मंतरलेले पाणी एक थोतांड

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    18-Dec-2020   
Total Views |

Pope Francis_1  



पोप फ्रान्सिस यांनी दि. ९ डिसेंबर रोजी ख्रिस्ती बांधवांना संबोधित केले. ते म्हणाले की, “जेव्हा ख्रिश्चन प्रार्थना करतात, तेव्हा मृत्यू थरथर कापतो. कारण, आपल्या बापाने, जिजसने मृत्यूवर विजय मिळवला. त्यामुळे जिजसची प्रार्थना केली की, आपल्यापर्यंत येणारा मृत्यूही थरथर कापेल.”
 
आता पोपने ही वाक्यं म्हणणे हे निदान आपल्या भारतीयांसाठी तरी नवीन नाही. कारण, गल्लीबोळात हीच वाक्ये ऐकून कितीतरी भोळ्या लोकांनी धर्मांतर केले आहे. सध्याच्या काळात ज्याप्रमाणे मुस्लीम दहशतवाद्यांना जगाचे इस्लामीकरण करण्याचे वेड लागले आहे, तसेच काही शतकांमध्येपूर्वी या क्रुसेडवाल्यांना जगाचे ख्रिस्तीकरण करण्याचे वेड लागले होते.
 
 
जगाचे सोडा, भारतातले उदाहरण पाहू. भारतातील दुर्गम भागात छोट्या-छोट्या आजारांना घाबरून लोकांनी आपला मूळ धर्म सोडून ख्रिश्चन धर्म स्वीकारला. वनवासीबहुल क्षेत्रात आरोग्यसेवांची वानवा. त्यामुळे साध्या-साध्या आजारांवर उपचार मिळत नाहीत. अशावेळी पाण्यामध्ये औषधी गोळ्या मिसळून ते पाणी जिजसच्या प्रार्थनेचे आहे, असे सांगणारे काहीजण आजही आहेत. त्यामुळे हे पाणी पिऊन बरे वाटले की, लोकांना वाटायचे की खरेच या प्रार्थनेच्या पाण्यात दैवीशक्ती आहे.
 
 
त्यामुळेही कितीतरी जणांनी धर्मत्याग केला. झारखंड वगैरे वनवासीभागातील लोकांना सांगितले गेले की, अजूनही लंडनच्या राणी व्हिक्टोरियाचे राज्य आहे. राणी देवीच असते. त्यामुळे देवी ज्या देवाला मानते, तोच देव आपला असायला हवा. राणी व्हिक्टोरिया जिजसला मानते, त्यामुळे जिजसचीच पूजा केली पाहिजे, असे मानूनही धर्म सोडणारे आहेत. दूरचे कशाला, मुंबईच्या कांदिवली परिसरात पावसाळ्यात नेहमी पूरसदृश्य परिस्थिती यायची.
 
 
तेव्हा ज्यांच्या झोपड्या पाण्यात जायच्या, त्या काही निरक्षर गरीब लोकांना काही सधन दुमजली घरे असलेल्या लोकांनी सांगितले की, आम्ही ‘लॉर्ड’ची ‘प्रेअर’ करतो म्हणून आमची घरं पावसातही बुडत नाहीत. तुम्ही पण प्रार्थना करा. पोयसर नदीचे पाणी तुमच्या घरात येणार नाही. मग हे गरीब लोक काही दशकांपूर्वी धम्मवंदना सोडून ‘प्रेअर’ करू लागले. मात्र, सध्या कोरोनामुळे सगळ्यांचेच पितळ उघडे पडले आहे. त्यामुळे धर्मांतराचा बाजार भरवणार्‍यांचेही बाजार उठलेच आहेत.
 
नाताळची भेट म्हणून पोप फ्रान्सिस चर्चमधील हजारो सेवकांना दरवर्षी भेटवस्तू देतात. दरवर्षी सेवकांना चमकणारी वाईन त्यासोबत खास नाताळचा केक आणि भेटवस्तू दिली जाते. पण, यावर्षी पोप सेवकांना यापैकी काहीही भेटवस्तू देणार नाहीत. ते हजारो सेवकांना भेटवस्तू म्हणून गोळ्या, औषधांची पाकिटे देणार आहेत. यावर गल्लीबोळातले ते चर्च आठवले. ज्यांचे पाद्री लोकांना म्हणे प्रार्थनेचे मंतरलेले पाणी देतात आणि लोक बरे होतात.
 
दरवर्षी भारतातील मोठ्या शहरामध्ये नाताळच्या आसपास स्थानिक चर्चमध्ये कार्यक्रम आयोजित करतात. त्यामध्ये लोक येऊन सांगतात की, मला अमुक अमुक आजार होता, पण मंतरलेले पाणी प्यायलो आणि ठीक झालो. कुणी व्यक्ती कुबड्या घेऊन येते, तिला चालताही येत नाही. मात्र, या कार्यक्रमात येऊन पाद्रीने प्रार्थना म्हटल्या म्हटल्या ही व्यक्ती चालायला लागते. इतकेच काय भूतबाधा वगैरे वगैरे झालेल्यांना भूत सोडून देते.
 
पाद्री गरीब वस्त्यांमध्ये मंतरलेले पाणी देऊन लोकांना बरे करतो. असे असताना त्यांचे सर्वोच्च पोप फ्रान्सिस गोळ्या-औषधे का वाटणार आहेत? याचाच अर्थ असा की, ते प्रार्थनेचे मंतरलेले पाणी वगैरे सगळे गरीब जनतेला धर्मांतर करण्यासाठीचे थोतांड होते. याची प्रचिती कोरोना काळात जनतेलाआली. कोणीही पाद्री किंवा धर्मगुरू मंतरलेल्या पाण्याने कुणालाही कोरोनामुक्त करू शकला नाही. यातही कोणती श्रद्धा, कोणती अंधश्रद्धा या वादात पडायचेच नाही.
 
मात्र, तरीही चर्चमधल्या मंतरलेल्या पाण्याने जगभरातल्या अगणित लोकांना आपली मूळ श्रद्धास्थाने सोडून चर्चपूजक केले, हे सत्य आहे. स्वेच्छेने पूर्ण ज्ञानाने कुणी मूळ धर्म सोडला, तर त्याला स्वातंत्र्य आहे. पण जगभरातल्या धर्मांतराचे वास्तव हे नाही. या पार्श्वभूमीवर नाताळला पोप फ्रान्सिस आपल्या हजारो सेवकांना सर्व त्रासापासून वाचण्यासाठी चर्चमधले मंतरलेले पाणी नव्हेस तर औषध देणार आहेत. आता तरी मंतरलेल्या पाण्यासाठी धर्म बदलणार्‍या जगभरातील भोळ्या जनतेचे डोळे उघडणार आहेत का?



@@AUTHORINFO_V1@@