चोर तो चोर वर शिरजोर

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    11-May-2020
Total Views |


umar akmal_1  H



पाकिस्तानचा अष्टपैलू खेळाडू उमर अकमलवर तीन वर्षांची बंदी घालण्यात आली आहे. अकमलने क्रिकेटच्या अनेक सामन्यांदरम्यान भ्रष्टाचार केल्याची अनेक प्रकरणे गेल्या वर्षभरात उघडकीस आल्यानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने ही कारवाई केली. आपल्या देशात दहशतवाद पोसत पाकिस्तानने जसे काळे कारनामे केले, तशीच काही वाईट कृत्ये पाकच्या खेळाडूंनी भ्रष्टाचाराच्या माध्यमातून सुरू ठेवली आहेत. आपल्याला सामन्यांदरम्यान झेल सोडण्यासाठी आणि मुद्दामहून बाद होण्यासाठी अनेकदा बुकीजने पैसे दिल्याचे उमर अकमलने जाहीरपणे सांगितले. उमर अकमलच्या या वागण्यामुळे पाकिस्तानचा खरा चेहरा पुन्हा एकदा जगासमोर आला. भ्रष्टाचार, सामना निश्चिती, स्पॉट फिक्सिंग आदींसारख्या गैरव्यवहाराच्या प्रकरणांमुळे नाव खराब करून घेणे, ही काही पाकिस्तान क्रिकेट बोर्डाची पहिली वेळ नाही. याआधीही पाकच्या अनेक खेळाडूंमुळे क्रिकेटचे जगत बदनाम झाले आहे. उमर अकमलवर तीन वर्षांची बंदी आणत पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने आपण कारवाई करत असल्याचा दिखावा केला. मात्र, केवळ तीन वर्षांची कारवाई ही पुरेशी नसल्याची ओरड जगभरातून झाल्यानंतर पाकिस्तानने अकमलवर आजीवन बंदी घालण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने सांगितले. बोर्डाने आजीवन बंदी घातल्यास आपले क्रिकेट करिअरच संपण्याच्या भीतीने उमरनेही बोर्डाला अडचणीत आणणारी खेळी केली. आपल्याला भेटलेल्या बुकीज, आणि फिक्सर्सची नावे आपण जाहीर करण्यास त्याने इन्कार केला. मात्र, अकमलचे हे वागणे पूर्णपणे चुकीचे आहे, असे मत क्रिकेट समीक्षकांचे आहे. असे वागणे म्हणजे ‘चोर तर चोर वर शिरजोरअशा पद्धतीचे असल्याचे मत समीक्षक नोंदवतात. अकमलने जर नावेच जाहीर केली नाही, तर या सर्व भ्रष्टाचारांच्या प्रकरणांची चौकशी कुठल्या आधारावर करणार? याचा खुलासा काही पाकिस्तानने अद्याप केलेला नाही. नुसती कागदोपत्री चौकशी करून काय उपयोग? पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने या सर्व प्रकरणाच्या मुळाशी जाणे गरजेचे असून क्रिकेट जगतात भ्रष्टाचार आणि फिक्सिंगचे विष पेरणार्‍यांना कायमचा धडा शिकवला पाहिजे, असे मत जगभरातील क्रिकेटतज्ज्ञांनी नोंदवले आहे.

अखेर मिरची झोंबलीच!


उमर अकमलने जाहीर आरोप केल्यानंतरही पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने केवळ तीन वर्षांच्या बंदीची शिक्षा त्याला सुनावल्यानंतर जगभरातील क्रिकेटप्रेमींनी याबाबत नाराजी दर्शवली. फिक्सिंगसारख्या गंभीर प्रकरणात नाव आल्यानंतरही पाकिस्तान क्रिकेट बोर्ड आपल्या खेळाडूंना वाचविण्याचाच अधिक प्रयत्न करत असल्याची टीका पाकिस्तानवर जगभरातून केली जात आहे. मात्र, वारंवार अशा प्रकरणांना सामोरे जाणार्‍या पाकिस्तानला याची लज्जा, शरम काहीच नाही. टीका करूनही पाकिस्तानला काहीच फरक पडत नसल्याचे लक्षात येताच काही नेटीझन्सनी पाकिस्तानने फिक्सिंग प्रकरणात कारवाई करताना भारताचा आदर्श घ्यावा, असे झोडपताच पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला मिरची झोंबलीच. उमर अकमलवर कायमची बंदी घालण्याच प्रस्ताव आमच्याकडे असल्याचे सूतोवाच पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने अखेर केलेच. बोर्ड आपल्याविरोधात भूमिका घेत असल्याचे कळताच उमर अकमलनेही फिक्सर्स आणि बुकीजची नावे जाहीर करण्यास नकार देत बोर्डाला अडचणीत आणले. त्यामुळे पाकिस्तान क्रिकेट बोर्ड पुढे काय भूमिका घेणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. नेटीझन्सने भारताचा आदर्श घेण्याचा सल्ला देताच पाकिस्तानने याबाबत पुढची पावले टाकली. मात्र नेटीझम्नचे हे म्हणणे अगदी बरोबर असल्याचे सांगत क्रिकेट समीक्षकांनीही नेटीझम्नची पाठराखण केली. दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या सामन्यादरम्यान जेव्हा मोहम्मद अझरुद्दीन, अष्टपैलू खेळाडू अजय जडेजा, यष्टीरक्षक नयन मोंगिया आणि अन्य काही खेळाडूंची नावे चर्चेत राहिल्यानंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने कठोरात कठोर कारवाई करण्याचा निर्णय घेतला. या फिक्सिंग प्रकरणानंतर हे सर्व खेळाडू क्रिकेटच्या मैदानापासूनही दूर राहिले. इतकेच नव्हे तर आयपीएलमधील स्पॉट फिक्सिंग प्रकरणानंतर जलदगती गोलंदाज एस. श्रीसंत, फिरकी गोलंदाज अंकित चंडेला आणि अमित चव्हाण या खेळाडूंवरही भारताने कठोर कारवाई केली. त्यामुळेच आजतागायत या खेळाडूंचा क्रिकेटच्या मैदानाशी काही संबंध आला नाही. मात्र पाकिस्ताने तसे काही केले नाही. ज्या ज्या खेळाडूंवर भ्रष्टाचार, आणि फिक्सिंग केल्याचे आरोप झाले, त्या सर्व खेळाडूंना पाकिस्तानने कालांतराने आपल्या संघात स्थान दिले. अगदी उदाहरण घ्यायचेच झाले तर तेज गोलंदाज मोहम्मद आमिरचे उदाहरण याठिकाणी योग्य म्हणावे लागेल. आमिरने स्पॉट फिक्सिंगची कबुली स्वतः दिल्यानंतरही पाकिस्तानने सहा वर्षांनंतर का होईना, पण पुन्हा त्याला आपल्या संघातून खेळण्याची संधी दिली. त्यामुळेच नेटीझन्सनी पाकिस्तानला भारताकडून आदर्श घेण्याचा सल्ला दिला.
 

- रामचंद्र नाईक

@@AUTHORINFO_V1@@