंत हा शुद्धलेखनाचा ठेवा त्यांनी पोहोचवण्याचे कार्य केले. अनेक अभ्यासकांच्या शंकांचे समाधान ते करीत असत. एखादा शंका विचारतोय, याचा अर्थ त्याला या विषयाची गोडी आहे, असे जाणून ते मार्गदर्शन करत राहिले. कार्यशाळेच्या माध्यमातून त्यांनी अनेक विद्यार्थी घडवलेच. मागील वर्षीच्या ऑगस्ट महिन्यात तब्येत फारशी ठीक नसतानादेखील त्यांनी नाशिक येथे संपादन आणि मुद्रितशोधनाची कार्यशाळा घेतली. सहा दिवस चालणार्‍या कार्यशाळेत अभ्यासकांना शुद्धलेखनाच्या नियमाबरोबर संपादकीय, मुद्रितशोधन यावर मार्गदर्शन केले. “याविषयीची एक नवीन दृष्टी, भाषेचं सौंदर्य जपण्याची कला आम्हाला फडके सरांनी शिकवली,” हे आवर्जून त्यातील अभ्यासक सुषमा देशपांडे, सौ. व श्री. संजय परांजपे इ. सांगतात. अशा अनेक कार्यशाळा असून जनतेत त्यांनी भाषेविषयी जागरुकता निर्माण केली.


२०१६ साली ज्योती स्टोअर्स, नाशिक आयोजित ‘लेखक तुमच्या भेटीला’ या कार्यक्रमात ‘मराठी भाषा आणि शुद्धलेखन’ या विषयावर बोलण्यासाठी अरुण फडके आले असता, शुद्धलेखनाच्या नियमानुसार मराठी भाषेतील सौंदर्य किती सहजगत्या आपल्याला मांडता येते, याचा सुंदर परिपाठ त्यांनी आपल्या व्याख्यानातून नाशिककरांना दिला. “संयोजकांनी उच्चारलेला ‘सुस्वागतम्’ हा पहिला शब्दच योग्य नाही. सुरुवातीचे स्वागत हे फक्त ‘स्वागतम्’ असेच म्हणायला हवे,” असे सांगून या शब्दाच्या मूळ घटकापासून शब्द कसा बदलत गेला, यावरील त्यांचे भाष्य अतिशय रंजक होते. पण, त्यामुळे फडक्यांचा या विषयावरचा अभ्यास किती खोलवर आहे, याची जाण श्रोत्यांना झाली. दीड ते दोन तासांच्या व्याख्यानात दैनंदिन जीवनातील कितीतरी शब्द आपण चुकीचे बोलतो, उच्चारतो याची जाणीव सहज सोप्या शब्दांतून त्यांनी करून दिली. त्यांच्या या अभ्यासू व संशोधकीय वृत्तीमुळेच महाराष्ट्र शासनाच्या मराठी विश्वकोश निर्मिती मंडळावर २०१५ ते २०१९ या काळात ते सल्लागार समितीवर कार्यरत होते. महाराष्ट्रातील अनेक संपादक व मुद्रितशोधकदेखील त्यांच्या शब्दकोशांचा संदर्भग्रंथ म्हणून वापर करतात. तसेच महाराष्ट्रातील अनेक वृत्तपत्रसमूहात संपादक आणि मुद्रितशोधक यांच्यासाठीही त्यांनी कार्यशाळा घेतल्या होत्या. महाराष्ट्र शासनाच्या पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळालादेखील त्यांनी शुद्धलेखन हे प्रत्येक वर्गाच्या अभ्यासक्रमात असणे तसेच गद्य, पद्य, व्याकरण आणि शुद्धलेखन या चारही अंगांना जोपर्यंत अभ्यासात समान दर्जा आणि प्रश्नपत्रिकेत समान गुणसंख्या दिली जात नाही, तोपर्यंत विद्यार्थ्यांचा भाषेचा विकास परिपूर्ण होणार नाही, असे आग्रही मत त्यांनी नोंदविले होते. अभ्यासक्रमातील हा बदलच विद्यार्थ्यांच्या बोलीभाषेवर, उच्चारावर अधिक परिणाम करणारा आहे, असे त्यांचे ठाम मत होते.


आपल्या धाकट्या बंधूंसमवेत ठाण्याला ‘अंकूर प्रकाशना’च्या माध्यमातून त्यांनी अनेक पुस्तके प्रकाशित केली. गेल्या पाच-सात वर्षांपासून ते नाशिकला स्थायिक झालेले होते. मधल्या काळात कर्करोगाने त्यांना ग्रासले तरीदेखील स्वतःच्या इच्छाशक्तीच्या जोरावर रोगाला थोपवीत महाराष्ट्रात शुद्धलेखन प्रसाराचे काम त्यांनी चालूच ठेवले होते. आपल्याकडे अगदी शालेय शिक्षणापासून ते महाविद्यालय आणि पुढे पीएच.डी. परीक्षेपर्यंत मराठी भाषा शिकवली जाते, अभ्यासली जाते. मात्र, मराठी भाषा शुद्ध कशी लिहावी, याचा परिपाठ तेवढा नीटसा दिला जात नाही. अनेक प्राध्यापक पदवीधारकांनादेखील एखादा १०-२० ओळींचा परिच्छेददेखील शुद्ध लिहिता येत नाही. याचे कारण योग्यवेळी शुद्धलेखनाचा न झालेला अभ्यास, याची फडके यांना कायमच खंत होती. आपल्या लिखित पुस्तकांच्या माध्यमातून ते अनेकांपर्यंत पोहोचले आहेत. असे भाषेवर आत्यंतिक प्रेम करणारे, प्रत्येक मराठी माणसाने बोलणे व उच्चारणे शुद्ध असावे, अशी अपेक्षा बाळगणारे व त्यासाठी आयुष्यातील अनेक वर्षे खर्ची घालणारे मराठी भाषेचे एक व्यासंगी अभ्यासक व मराठी प्रवाहातील कार्यकर्ते अरुण फडके अनंताच्या प्रवासाला निघून गेले आहेत. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली!
अरुण फडके यांना प्राप्त झालेले पुरस्कार
‘मराठी लेखन कोश’ या ग्रंथाला अनेक पुरस्कार लाभले. त्यापैकी काही-
* महाराष्ट्र शासनाचा ना. गों. नांदापूरकर पुरस्कार
* ठाणे मराठी ग्रंथसंग्रहालयाचा वा. अ. रेगे वाङ्मयीन पुरस्कार
* मराठी अभ्यास परिषद, पुणे यांचा महाबँक पुरस्कार
* सांगाती साहित्य अकादमी, बेळगाव यांचा कुसुमाग्रज पुरस्कार
* मराठी भाषा प्रचारक म्हणून २००८चा सन्मित्रकार स. पां. जोशी पुरस्कार
* मराठी ग्रंथजगतात भरीव कामगिरी केल्याबद्दल मुंबई मराठी साहित्य संघाचा २०१०चा केशवराव भिकाजी ढवळे पुरस्कार
- वसंत खैरनार
@@AUTHORINFO_V1@@