पर्यावरण सजगता वाढविणारे ‘कारवी’

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    14-Feb-2020   
Total Views |

godechya kathi_1 &nb





शहरी आणि ग्रामीण जीवनमानात ग्रंथालये ही अनेक ठिकाणी उभी राहिल्याचे दिसून येते. मात्र, केवळ पर्यावरण, निसर्ग, वनसंपदा, पशु-पक्षी यांना केंद्रस्थानी ठेऊन ग्रंथालय उभे करणे, हे जरा हटकेच आहे. नाशिकची ओळख द्राक्षे, चिवडा, कवी कुसुमाग्रज, नाटककार वसंत कानेटकर आणि इतर अनेकार्थाने आपणा सर्वांना आहेच. मात्र, पर्यावरण आणि निसर्ग यांची शास्त्रीय माहिती उपलब्ध करून देणारे ग्रंथालय ‘कारवी’ या नावाने नाशिकमध्ये वाचक सेवा देत आहे. याच ग्रंथालयाचा घेतलेला मागोवा खास आपल्यासाठी....

नाशिकमध्ये वास्तव्यास असलेल्या अजित व मनीषा बर्जे या दाम्पत्याने ‘कारवी रिसोर्स’ ग्रंथालयाची रचना केली आहे. उपभोगवादापासून आपण दूर गेल्यास पर्यावरणरक्षण आणि संवर्धन होण्यास नक्कीच चालना मिळेल, ही या दाम्पत्याची धारणा. ग्रंथालयाच्या नावातच त्याचे कार्य सामावले आहे. ‘कारवी’ हे एक फूल असून या फुलाची वनस्पती संपूर्ण सह्याद्रीमध्ये आढळते. तसेच हे फूल सात वर्षांनी फुलते. कारवी वनस्पतीच्या काड्यांना कीड लागत नाही. तसेच त्या सरळ असतात. बहुआयामी वैशिष्ट्य असणार्‍या या वनस्पतीत औषधी गुणदेखील आढळून येत असतात. तसेच, कारवी ग्रंथालय साहित्यरूपी सामग्री उपलब्ध करून देत पर्यावरण संवर्धनासाठी सरळ मार्ग उपलब्ध करून देण्यात मोलाची भूमिका बजावत आहे. तसेच, पर्यावरण र्‍हासास कारणीभूत असणारी उपभोगवादाची कीड आपल्याला लागू नये म्हणूनदेखील या ग्रंथालयाची असणारी भूमिका महत्त्वपूर्ण आहे. त्यामुळेच या ग्रंथालयाच्या नावातच या ग्रंथालयाचे कार्य सामावले आहे, असे वाटते.


या ग्रंथालयाचे वेगळेपण म्हणजे येथे निसर्ग व पर्यावरणविषयक पुस्तके, संदर्भग्रंथ यांचा खजिना दडलेला आहे. त्याचबरोबर माणूस घडविणारी इतर पुस्तकेदेखील येथे पाहावयास मिळतात. पर्यावरणविषयक पुस्तकात ‘ड्रॅगन फ्लाईझ ऑफ इंडिया’, ‘द बुक ऑफ इंडियन शेल्स’, ‘सॉईल अ‍ॅण्ड वॉटर कन्झर्व्हेशन रिसर्च इन इंडिया’, ‘इन्व्हायर्नमेंटल लॉ अ‍ॅण्ड पॉलिसी इन इंडिया’, ‘महाराष्ट्रातील संकटग्रस्त पक्षी’, ‘वेल महावेल’, ‘औषधी वनस्पती गॅझेटर’, ‘आपली सृष्टी आपले धन’ यांसारखी अनेक पुस्तके आहेत. एकाच छताखाली ५५० पेक्षा जास्त पर्यावरण पुस्तकांची मांदियाळी वाचकांसाठी येथे उपलब्ध आहे. या ग्रंथालयाच्या निर्मितीमागील उद्देश आणि प्रवास याबाबत माहिती देताना बर्जे सांगतात की, “आम्ही १७ ते १८ वर्षे मुद्रण क्षेत्रात कार्यरत होतो.” याच काळात पर्यावरणविषयक तज्ज्ञांचा सहवास त्यांना प्राप्त झाला. त्यात मुख्यत्वे कुडावळेचे दिलीप कुलकर्णी, नाशिक येथील मानद वन्यजीव संरक्षक बिशवरूप रहा, नेरळ येथील भारतातील पहिली कृषी पर्यटन संकल्पना रुजविणारे चंद्रशेखर भडसावळे आदींचा सहवास आणि अभ्यासपूर्ण मार्गदर्शनामुळे निसर्गभान जागृत होण्यास मदत झाली. खर्‍या अर्थाने पर्यावरणाच्या प्रश्नांची जाण आली. वृक्षसंवर्धन, लागवड, प्लास्टिकमुक्ती, पाण्याचा अपव्यय टाळणे हे पर्यावरणाचे साधे प्रश्न आहेत. याबाबत कार्य करून आपण सर्वच पर्यावरणाच्या अनेक समस्यांपैकी फारच थोड्या भागाला स्पर्श करतो, असे बर्जे आवर्जून नमूद करतात तर पर्यावरणाच्या र्‍हासाचे मूळ कारण हे उपभोगवाद असल्याचे या काळात त्यांना समजले. याचे उत्तर गरजा कमी करणे, हेच असल्याचे त्यांना जाणीव झाली. व्यक्तीने आर्थिक आवक कमी केल्यास गरजा नियंत्रित होऊ शकतात, त्यामुळे उपभोगवादापासून दूर जाण्यासाठी स्वतःच्या जीवनशैलीत आपण बदल केल्याचे बर्जे सांगतात.


