जीवनाची वाट वेडी...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    14-Dec-2020
Total Views |

mind _1  H x W:
 
 
 
 
प्रत्येकाची तणावजन्यता ही ज्याच्या त्याच्या व्यक्तिमत्त्वावर व झुंजण्याच्या क्षमतेवर अवलंबून आहे. काहींना आयुष्यातील कठीण गोष्टी ‘स्पीडब्रेकर’सारख्या वाटतात. त्यावरुन पार करुन गेलं की रस्ता कसा सुकर होतो.
 
 
 
तसे पाहिले तर तणाव हा आपल्या आयुष्याचा एक महत्त्वाचा भाग आहे. तणाव हा कधी कधी आपल्या उपयोगाचाही असतो. आपण आयुष्यात जेव्हा अटीतटीच्या प्रसंगात झुंजत असतो, तेव्हा त्यातून बाहेर येण्याची धडपडही आपण याच तणावामुळे करतो. ताण आला की, आपण परीक्षेत अभ्यास अधिक जोमाने करतो.
 
 
 
आपल्याला प्रमोशन मिळायला हवे यासाठी खटपट करतो. मॅरेथॉनमध्ये धावताना तणावामुळेच आपण शेवटचा टप्पा पूर्ण ताकदीने पार करतो. पण, तणाव सातत्याने राहिल्यामुळे आणि तो आपल्याबरोबर दीर्घकाळ वास्तव्य करतो. अतिशय गंभीरपणे असा येणारातणाव आपल्या व्यक्तिगत, कौटुंबिक, व्यावसायिक जीवनावर वा आरोग्यावर घातक परिणाम करतो.
 
 
 
जगातले जवळजवळ अधिकाधिक लोक आपल्या परिजनांशी आणि मित्रमंडळींशी तणावामुळे वाद घालतात, हुज्जत घालतात. जवळजवळ ७० टक्के लोक तणावाखाली असताना शारीरिक तक्रारी प्रत्यक्षात अनुभवतात. तणाव हा अनेक प्रकारच्या बाह्यकारणांनी येतो, तसाच तो माणसाच्या मनातूनही येतो. बर्‍याच जणांच्या बाबतीत लोकांना काम किंवा नोकरीचा तणाव अधिक प्रमाणात जाणवतो.
 
 
 
आपल्या व्यवसायात दु:खी असणे, कामाचा खूप व्याप असणे किंवा प्रचंड जबाबदारी डोक्यावर असणे, घातक परिस्थितीत काम करणं, कामावर कार्यालयीन सहकार्‍यांशी न पटणं, वरिष्ठांबरोबर समस्या असणं, कामावर अन्यायपूर्ण वातावरणातवावरणं किंवा अत्याचाराला सामोर जायला लागणं किंवा आपला विकास होईल, याची खात्री नसणं अशी अनेकविध कारणं माणसाच्या नोकरीमध्ये किंवा नोकरीनिमित्त तणाव निर्माण करु शकतात.
 
 
 
तसेच, आयुष्यातील अनेक घटनांनी व्यक्तीच्या जीवनात तणाव निर्माण होऊ शकतो. त्यामध्ये प्रिय व्यक्तीचा मृत्यू, आर्थिक समस्या, कर्ज, घराची समस्या, बेकारी किंवा नोकरी जाणं, दीर्घकालीन आजार, घरामध्ये आजारी व्यक्ती व नैसर्गिक आपत्ती हे सर्व माणसाच्या जीवनात घोर तणाव निर्माण करतात.
 
 
 
आपल्या अंतर्मनातून निर्माण होणार्‍या तणावांना जणू शेवट नसतो, असे कित्येक जणांना वाटते. त्यामध्ये मनात कसली तरी भीती आणि अनिश्चितता असणं हा कणकणणारा तणाव कित्येकांना नकोसा वाटतो. दहशतवादीहल्ले होणारी सीमेवरची ठिकाणे, वातावरणातले भयावह बदल, पाण्याची सततची समस्या, भूकंपाचे धोके या सगळ्यामुळे तेथील लोकांना जगण्यात सदैव तणाव जाणवतो.
 
 
 
याचे महत्त्वाचे कारण म्हणजे, या सगळ्या त्रासदायक गोष्टींवर आपले कोणतेही नियंत्रण नसते.आजकाल आपण टीव्हीवर जगात सतत होणार्‍या आपत्तींविषयी ऐकतो आणि पाहतो. यामुळे लोकांना कधी कधी हे काय सतत चालले आहे, आपले आयुष्य सुरक्षित नाही, असे वाटत राहते. कधी घरातल्या घरात आपण एखाद्याच्या आजराने थकून गेलेलो असतो. या सगळ्या न संपणार्‍या गोष्टी वाटतात.
 
 
 
महामारीच्या या घटनेत कित्येक जणांना आपल्या नोकरीचं काय होणार आहे? आपल्याला पगार मिळेल की नाही? आपली आर्थिक परिस्थिती हलाखीची होणार आहे का? अशी सतत भीती वाटत राहते. अशा प्रकारे आयुष्य अस्थिर आणि असुरक्षित आहे, या जाणिवेचा ताण माणसाला खूप त्रासदायक वाटतो. सहज सुलभ त्याला जगता येत नाही. कुठेतरी अस्तित्त्वावर हा दबाव जबरदस्त जाणवतो. यामध्ये आपण आपल्या आयुष्यातून सत्यस्थितीचा स्वीकार न करता, अवास्तविक अशा मोठ्या-मोठ्या अपेक्षा ठेवल्या, तर जीवन निराशामय होते.
 
 
 
आपण कुणीच परिपूर्ण नाही, तसा निसर्गही परिपूर्ण नाही. अशावेळी आपल्या मनी असणार्‍या आणि दिलासा देणार्‍या गोष्टी घडतील असेही नाही. कदाचित अशा रोमांचक कठीण गोष्टी या आपल्या आयुष्याचा एक अस्सल आणि वास्तविक घटक आहे, असे मानून पुढे जाणार्‍यांचे आयुष्य अधिक आरामदायी आणि समाधानी असल्याचे दिसून येते. शहरात पाण्याचा नळावरुन आपण अनेक मारामार्‍या पाहतो.
 
 
 
तेव्हा पहाडी भागात अगदी दूरवरुन पाण्याचे हंडे वाहणार्‍या हसतमुख गृहिणींनासुद्धा पाहतो. एकंदरीत आपल्या सद्यपरिस्थितीला आपण कसे स्वीकारतो, हे खूप महत्त्वाचे आहे. आपल्या आयुष्यात बदल तर होतच राहणार आहेत. अगदी दुःखद बदलांनी आपल्याला तणाव जाणवतो असे नाही.
 
 
 
लग्न वा प्रमोशनसारखे सुखद बदलसुद्धा आपल्याला खूप तणावजन्य वाटतात. खरंतर प्रत्येकाची तणावजन्यता ही ज्याच्या त्याच्या व्यक्तिमत्त्वावर व त्यांच्यात असलेल्या झुंजण्याच्या क्षमतेवर अवलंबून आहे. काही जणांना आयुष्यातील कठीण गोष्टी ‘स्पीडब्रेकर’सारख्या वाटतात. त्यावरुन पार करुन गेलं की रस्ता कसा सुकर होतो, जीवनाचेसुद्धा तसेच आहे.


डॉ. शुभांगी पारकर
@@AUTHORINFO_V1@@