मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाणदिन अत्यंत साधेपणाने साजरा करण्यात येणार असला तरी मुंबई महापालिका प्रसासनाने जय्यत तयारी ठेवली आहे.कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी डॉ. बाबासाहेबांच्या अनुयायांनी आणि आंबेडकरी जनतेने चैत्यभूमीकडे न येता घरातूनच ऑनलाईन दर्शन घ्यावे असे आवाहन पालिका प्रशासन आणि महापरिनिरावाणदिन समन्वय समिती यांनी केले असले तरी उत्सवाच्या तयारीत मात्र कोणतीही कमतरता ठेवण्यात आलेली नाही.
चैत्यभूमीवर अशोकस्तंभाची डागडुजी आणि रंगरंगोटीची झाली आहे. गर्दी टाळण्यासाठी ऑनलाईन दर्शनाची सुविधा आहे. मात्र, शासकीय मानवंदना आणि हेलिकॉप्टर मधून पुष्पवृष्टी होणार आहे. तसेच या परिसरात सेनिटायझर फवारणी करण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली.डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त दरवर्षी राज्यासह देशभरातील कानाकोपऱ्यातून अनुयायी मुंबईत दाखल होतात. त्यांची गौरसोय होऊ नये यासाठी सुमारे चार दिवस आधीच शिवाजी पार्क मैदानात मंडप घातले जातात. त्यांना आवश्यक असलेल्या प्राथमिक सोयी-सुविधा पुरविल्या जातात. मात्र यंदा कोरोनाच्या सावटामुळे अनुयायींनी चैत्यभूमीवर येऊ नये, असे आवाहन महापालिकेसह विविध आंबेडकरी संघटनांनी केले आहे. या कार्यक्रमाचे ऑनलाईन प्रक्षेपण आणि ऑनलाई दर्शन करण्यासाठी यू-ट्यूब, फेसबूक, ट्विटर तसेच जाहिरातींद्वारे क्यू-आर कोड दिले जाणार आहे. त्यामुळे घरबसल्या अभिवादन करणे शक्य होणार आहे. तसेच दरवर्षी प्रमाणे यंदा चैत्यभूमी वास्तू, अशोकस्तंभ, तोरण प्रवेशद्वार येथे पुष्प सजावट केली करण्यात येत आहे. तसेच महत्त्वाच्या व्यक्तींसाठी नियंत्रण कक्ष उभारले आहेत. सुरक्षेसाठी अग्निशमन बंब, अति दक्षता रुग्णवाहिनी, ४ बोटी, जल सुरक्षारक्षक आणि साफ सफाईसाठी कर्मचारी वर्ग चौवीस तास तैनात असतील. तसेच चैत्यभूमी परिसरात पालिकेमार्फत सेनिटायझर फवारणी करण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनातर्फे देण्यात आली.
पत्र पाठवून अभिवादन करा!
महापरिनिर्वाणदिनानिमित्त चैत्यभूमीवर पत्र पाठवून अभिवादन करता येणार आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६४ व्या महापरिनिर्वाणदिनानिमित्त त्यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन, असा मजकूर लिहून नाव व पत्त्यासह चैत्यभूमी स्मारक, दादर पश्चिम मुंबई-४०००२८ या पत्त्यावर पोस्टाने पाठवावे, असे आवाहन विश्वशांती सामाजिक संस्थेने केले आहे.
‘ग्लोबल पॅगोडा’ बंद
महापरिनिर्वाण दिनानिमित्त ‘ग्लोबल पॅगोडा’ येथे मोठ्या संख्येने आंबेडकरी अनुयायी डॉ. आंबेडकर यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी येत असतात. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीची उपाययोजना म्हणून ५ ते ७ डिसेंबर दरम्यान ‘ग्लोबल पॅगोडा’ बंद ठेवण्यात येणार आहे. बंदच्या काळात येथे येऊ नये आणि कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी करण्यात येत असलेल्या प्रयत्नांना सहकार्य करावे, असे आवाहन महानगरपालिका उपआयुक्त विश्वास शंकरवार व ‘ग्लोबल पॅगोडा’चे प्रतिनिधी यांनी संयुक्तपणे केले आहे.