तसेच, ‘अण्णासाहेब भुस्कुटे विचारमंच’ या डोंबिवलीस्थित संस्थेने ‘आरोहण’ नावाचा महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी राज्याचा अभ्यास दौरा आयोजित केला होता. त्यात बर्जे पती-पत्नी हेमलकसा येथील प्रकाश आमटे यांच्या लोकबिरादरी प्रकल्पापासून ते देवरुख मातृ मंदिरपर्यंतचा दौरा त्यांनी केला. या दौर्‍यात सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, कृषी, औद्योगिक, संरक्षणविषयक क्षेत्राची सखोल माहिती झाली.


या दौर्‍यामुळे राज्याची समृद्धता आणि राज्यात कोणत्या ठिकाणी काय कमतरता आहेत, याचा जवळून अभ्यास करण्याची संधी मिळाली. यामुळे समाजभान जागृत झाले.


त्यानंतर कृषी क्षेत्रात बर्जे यांनी काही काळ व्यतीत केला. त्यानंतर प्रकृती आणि प्रवृत्ती यांना साजेसा आणि अभ्यासपूर्ण पर्यावरणविषयक जनजागृतीस हातभार लावण्याकामी कारवी ग्रंथालयाची उभारणी करण्यात आली असल्याची माहिती अजित बर्जे यांनी यावेळी दिली. कारवी ग्रंथालयाच्या माध्यमातून ४५० वाचक पर्यावरण आणि निसर्ग यांची माहिती विविध ग्रंथसंपदेच्या माध्यमातून घेत आहेत.


तसेच, ‘कारवी’च्या माध्यमातून पर्यवरणाचे विषय समजले, प्रबोधन करता आले, जीवनशैली सुधारून पर्यावरणमूलक जीवन कसे अंगीकारता येईल, याबाबत ‘कारवी’च्या माध्यमातून प्रबोधन करण्यात येत आहे. तसेच, ‘नेचर कन्झर्वेशन सोसायटी ऑफ नाशिक’च्या माध्यमातून निसर्गातील विविध घटक आणि त्यांचे पर्यावरणाचे महत्त्व याबाबतदेखील जाजागृती करण्यात येत असल्याचे बर्जे यांनी यावेळी सांगितले.


निसर्गातील डोंगर, नद्या, झाडे, प्राणी, वनस्पती, पक्षी म्हणजे संपूर्ण पर्यावरण नसून ते केवळ बाह्य पर्यावरण आहे. मानवाच्या अंतर्मनात पर्यावरण वसले आहे, कारण माणूस हा निसर्गाचा भाग आहे, मानवाचे अंतरभान जागृत करून त्याला पर्यावरणस्नेही बनविणे हाच दृष्टिकोन असून त्या दिशेने कार्य करण्याची उर्मी बर्जे दाम्पत्य उराशी बाळगून आहे.


समाजात उपभोग घेण्यासाठी शर्यत लागली आहे. त्यामुळेच खर्‍या अर्थाने पर्यावरणाचा र्‍हास होतो, बाह्य पर्यावरणाचा झालेला र्‍हास दिसून येत असला तरी, माणूस आतूनदेखील स्वतःपासूनच दूर जात आहे. विविध वस्तूंचा उपभोग घेऊनदेखील त्याला समाधान प्राप्त होत नाही. त्यामुळे कारवीमधील माणूस घडविणारी पुस्तके त्यास नक्कीच हातभार लावत आहेत. या ग्रंथालयात वय वर्षे ३ ते ८५ पर्यंतचे वाचक आहेत. तसेच पुस्तके ही घरपोच देण्याची सुविधा असल्याने वाचकस्नेही ग्रंथालय म्हणून कारवीची ओळख आहे.


निसर्गभान या ग्रुपच्या माध्यमातून शाश्वत जीवनशैली हा अभ्यासक्रमदेखील राबविला जातो. या माध्यमातून अन्न, माती, पाणी, ऊर्जा, पर्यटन, उपभोगवाद याची सविस्तर माहिती देऊन पर्यावरणाचे रक्षण कसे करावे आणि समस्या काय आहेत व उपाय काय आहेत, याबाबत माहिती दिली जाते. या उपक्रमास पुणे विद्यापीठाची मान्यता घेण्याचादेखील प्रयत्न सध्या चालू आहे. विशेष म्हणजे ‘कारवी’ ग्रंथालयातील कपाटे ही पुनर्वापरातील लाकडापासून बनविण्यात आली आहेत. यातून वृक्षसंवर्धनाचा संदेश देण्यात आला आहे. कागदी लॅम्पशेड, कारवी या वनस्पतीच्या लाकडापासून बनविलेली फ्रेम, येथील फर्निचरसाठी वापरण्यात आलेले सनमाईक हे बारदानचे आवरण असलेले आहे. पर्यावरणासंबंधी समस्या अनेक आहेत. मात्र, मुळापासून उपाययोजना करत नागरिकांत सजगता निर्माण करणे आवश्यक आहे. त्यासाठी आवश्यक असणारी ग्रंथसंपदा एकाच छताखाली उपलब्ध करून देत सजगता निर्माण करण्याचे कार्य ‘कारवी’च्या माध्यमातून केले जात आहे. त्यामुळे हे ग्रंथालय नक्कीच विशेष ठरते.


@@AUTHORINFO_V1@@