गेले सेवक कुणीकडे...?

    30-Apr-2020   
Total Views | 52


cartoons_1  H x


समाजव्यवस्था ठप्प झाली आहे. मात्र, नागरिकांच्या सेवेसाठी, नागरिकांनी आपल्यातील जे नगरसेवक निवडून दिले आहेत ते सध्या कोठे आहेत, असाच प्रश्न सध्या नाशिकमधील काही प्रभागातील नागरिकांना सतावत आहे.


देशाच्या विकासात स्थानिक स्वराज्य संस्थांचे योगदान हे निश्चितच महत्त्वाचे आहे. भारतासारख्या खंडप्राय देशात विकास आणि नागरिकांना सुसह्य जीवनमान व्यतीत करता यावे, यासाठी खेडे, शहरे येथे असणार्‍या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सेवकाकडे तेथील नागरिक मोठ्या आशेने पाहत असतात. आज कोरोनासारखे आरोग्याचे संकट उभे ठाकले आहे. अशा वेळी समाजव्यवस्था ठप्प झाली आहे. मात्र, नागरिकांच्या सेवेसाठी, नागरिकांनी आपल्यातील जे नगरसेवक निवडून दिले आहेत ते सध्या कोठे आहेत, असाच प्रश्न सध्या नाशिकमधील काही प्रभागातील नागरिकांना सतावत आहे. आपला नगरसेवक किती कार्यक्षम आहे, भाऊंची वट किती आहे, भाऊंना विकासाचा किती ध्यास आहे, वॉर्डप्रमाणे देश आणि राज्य विकसित होण्यासाठी भाऊंची दूरदृष्टी किती महत्त्वाची आहे, आदीसारख्या नगरसेवकांच्या व्यक्तिमत्त्वाचे दर्शन घडविणार्‍या गुणांचे दर्शन वॉर्डातील नागरिकांना लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या दरम्यान झाले. मात्र, अगदी आत्ता आतापर्यंत कार्यसम्राटअसणारे आपके नगरसेवक सध्या कुठे गेले आहेत, त्यांचे कार्य नेमके काय आणि कुठे चालू आहेस हाच प्रश्न नागरिकांना भेडसावत आहे.



भाऊ नाहीतर नाही
, मात्र प्रत्येक भागात असणारे भाऊंचे स्तुतिपाठकदेखील आता गायब असल्याने नगरसेवक दादांच्या कार्यसम्राटया उपाधीबद्दल आता नागरिक शंका उपस्थित करत असल्याचे चित्र नाशिकमध्ये दिसून येत आहे. कोरोनामुळे जेव्हा संचारबंदी लागू करण्यात आली, तेव्हा संचारबंदीच्या पहिल्या टप्प्यात अनेक नगरसेवकांनी आणि इच्छुकांनी आपल्या भागात औषध फवारणीचे वैश्विक कर्तव्य पार पाडले. मात्र, त्यात सेवाभावापेक्षा भविष्यातील निवडणूक विजयाचीच आखणी जास्त होती. तसेच, औषधांच्या गुणवत्तेची खात्रीही नव्हतीच. त्यामुळे नाशिक महापालिका आयुक्तांनी या हौसेस चाप बसवत औषध फवारणीचा अधिकार केवळ महापालिकेच्या हाती असल्याचे सांगितले. सामाजिक संकट असताना, प्रभागातील नागरिकांचे पालकत्व स्वीकारण्याचे दायित्व नगरसेवक निभावताना दिसत नसल्याची खंत आता नागरिक उघड उघड व्यक्त करत आहेत. त्यामुळे केवळ निवडणुका आणि निवडणूक काळात किंवा त्याच्या नजीकच्या काळात सामग्री वाटप करणार्‍या कार्यसम्राटांनी आपला सेवक धर्म निभवावा, किमान आपल्या मतदात्यांची चौकशी तरी करावी, अशी रास्त अपेक्षा नागरिकांची आहे.



समाजाने नाकारलेले समाजसेवक


एकीकडे निर्वाचित सेवक आपली भूमिका कशी निभावत आहेत, ते दिसत असतानाच नाशिक जिल्ह्यात समाजाने नाकारलेले तृतीयपंथी हे सामाजिक सेवेतून आपला मानवधर्म जोपासत आहेत. सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनअसतानाच तृतीयपंथी नाशिक रोडच्या रस्त्यांवर खडा पहारा देताना दिसतात. तृतीयपंथीयांकडे समाजाचा बघण्याचा समाजाचा दृष्टिकोन नकारात्मक असला तरीही ते समाजसेवेत तत्परतेने उतरलेले दिसतात. विशेष पोलीस अधिकारी म्हणून नाशिक रोड पोलीस स्टेशन अंतर्गत नऊ तृतीयपंथीयांना नाशिक रोड परिसरात वाहतूक सुरक्षा जबाबदारी मिळाली आहे. त्यांच्याकडे समाज वेगळ्या नजरेने पाहतो. मात्र, तरीही ते सध्या नाशिक शहरात पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून आपले कर्तव्य बजावत आहेत. कोणतीही अपेक्षा न बाळगता, विना मोबदला हे तृतीतयपंथी सध्या लोकांची सेवा करीत असल्याने नाशिक शहरात हा सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. नाशिक रोड येथील किन्नर आखाडाच्या पायल नंदगिरी आणि त्यांचे सहकारी या मंगलमूर्ती सेवाभावी ट्रस्टच्यावतीने नाशिक रोड परिसरात तृतीयपंथीयांना घेऊन वाहतूक बंदोबस्त करीत आहे. किन्नर समूहाच्या प्रमुख पायल नंदगिरी यांनी आजपर्यंत अनेक हातावर पोट असलेल्या लोकांना अन्नधान्य व इतर मदत केलेली आहे. पोलीस बांधवांना सेवा बजावताना मदत व्हावी, या उदात्त हेतूने नाशिक रोड पोलीस स्थानकाअंतर्गत या तृतीयपंथीयांनी स्वयंस्फूर्तीने अर्ज करून सेवा करण्याची इच्छा दर्शवली. त्यांच्या इच्छेला नाशिक रोड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सूरज बिजली यांनीही सकारात्मकता दर्शवून तृतीयपंथीयांना रस्त्यावर लोकांची सेवा करण्याची संधी दिली आहे.



तृतीयपंथीयांकडे पाहून आजही लोकं नाक मुरडतात
, त्यांना घाबरतात. मात्र, “आम्हीही देशाची सेवा करू शकतो, हे आम्हाला या कृतीतून दाखवून द्यायचे आहे. या माध्यमातून किन्नर समाजाकडे लोकांचा पाहण्याचा दृष्टिकोन सकारात्मक होऊन किन्नर समाजाच्या मुख्य प्रवाहात येण्यासाठी आम्ही सध्या पोलिसांच्या खांद्याला खांदा देऊन विशेष पोलीस अधिकारी म्हणून काम करीत आहोत,” अशी भावना हे तृतीयपंथीय व्यक्त करतात. सातत्याने ज्यांची समाजात हेळसांड होते, असे तृतीयपंथी समाजसेवेसाठी मैदानात उतरले आहेत, तर दुसरीकडे समाजाने स्वीकारलेले, निवडून दिलेले मानाने पदाधीन काही नगरसेवक मात्र लुप्त आहेत.

प्रवर देशपांडे

दै. मुंबई तरुण भारतमध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत. एम. ए  (राज्यशास्त्र आणि आंतरराष्ट्रीय संबंध), एलएल. बी. पर्यंत शिक्षण, राष्ट्रीय नेमबाज, नाशिक येथे विविध महाविद्यालयात Resource Person आणि अधिव्याख्याता म्हणून कार्यरत. JNU-दिल्ली येथील इंडिया फ्युचर ग्रुपशी संलग्न, याचबरोबर नाशिक येथे विविध दैनिकात पत्रकारितेचा सात वर्षांचा अनुभव.

अग्रलेख
जरुर वाचा
गिरीश महाजन यांच्यावर आरोप करता, हे योग्य नाही - चंद्रशेखर बावनकुळे यांचा एकनाथ खडसे यांना सल्ला

गिरीश महाजन यांच्यावर आरोप करता, हे योग्य नाही - चंद्रशेखर बावनकुळे यांचा एकनाथ खडसे यांना सल्ला

राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्याबाबत एकनाथ खडसेंनी केलेले वक्तव्य हे त्यांचं टार्गेटिंग असून त्यांच्या प्रतिमेला गालबोट लावण्याचा प्रयत्न आहे. फक्त संबंध असल्याचा अर्थ हा गुन्हा केला असे होत नाही. माझेही अनेकांसोबत संबंध आहेत, पण त्याचा अर्थ मी काही गैर केले असे होत नाही. माझा खडसेंना सल्ला आहे,तुम्ही सतत गिरीश महाजन यांच्यावर आरोप करता, हे योग्य नसल्याचे मत राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केले. राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे नागपुरात प्रसार माध्यमांशी बोलत ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121